गङ्गाष्टकस्तोत्रम्(वृत्त-मालिनी, गण - न न म य य, यति- 8,7)

भगवति भवलीलामौलिमाले तवाम्भ-
कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति।
अमरनगरनारीचामरग्राहिणीनां
विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति।।1

भगवत् पवित्र,दिव्य,यशस्वी,प्रसिद्ध, सन्मानित,श्रद्धेय,

जननि जल तुझे हे माळ का मौक्तिकांची
खुलुन अति दिसे ही चंद्रमौली जटांसी
भगवति महिमा हा काय वर्णू तुझा मी
अमल सलिल नाशी पातके भूतळीची।।1.1

सलिल लवचि गंगे सेविता हे तुझेची
कणभर तव माती स्पर्शिता वा कुणीही
कलियुग-अपराधा सत्वरी दूर सारी
नर शयन करी तो अप्सरांच्याच अंकी।।1.2

(वृत्त स्रग्धरा, अक्षरे 21, गण म र भ न य य य , यति 7,7,7)

ब्रह्माण्डं खण्डयन्ती हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ती
स्वर्लोकादापतन्ती कनकगिरिगुहागण्डशैलात्स्खलन्ती
क्षोणीपृष्ठे लुठन्ती दुरितचयचमूनिर्भरं भर्त्सयन्ती
पाथोधिं पूरयन्ती सुरनगरसरित्पावनी न पुनातु।।2

ब्रह्मांडा भेदुनी गे प्रकट शिवशिरी जाहली तू शिवांगी
देई हे तोय माते चमक शिव-जटा-वल्लरींना नवेली
स्वर्गातूनी धरित्रीवर अवतरली ही तुझी शुभ्र धारा
नाचे धावे उड्या घे कनकगिरिवरी गात जाई तराणा।।2.1

झोकुनी देत अंगा घुसळत जल हे खोल खाईत जाई
अंकी विश्वंभरेच्या सहज पहुडसी गे सुखावून गात्री
पापांच्या घोर सैन्या भिववि जल तुझे निंदुनी धाक घाली
ऐसी स्वर्लोककन्या पुनित जग करो पाप सारे धुवोनी।।2.2मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमदिरामोदमत्तालिजालं
स्नानैः सिद्धाङ्गनानां कुचयुगविगलत्कुङ्कुमासङ्गपिङ्गम्।
सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैश्छन्नतीरस्थनीरं
पायान्नो गाङ्गमम्भ करिकलभकराक्रान्तरंहस्तरङ्गम्।।3

गंगेच्या या प्रवाही कितिक गजदळे खेळती ही मजेनी
त्यांच्या गंडस्थलीचा मद-परिमल दे गंध त्याची जलासी
होती मोहीत भुंगे सलिल परिमले गाति गुंजारवासी
नाना गंधर्वकन्या जळिच विहरता होतसे मोद त्यांसी।।3.1

त्यांच्या वक्षस्थलीची विरघळुनि उटी कस्तुरी कुंकुमाची
सोनेरी ये छटा ही हलकि हलकिशी पीतवर्णी जळासी
संध्याकाळी सकाळी ऋषिगण सगळे अर्घ्यदानास देती
आच्छादे नीर तीरी कुसुम कुश युता गालिच्यांनी सुगंधी।।3.2

हत्ती बाळे मजेने तव सुखद जळी रंगुनी खेळतांना
दंगा मस्ती तयांची बघुनि थबकतो ओघ गंगे जरासा
सर्वांना आवडे हे तव जल सरिते सृष्टिसी मोहवी या
भक्तांच्या रक्षणासी प्रिय तव जल हे सज्ज राहोचि नित्या।।3.2


( वृत्त- शार्दूलविक्रीडित, अक्षरे 19, गण- म स ज स त त ग,  यति 12,7)

आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं
पश्चात्पन्नगशायिनो भगवत पादोदकं पावनम्।
भूय शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं
कन्या कल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु माम्।।4

सृष्टीच्या नवनिर्मितीच समयी भागीरथी भव्य ही
स्रष्ट्याच्या इवल्या कमंडलुमधे होतीच सामावली
संध्या पूजन नित्यकर्म करण्या तो वापरे तोय हे
त्याच्यानंतर शेषशायि हरिचे पादाब्ज ही धूतसे।।4.1

धारा पावन भूषवी शिवजटा थाटात मोठ्या अशा
वाटे रत्नविभूषणास शिव या सन्मान मानी महा
झाले थोर महर्षि जह्नु तयिची कन्याचि ही जाहली
ऐश्वर्यास जिच्या नसेचि उपमा गंगानदी दिव्य ही ।।4.2

केले विश्व पवित्र मंगलमयी पृथ्वीस आनंदवी
श्रद्धास्थानचि वाटते मम हृदी ऐसीच भागीरथी
नाशी पाप अमंगलास अवघ्या दुःखे करी दूर जी
माझे रक्षण ती करो; मम हिता पाहो सदा जाह्नवी।।4.3


शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी
पारावारविहारिणी भवभयश्रेणीसमुत्सारिणी।
शेषाहेरनुकारिणी हरशिरोवल्लीदलाकारिणी
काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गा मनोहारिणी।।5

येई पर्वतराज पार करुनी भागीरथी भूवरी
बर्फाची अति उंच उंच शिखरे वेगात ओलांडुनी
जे जे स्नान तिच्या जलात करती उद्धार त्यांचा करी
देई जीवन हे तिचे मिसळुनी रत्नाकराच्या जळी।।5.1

नाशी संकटमालिका सकल त्या संसारदुःखे हरी
वाटे बिल्वदलासमान जणुका ही शंकराच्या शिरी
जाई घेतची गोल गोल वळणे अत्यंत वेगात ही
आहे व्याप तिचा विशाल इतुका या शेषनागापरी।।5.2

काशीच्या रमणीय त्या परिसरा व्यापेचि मंदाकिनी
आनंदे करिते विहार जल हे जाई पुढे  नित्यची
वाटे दृश्य मना मनोहर अती वाहेच भागीरथी
सारे जीवन ही तिची यशकथा विख्यात आहे जगी।।5.3


(वृत्त शिखरिणी, अक्षरे -17, गण - य म न स भ ल ग, यति- 6,11)

कुतोऽवीची वीचिस्तव यदि गता लोचनपथं
त्वमापीता पीताम्बरपुरनिवासं वितरसि।
त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां
तदा मात शातक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः।।6

जरी पाहे कोणी तव जलतरंगास जननी
तयासी कोठोनी भय अवनतीचे छळि मनी
नरा लाभे पीतांबरपुर चि पीता जल तुझे
हरी-सालोक्याचे अनुपम मिळे सौख्य बरवे।।6.1

तुझ्या अंकी माते मरणसमयी देह पडता
मनी धिक्कारी तो अमरपुरिचे सौख्यहि सदा
अगे देसी जीवा अपरिमित सौख्या मिळवुनी
कसा वर्णु माते सरस महिमा मी मम मुखी।।6.2(वृत्त-मालिनी, गण - न न म य य, यति-8,7)

भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं
विगतविषयतृष्ण कृष्णमाराधयामि।
सकलकलुषभङ्गे स्वर्गसोपानसङ्गे
तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद।।7

तरल कंपमान थरथरणारे,तरंगांमुळे हलणारे,द्रवरूप,चंचल,चमकदार। भगवती - यशस्वी,प्रसिद्ध, सन्मानित,श्रद्धेय,दिव्य,पवित्र,
सलिल तवचि माते केवळ प्राशुनी मी
धवल-सलिल तीरी राहतो हे शिवांगी
गळुनि सकळ गेल्या वासना लालसा ही
मजसि विषयतृष्णा मानसी ना जराही।।7.1

हृदयि करित धावा माधवा माधवा मी
पदकमल हरीचे पूजितो नम्रमूर्ति
धुवुन सहजि टाकी माय तू पापराशी
तव जल लहरी या स्वर्गसोपान होती।।7.2

तनु तव कमनीया ही तरंगावलींची
चमचम चमके ही सुंदरा नीरगात्री
सदय हृदय माते तूचि सौभाग्यशाली
मजवरि तव राहो गे कृपापूर्ण दृष्टी।।7.3


(वृत्त स्रग्धरा, अक्षरे 21, गण म र भ न य य य , यति 7,7,7)

गङ्गे त्रैलोक्यसारे सकलसुरवधू-धौतविस्तीर्णतोये
पूर्णब्रह्मस्वरूपे हरिचरणरजोहारिणि स्वर्गमार्गे।
प्रायश्चित्तं यदि स्यात्तव जलकणिका ब्रह्महत्यादिपापे
कस्त्वां स्तोतुं समर्थस्त्रिजगदघहरे देवि गङ्गे प्रसीद।।8

त्रैलोक्याचे असे तू त्रिभुवनजननी सार, सामर्थ्य,शक्ती
येई ना या जलाची लवभर सरही वस्तुसी कोणत्याही
साऱया देवांगना या स्फटिकसम जळी पूत विस्तीर्ण पात्री
स्नानाने शुद्ध होती; तव जल महिमा स्वर्गमार्गास दावी।।8.1

शक्तीने कालियासी हतबल करुनी नाचता कृष्ण माथी
आले मालिन्य त्याने हरिपद-कमला लागली धूळ माती
त्यासी टाकी धुवोनी विमल तव जले तूचि ब्रह्मस्वरूप
आहे लौकीक ऐसा त्रिभुवन करिसी तूच गे पापमुक्त।।8.2

प्रायश्चित्ते जरी का असतिल जगती दुष्ट पापांस काही
नाही गंगोदकाच्या सम इतर दुजे  जे महापाप नाशी
नाही माते तुझा गे  गुणपरिचय हा द्यावया मी समर्थ
व्हावी माझ्यावरी गे जननि तव कृपा तूचि व्हावे प्रसन्न।।8.3


( वृत्त- शार्दूलविक्रीडित, अक्षरे 19, गण- म स ज स त त ग,  यति 12,7)

मातर्जाह्नवि शम्भुसङ्गमिलिते मौलौ निधायाञ्जलिं
त्वत्तीरे वपुषोऽवसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयम्।
सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे
भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती।।9

माते जाह्नवि शंभुसंग तुजला लाभे सदा सर्वदा
हा गंगाधर मस्तकी तुज धरे तू गौरवा पात्र ह्या
जोडोनी मम अंजुली करितसे माते तुला प्रार्थना
माझी मान्य करीच एक विनती हे माय तू मोक्षदा।।9.1

जेंव्हा रम्य तटीच राहुन तुझ्या ठेवीन मी देह हा
माझा प्राण-प्रयाण-उत्सव तुझ्या तीरावरी रंगता
आनंदे हृदयी स्फुरो स्मरण ते नारायणाचे मला
लोपावा हर वा हरी मम मनी हा व्यर्थची भेद वा ।।9.2

अद्वैतासचि एक त्या मम मनी मी आठवावे सदा
जीवाचेच शिवासवे मिलन ते यावे घडोनी पुन्हा
जीवात्मा परमात्मरूप बनुनी जाओचि हा पूर्णता
साक्षात्कार घडो मलाचि जननी विश्वात्मकाचाचि त्या ।।9.3


गङ्गाष्टकमिदं पुण्यं य पठेप्रयतो नर।
सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति।।10

प्रयत नियंत्रित, जितेंद्रिय, पूत, पावन, भक्त, आत्मसंयमी, एखाद्या धार्मिक अनुष्ठानासाठी साधनेने स्वतला पवित्र बनविणे
गंगाष्टक म्हणे जोची । शुद्ध भाव धरे हृदी
पापमुक्तचि तो राही। विष्णुलोकी निरंतरी

होतेच देवभाषेत ।  गंगाष्टक पवित्र हे
त्यासी मराठीभाषेत । अरुंधती करीतसे

------------------
(माघ शु. पं. वसंतपंचमी, 14 फेब्रु. 2013)आत्मषट्कम्


मनोबुध्द्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायु-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥1

मनाहून आहे सदा वेगळा मी । नसे चित्त मी वा न बुद्धी कधीही
मना-बुद्धिला चालना जेच देई । असे विश्वव्यापीच चैतन्य ते मी॥ 1.1

     अहंता ममत्वासवे जोचि नांदे । वसे नित्य जो दंभ अज्ञानसंगे
नसे मी अहंकार ना दंभ तोची । असे जोचि जीवा महाक्लेशकारी॥ 1.2

नसे श्रोत्र मी वा नसे नेत्र दोन्ही । नसे नासिका मी न जिह्वा कधीही
न पृथ्वी न वायू न आकाश पाणी । न मी तेज वा पंचभूतेच कोणी॥ 1.3

कळे इंद्रियांसी न अस्तित्त्व माझे । मुनींच्याच बुद्धीमधे मी प्रकाशे
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 1.3

(जे चिंतन मनन करतात, ज्यांना आत्म प्रचिती आली आहे त्यांना मुनी म्हणतात)न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर
न वा सप्तधातुर्न वा  पञ्चकोष:
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।।2

( प्राण-  प्राणवायू अथवा प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण  ; सप्तधातु - रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र (शरीराची धारणा करतात ते धातु) ; पंचकोष - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय ( आत्म्याला झाकतात म्हणून त्यांना कोष म्हणतात.) ; पाच कर्मेंद्रिये -  हात,  पाय, तोंड गुद आणि उपस्थ (उपस्थ- जननेंद्रिये )

नसे प्राण वा मी नसे पंच वायू । नसे कोष पाची न वा सप्त धातू
नसे हात,पायादि कर्मेंद्रिये मी । न जिह्वा न वाचा न वाणीस्वरूपी॥ 2.1

कळेना कधी मीच बाह्येंद्रियांसी । हृदी प्रत्यया येतसे बुद्धिने मी
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 2.2न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥3

नसे द्वेष आसक्ति वा लोभ काही । न स्पर्शे मला गर्व वा मत्सरादि
मला आस ना धर्म वा अर्थ याची । नसे अंतरी काम नाना विकारी ॥ 3.1

नको मोक्ष-मुक्ती अपेक्षा न त्याची । असे मुक्त मी मोक्षबंधातुनीही
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 3.2

(धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांच्या बंधनातून आत्मा हा मुक्त असतो. तो आत्मा हे माझे खरे स्वरूप आहे.)
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥4

मला कोठले पाप वा पुण्य आता । मला सौख्य वा दुःख हे वेगळे ना
असे मन्त्रशक्तीच मी  सर्व थोर  । मला मंत्र आता कशाला हवेत ॥ 4.1

पवित्रास या तीर्थयात्रा कशास ।   समाविष्ट तीर्थेच माझ्यात देख
मला व्यापकाला न जाणेचि वेद ।  नसे वेद मी चारही ते समस्त।। 4.2

नसे यज्ञ वा यज्ञकर्ताच मीची । न यज्ञातुनी जी फळे प्राप्त होती
नसे अन्न मी वा न भोक्ता तयाचा । नसे वस्तु ती भोग ज्याचाच घ्यावा ॥ 4.3

घडाया क्रिया प्रेरणा एक मीची । जसा सूर्य साक्षी समस्ता क्रियांसी
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 4.4 न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्म।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥ 5

नसे जन्म त्या मृत्युची काय भीती । असे शुद्ध मी त्या मला जात नाही
पिता कोठला माय ही ना कुणीही । न जन्मे तया संभवे नाचि नाती ॥5.1

नसे आप्त कोणी न भाऊ बहीणी । गुरू ना मला शिष्यही ना कुणीही
असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥ 5.2अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध-
श्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्॥6

नसे कोणता भेद माझ्या ठिकाणी । असे मीच भेदाचिया पार जाणी
भरोनी सदा सर्व विश्वात राहे । मला विश्वरूपास आकार नोहे॥ 6.1

जगी चालते सर्व सत्ताच माझी । सदा सर्व स्वाधीन ही इंद्रियेही
सदा प्रत्यया एकरूपात ये मी । मला बंधने मुक्ति ना लागु होती॥6.2

असे शुद्ध चैतन्य आनंद रूपी । असे मीच मांगल्य कल्याणरूपी॥6.3

-------------------------------------------------------