।। विश्वनाथाष्टकम् ।।

Image result for lord shiva free download
                  श्री व्यासमहर्षिंनी रचलेले `विश्वनाथाष्टकम्' हे अप्रतिम स्तोत्र आहे. जो सार्‍या विश्वाचा नाथ आहे तोच कल्याणकारी शिव, काशी अथवा वाराणसी नगरीचाही स्वामी आहे. गंगेमुळे पवित्र झालेली ही नगरी कायम त्याच्या अधिपत्यामुळे चमकत असते. (काशी ह्या नावातील मूळ संस्कृत धातु म्हणजे क्रियापद काश् असे आहे त्याचा अर्थ चमकणे असा आहे.)
                 जे शिवतत्त्व विश्वनाथ या नावाने श्री व्यासमहर्षिंनी कल्पिले आहे तेच शिवतत्त्व आपल्या देहालाही व्यापून उरले आहे. म्हणुनच आद्य शंकराचार्यांनी `काशीपञ्चकम्' या त्यांच्या स्तोत्रात देह हीच काशी, आणि सर्व विश्वाचा साक्षी असलेला अन्तरात्मा हाच ह्या देहरूपी काशीमधे असलेला विश्वनाथ म्हणून विराजमान आहे असे म्हटले आहे.
               आद्य शंकराचार्य जेंव्हा पहिल्यांदा काशीस गेले होते तेंव्हा त्यांनीही काशीविश्वेश्वराच्या देवळात हेच विश्वनाथाष्टक म्हणून देवाची स्तुती केल्याचा उल्लेख आहे.

               अशा ह्या विश्वेश्वराच्या चरणी शरण येणार्‍याला संकटे ती कोणती? विद्या, धन हात जोडून त्याच्यापुढे उभे असणारच!

(वृत्त  वसंततिलका, अक्षरे-14, गण-त भ ज ज ग ग, यति-पाद)

गङ्गातरङ्ग -रमणीय-जटाकलापं
गौरीनिरन्तरविभूषितवामभागम्।
नारायणप्रियमनङ्गमदापहारं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ।।1
कलाप - आभूषण, 
गंगा-तरंग रमणीय करी जटांसी
लावण्यमूर्ति गिरिजा नित वामभागी
प्राणाहुनी प्रिय सखा गमतो हरीसी
जो गर्व दूर करुनी मदनास जाळी।।1.1

वाराणसी नगरिचा नित जोचि स्वामी
तो विश्वनाथ धरि रे हृदयी सदाही।।1.2



वाचामगोचरमनेकगुणस्वरूपं 
वागीश-विष्णु-सुर-सेवित-पादपीठम्।
वामेन विग्रहवरेण कलत्रवन्तं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ।।2

(1कल  अशुद्ध कलात् / कश्मलात् त्रायते इति कलत्रम् पत्नी पतीला अशुद्ध आचरणापासून दूर ठेवते म्हणून कलत्र)

वाणी  इथे थबकते, बहु संभ्रमानी
दिङ्मूढ गात्र म्हणती जयिनेति नेति
ज्यासी पवित्र शुभ सद्गुण भूषवीती
ब्रह्मा, सुरेंद्र, हरिही पदि लीन होती।।2.1

वामांग भूषण उमा करि पूत ज्यासी
जाई मना शरण त्या शिवपादपद्मी
वाराणसी नगरिचा नित जोचि स्वामी
तो विश्वनाथ धरि रे हृदयी सदाही।।2.2



भूताधिपं भुजगभूषणभूषिताङ्गं 
व्याघ्राजिनाम्बरधरं जटिलं त्रिनेत्रम्।
पाशाङ्कुशाऽभय-वरप्रदशूलपाणिं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ।।3

ज्याच्या दयेवर जगे नित जीवसृष्टी
प्रेतादि भूत गण मानिति ज्यास स्वामी
ज्यासी भुजंग तनुला नित भूषवीती
जो व्याघ्रचर्मचि लपेटुन नित्य घेई।।3.1

जो मस्तकावर जटा घनदाट बांधी
आहेच अग्निसम नेत्र विशाल भाळी
 जो पाश अंकुश धरी जग चालण्यासी
हाती त्रिशूळ धरिला खल दंडिण्यासी।।3.2

आश्वस्त जो करितसे बहु सज्जनांसी
देऊन त्यांस अभया; वर योग्य देई
वाराणसी नगरिचा नित जोचि स्वामी
तो विश्वनाथ धरि रे हृदयी सदाही।।3.3



शीतांशु-शोभित-किरीटविराजमानं
भालेक्षणाऽनलविशोषितपञ्चबाणम्।
नागाधिपारचितभासुरकर्णपूरं
 वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ।।4
(भासुर - चमकदार, भयानक)
ज्याच्या शिरी विलसतो शशि शांत मूर्ती
भाळावरी धगधगे अति उग्र अग्नी
 शोषून घेई मदना निमिषात जोची
तो नेत्र उग्र तिसराच विनाशकारी।।4.1
जो स्वर्णकांति भुजगांस महा विषारी-
आभूषणासम करी परिधान कानी
वाराणसी नगरिचा नित जोचि स्वामी
तो विश्वनाथ धरि रे हृदयी सदाही।।4.2

पञ्चाननं दुरितमत्तमतङ्गजानां
 नागान्तकं दनुजपुङ्गवपन्नगानाम्।
दावानलं मरणशोकजराटवीनां
 वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ।।5

ह्या मत्त हत्तिसम दुःखद पापराशी
तू सिंह शूर सहजी तयि लोळवीसी
व्याधी,जरा,मरण,शोक अरण्य माजे
त्यासीच भस्म करण्या वणवाचि तू रे।।5.1

  वाराणसी नगरिचा नित तूचि स्वामी
आलो शिवा शरण मी तव पादपद्मी।।5.2



तेजोमयं सगुणनिर्गुणमद्वितीय-
मानन्दकन्दमपराजितमप्रमेयम् 
नागात्मकं सकलनिष्कलमात्मरूपं 
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्।।6

(अप्रमेय –-  कोणत्याही नियमाने ज्याचे पूर्ण ज्ञान होत नाही ;  सकल- जो  सर्व काही आहे , अथवा सर्व कला  ज्याला ज्ञात आहेत,किंवा सर्व मंत्रांच्या अधिष्ठात्री देवता ज्यात सामावल्या आहेत असा ; निष्कल -  निराकार, निर्विकार, निर्दोष, निरवयव.)

तेजोनिधी सगुण निर्गुण एक तूची
नाही तुझ्यासम कुणी जगतात ह्याची
आहे अपार सुख तू, नच जे उणावे
कोणी पराजित तुला करु ना शके रे।।6.1

नाही तुला समजण्या नियमावली जी
सांगू शकेल तव रूप सुयोग्य रीती
नागेंद्र हार तनुसी तव भूषवीती
आहेच तू सकल निष्कल सर्व काही।।6.2

कैवल्यधाम शिव तू  नित आत्मरूपी
आनंदकंद अपराजित अप्रमेयी
  वाराणसी नगरिचा नित तूचि स्वामी
आलो शिवा शरण मी तव पादपद्मी।।6.3



रागादिदोषरहितं स्वजनानुरागं
वैराग्यशान्तिनिलयं गिरिजासहायम्।
माधुर्य-धैर्यसुभगं गरलाभिरामं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्।।7

(राग -  अनुराग, प्रेम)
द्वेषादि दोष अनुराग जयास नाही
वात्सल्य भक्तविषयी परि थोर राही
वैराग्य शांति घर शोधित ये जयासी
राहे सदैव गिरिजा, पति-पाठिराखी।।7.1

माधुर्य, धैर्य गुण सुंदर भूषवीती
अर्धोन्मिलीत नयने स्मितहास्य मोही
प्राशूनही विष दिसे रमणीय मूर्ती
हा कंठनील मज मोहवितो मनासी।।7.2

  वाराणसी नगरिचा नित तूचि स्वामी
आलो शिवा शरण मी तव पादपद्मी।।7.3



आशां विहाय परिहृत्य परस्य निन्दां
 पापे रतिं सुनिवार्य मनः समाधौ।
आदाय हृत्कमलमध्यगतं परेशं 
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्।।8

दे सोडुनी सकल त्या निज कामनांसी
निंदा नरा सकल सोडुन दे दुज्यांची
दुर्वतनी कधि घे रुचि तू जराही
एकाग्र चित्त करि तू शिवपादपद्मी।।8.1

जो नित्य वास करितो हृदयारविंदी
घेईच जाणुन तया परमेश्वरासी
वाराणसी नगरिचा नित जोचि स्वामी
तो विश्वनाथ धरि रे हृदयी सदाही।।8.2



वाराणसीपुरपतेः स्तवनं शिवस्य 
व्याख्यातमष्टकमिदं पठते मनुष्य:।
विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं 
सम्प्राप्य देहविलये लभते मोक्षम्।।9

श्लोकाष्टकास म्हणती नियमीत कोणी
वाराणसीपुरपती मनि आठवीती
विद्या धनादि सुख त्या मिळतेच कीर्ती
लाभेचि मोक्ष मरणोत्तर त्या नरासी।।9



विश्वनाथाष्टकमिदं यः पठेत् शिवसंनिधौ 
 शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते।।10


विश्वनाथाष्टकासी या जो म्हणे शिवसंनिध
शिवलोक मिळे त्याला सुखी राहे शिवासह ।।10




Image result for lord shiva free download
------------------

शक 1935, विजय नाम संवत्सर आषाढ पौर्णिमा , गुरु पौर्णिमा, 22जुलै 2013




No comments:

Post a Comment