शिवमानसपूजा



Image result for lord shiva free download

                        अंतःकरणात भक्तिभाव दाटून आला की आपल्या आराध्य देवतेची पूजा करण्यास साधनांचीही आवश्यकता भासत नाही. मानसपूजा ही अंतःकरणापासून केलेली असते. पूजेच्या बाह्योपचाराचे अवडंबर त्यात नसते. तरीही देवाच्या जास्त समीप नेणारी, आनंद देणारी अशी ही मानसपूजा आहे.  म्हणूनच सर्व पूजांमध्ये मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा समजली जाते.

             शिवानंदलहरींमधे आचार्य म्हणतात, `` देवा तुझी पूजा करण्यासाठी लोकं किती काया शिणवतात. कोणी खोल तलावात उतरून कमळं खुडण्यासाठी धडपडतो. तर कोणी तुला बिल्वपत्र आवडते म्हणून  कडे कपारी चढून बिल्वदले तोडून आणतात. इतके सायास करणा र्‍या ह्या लोकांना तुला फक्त `सुमनधन' म्हणजे मन, चित्त अर्पण केलेले आवडते हे कसं कळत नाही?''
              आपल्या गुरूची, निवृत्तीनाथांची मानसपूजा करतांना ज्ञानदेव म्हणतात, ``मी माझ्या गुरूची पूजा करीन. मीच त्यांचे पाय धुवीन. पाणीही मीच होईन. पायही मीच पुसेन पाय पुसण्यासाठी शेलाही मीच होईन. जी जी पूजासामग्री असेल ती मीच होईन. गुरूचे सर्वस्व मीच होईन. मी माझ्या गुरूचा एकुलता होईन.''

                 आचार्यांनी मांडलेली ही नितांत सुंदर शिवमानसपूजा देवपूजेचे समाधान देऊन जाते आणि त्याचबरोबर चितःप्रसादही देऊन जाते. प्रसाद म्हणजे मनातील सर्व भाव हृदयाच्या तळाशी बसून निर्माण झालेली शांत मनस्थिती. गढूळ पाण्यात निवळी फिरवली की पाण्यातील सर्व अशुद्ध कण खाली बसून पाण्याला जशी नितळता प्राप्त होते, तसा मनाचा विकारहीन नितळपणा हाच पूजेनंतर प्राप्त होणारा खरोखरचा प्रसाद. 

(वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे - 19, गण -म स ज स त त ग, यति -12,7)

रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं

नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् ।

जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा

दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ।।1

 

माझ्या मानसि कल्पना करुनि मी दिव्यासना निर्मिले

रत्नांनी करुनी सुशोभित तया भावे तुला अर्पिले

स्नानासी तुज आणिले सलिल मी मंदाकिनीचे भले

आहे शीतल, शुद्धची, विमल हे प्रेमे तुला अर्पिले।।1.1

 

वस्त्रे सुंदर आणिली भरजरी देवा तुला अर्पिण्या

रत्नांचा कशिदा सुरेख विणला मी त्यावरी साजिरा

पाचू , माणिक, पुष्कराजचि हिरे मी त्यावरी गुंफिले

मोती , नीलचि कौस्तुभा जडविले गोमेध, वैडुर्य ते ।।1.2

 

शंभो चंदन,कस्तुरी उटि तुला लावी सुगंधी अशी

जाई, चंपक, बिल्वपत्र भरुनी मी अर्पितो अंजुली

प्रेमे धूप, सुदीप अर्पण तुला देवा दयासागरा

माझ्या मानसि कल्पुनीच सगळे मी पूजिले रे तुला।।1.3

 

 

सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं

भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम्

शाकानामयुतंजलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं

ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरू ।।2

 

हे पंचामृत अर्पितोच तुजसी ह्या स्वर्णपात्री प्रभो

रत्ने ज्यावर मौल्यवान असती नानापरीची अहो

चाखूनी बघ खीर ही रुचिर रे पक्वान्न स्वादिष्ट ही

केळी,तूप, पदार्थ हे बहुविधा केला स्वयंपाक मी।।2.1

 

कोशिंबीर, फळे, मुळे ,सरबते, भाज्याच ताज्या अती

घेई हे स्फटिकासमान जल तू कर्पूरकांती जयी

प्रेमे बांधियला त्रयोदशगुणी तांबूल मी मानसी

स्वीकारून करा कृपा मजवरी विश्वेश्वरा  हो तुम्ही।।2.2

 

 

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं

वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा।

साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया

सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ।।3

 

छत्रासी धरितो शिरीच तुझिया; शंभो शिवा शंकरा

चौर्‍या ढाळिन मस्तकीच तुझिया मी आवडीने शिवा

पंख्याने हळुवार घालिन तुला वाराचि विश्वंभरा

भावे निर्मळ दर्पणासि तुजला मी अर्पितो सुंदरा ।।3.1

 

वीणा,ढोल,मृदंग,काहल अशी वाद्येचि नानाविधा

सेवेसी तुझियाच वाजविन मी हे विश्ववंद्या शिवा

झालो धन्यचि गाऊनी तव स्तुती रंगी तुझ्या रंगलो

आनंदे विसरून भान सगळे मी नाचतो नाचतो।।3.2

 

आले चित्त उचंबळून मम हे नेत्री तुला पाहता

माझा मी नच राहिलो तव पदी मी अर्पिला देह हा

हाची रे प्रणिपात पावलि तुझ्या साष्टांग मी घातिला

संकल्पा करुनी यथाविधि असे मी पूजिले रे तुला।।3.3

 

माझ्या मानसपूजना अनुमती देऊन स्वीकार ती

सारे अर्पण रे तुला पशुपते स्वीकार सेवा च ही

झालो मी कृतकृत्य मोदलहरी आनंदसिंधुत या

जैसे मीठ जळी तसेच सहजी मी रे मिळालो तुला।।3.4

 

 

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं

पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः

सञ्चारः पदयोर्प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो

यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्।।4

 

आत्मा तू स्वयमेव; बुद्धि मम ही साक्षात् उमा शांकरी

पंचप्राण सवंगडी सहचरे; प्रासाद कायाच ही

घेण्यासी विषयोपभोग सगळे केलीच जी मांडणी

तेची पूजन रे तुझे पशुपते; निद्रा समाधी स्थिती ।।4.1

 

 माझी चाल, परिक्रमा विधिवता आहे तुला घातली

जे जे बोल मुखातुनी प्रकटती आहे स्तुती ती तुझी

जे जे काम करीन मी, तवचि ती  पूजा असे निश्चिती

शंभो हे मजला न वाचुन तुझ्या आराध्य ह्या जीवनी।।4.2

 

 

(वृत्त-मालिनी, गण- न न म य य, यति-8,7)

 

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा

श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो।।5

(विहित - कलेले काम)

घडुनि सहजि गेले पाप हातून माझ्या

अनुसरलि पदे ही दुष्ट वाटा जगाच्या

नयन,श्रवण,वाचा यांनि केल्या चुका ज्या

अनुचित मनि आले त्रासदायीच माझ्या।।5.1

 

उचित अनुचिताचे भान ना ठेविले म्या

भरकटतचि गेलो मी चुकोनी पथाला

मजकडुनि जहाले पाप वा पुण्य जे का

करि मजसि क्षमा तू दीनबंधो कृपाळा।।5.2



आहे वाङ्मय अर्चना सकल ही भावानुवादातुनी
पूजा हीच अरुंधती करितसे हे नीलकंठा तुझी
वंदे थोर जगद्गुरू तव पदी केली कृपा थोर ही
द्याया शब्दसुधा निरंतर मला ही शारदाम्बा उभी

-----------------


Image result for lord shiva free download

 पौष शुद्ध प्रतिपदा, खरनाम संवत्सर /25 डिसेंबर 2011



।। #श्रीगणपतिस्मरणम् ।।


Image result for lord ganesha free download photos

                      हाती घेतलेले सत्कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणुन श्री गणेशाचे स्तवन, पूजन करण्याचा प्रघात आहे. अनुवाद पारिजात ह्या पुस्तकाचा आरंभ करतांनाही श्री आद्यशंकराचार्य लिखित एका सुरेख अशा गणेश स्मरणाच्या सुबोध भावानुवादाने आपण सुरवात करु या. 

                         ह्या एकाच श्लोकात असलेल्या यमक, अनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे गणेशस्मरण प्रत्यक्षात स्मरणात राहण्यास सुद्धा सुंदर आणि सोपे झाले आहे.

(वृत्त - भुजंगप्रयात, अक्षरे -12, गण - य य य य)

गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं

चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डम्

लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं

शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्।।

 

( दान – दानोदक, हत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा द्रव; शौण्ड – कुशल, दक्ष, तरबेज; लस् – चमकणे; कान्डम् खण्ड, अंश, तुकडाशिवप्रेमपिण्ड् –प्रेमाने महटले जाते की माझा पोटचा गोळा आहे त्याप्रमाणे शिवाचा लाडका पोटचा गोळा. वक्रतुण्ड – दुष्ट प्रवृत्तिचे, खल प्रवृत्तिचे लोक. त्यांना तुडवतो, नष्ट करतो तो वक्रतुण्ड )

 

गणेशा गुणेशा तुला पूजितो मी । तुझे सुंदरा रूप चित्ती स्मरे मी

शिरी पाझरे त्याच दानोदकानी। सुवासीक ओलेति गंडस्थले ही।।1.1

 

किती भृंग झुंडी तिथे गुंजताती । रसास्वाद घेवोनि  ते लुब्ध होती

झुले सोंड तालात मोही मनासी । कटीबद्ध तू रक्षिण्या या जगासी।।1.2

 

सुळा एक शोभे तुझा हस्तिदंती । करी तूच निःपात आपत्तिचा ही

शिवाचा असे लाडका पुत्र तूची। करी दुष्ट संहार विघ्नेश मूर्ती।।1.3

----------------------------------------

 

#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad
#लेखणीअरुंधतीची-