हस्तामलकस्तोत्रम्

  स्तोत्राची पूर्वपीठिका -  
            
              असं म्हणतात की यमुनेकाठी एक सिद्ध योगी राहत असे. एक दिवस यमुनेवर स्नानास आलेल्या एका बाईने आपल्या लहान मुलाला त्या योगीमहाराजांजवळ ठेवले आणि ती स्नान करून येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देण्याची विनंतीही केली. तेवढ्याकाळात योग्याची समाधी लागली. मूल रांगत रांगत नदीकडे गेले. नदीत पडले. प्रवाहाबरोबर वहात आलेले आपले मृत मूल पाहून त्याच्या आईने तर हंबरडाच फोडला. तिचा आक्रोश ऐकून भानावर आलेल्या योग्याचेही मन द्रवले. योगबलाने त्याने आपला देह सोडून बालकाच्या देहात प्रवेश केला. ते मूल जिवंत झाले. तोच हा हस्तामलक!
              अशा प्रकारे बालपणीच एक सिद्ध योगी असलेला हस्तामलक कोणाशी काही बोलत नसे. त्याच्या मातापित्यांना आपला मुलगा जन्मजात मुका बहिरा आहे असे वाटले. तो बोलतही नाही आणि  काही शिकतही नाही हे पाहून त्यांना फार वाईट वाटत असे. लोकही त्याला वेडा म्हणून त्याची चेष्टा करत असत.
                योगायोगाने त्याच वेळी जगद्गुरू आद्य शंकराचार्य  दक्षिणेकडील तीर्थयात्रा करत  हस्तामलकाच्या श्रीबलि नावाच्या गावी आले. आचार्यांची अलौकिक विद्वत्ता, व तेज पाहून वेदशास्त्रसप्पन्न प्रभाकर आपली पत्नी आणि आपल्या मुक्या बहिर्‍या मुलासह आचार्यांना भेटायला आला. त्या बालकाला पाहून  आचार्यांना सर्व काही समजून आले. त्याला आचार्यांनी काही प्रश्न विचारले. आणि तो मुलगा घडा घडा घडा बोलू लागला. आचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांची हस्तामलकाने दिलेली उत्तरे ऐकून लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तळहातावर ठेवलेल्या आवळ्या प्रमाणे ज्याला निःसंदिग्धपणे आत्मज्ञान झाले आहे तो मुलगा पुढे आचार्यांच्या चार पट्टशिष्यांपैकी  हस्तामलक म्हणून प्रसिद्ध झाला.
 आचार्यांनी विचारलेले प्रश्न ह्या स्तोत्रात पहिल्या श्लोकात आहेत. तर त्याची हस्तामलकने दिलेली उत्तरे म्हणजेच बाकी पूर्ण स्तोत्र आहे.


हस्तामलकस्तोत्रम्

(वृत्त - इंद्रवज्रा, अक्षरे -11, गण -त त ज ग ग)

कस्त्वं शिशो! कस्य कुतोऽसि गन्ताकिं नाम ते त्वं कुत आगतोऽसि।
एतन्मयोक्तं वद चार्भक! त्वं । मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि ।।1

तू कोण रे? बाळचि तू कुणाचा?। आलासि कोठूनि कुठे निघाला
सांगी मला नाव तुझेचि आता। ज्याने सुखावे मम चित्त बाळा
दाटे मनी प्रेम तुला बघोनी। दे उत्तरा दे प्रिय बाळ तूची।।1


हस्तामलक उवाच -
(वृत्त - भुजंगप्रयात, अक्षरे-12, गण- य य य य)

नाहं मनुष्यो न च देवयक्षौ । न ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः ।
ब्रह्मचारी न गृही वनस्थो । भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः ।।2

हस्तामलक उत्तरला -

ना देव मी, यक्ष मनुष्य नाही । क्षत्रीय वा ब्राह्मण वैश्य नाही
ना शूद्र मी जात मलाचि नाही । ना ब्रह्मचारी न गृहस्थ मीची
ना वानप्रस्थी नच भिक्षु कोणी । आत्मा असे मी निजबोधरूपी।।2


निमित्तं मनश्चक्षुरादिप्रवृत्तौ । निरस्ताखिलोपाधिराकाशकल्पः ।
रर्विलोकचेष्टानिमित्तं यथा यः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।3
(निरस्त -– दूर । आकाशकल्प ब्रह्म । चेष्टा व्यवहार,कार्य । निमित्त आधार,कारण, प्रयोजन,हेतु ।  उपलब्धि प्रत्यक्ष ज्ञान)
मना लोचना सर्व वा इंद्रियांच्या । क्रियांचा असे मूळ आधार पूर्णा
उपाधी जयाला नसे वा कुणाची । निराकार ते ब्रह्म मी चित्स्वरूपी।।3.1
जसा सूर्य साक्षी जगाच्या क्रियांना। अकर्ता असोनी जगा चालवी हा
तसे ज्ञान प्रत्यक्ष जे नित्य राहे । घडे बोध ज्यानेच ते रूप माझे।।3.2


यमग्न्युष्णवन्नित्यबोधस्वरूपं । मनश्चक्षुरादीन्यबोधात्मकानि।
प्रवर्तन्त आश्रित्य निष्कम्पमेकं । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।4

(प्रवर्तनम् आरंभ, सुरवात,उत्साहानी काम करणे,प्रेरित करणे । निष्कंप स्पंदनरहित, विना विकल्प)

नसे उष्णता वेगळी अग्निहूनी। तसा आत्मज्ञानाहुनी भिन्न ना मी
मना लोचनांना घडे बोध ज्याने । करी इंद्रिये काम ज्या प्रेरणेने ।।4.1
असोनीच देही क्रिया ना करे जो। घडे ना क्रिया एक ज्याच्या विना तो
निराकार निष्कंप तो नित्य आत्मा । असे रूप माझेचि मी ब्रह्मरूपा।।4.2


मुखाभासको दर्पणे दृष्यमानो । मुखत्वात्पृथक्त्वेन नैवास्ति वस्तु।
चिदाभासको धीषु जीवोऽपि तद्वत् । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।5

मुखाहून ना बिंब ते वेगळेची। उपाधी असे आरसा एक तोची
तसे चिद्रुपाचेच बुद्धीमधे जे। पडे बिंब त्या जीव हे नाव आहे ।।5.1
असे जीव आभास नाही दुजा तो । नसे वेगळी वस्तु आत्म्याहुनी तो
नसे जीव मी, ज्ञान प्रत्यक्ष मी तो । असे बोधरूपीच आत्माचि मी तो।।5.2


यथा दर्पणाभाव आभासहानौ । मुखं विद्यते कल्पनाहीनमेकम्।
तथा धीवियोगे निराभासको यः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।6
असे बिंब ही कल्पना तो मनाची । असे आरसा जोवरी तोवरीची
करी दर्पणा दूर तो बिंब लोपे। मुखासी क्षती पोचते नाचि कोठे।।6.1
तशी बुद्धि आत्म्यामधे लीन होता । उरे सर्वव्यापीच जो एक आत्मा
असे ज्ञानरूपीच जो अंतहीना । उरे बोधरूपीच मी तोचि आत्मा।।6.2


मनश्चक्षुरादेर्वियुक्तः स्वयं यो । मनश्चक्षुरादेर्मनश्चक्षुरादिः ।
मनश्चक्षुरादेरगम्यस्वरूपः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।7
नसे चित्त तो लोचने वा न जोची । नसे देह वा इंद्रिये कोणतीही
मनाचे असे अंतरंगूच जोची। विवेकूचि जो साक्षि राही मनासी।। 7.1
असे लोचनांचीच जो लोचने ही । जयाच्या प्रभावे कळे विश्व नेत्री
मना लोचनां जो परी ना कळेची । चिरस्थायि ते ज्ञान आत्मा असे मी ।।7.2


एको विभाति स्वतः शुद्धचेतः । प्रकाशस्वरूपोऽपि नानेव धीषु
शरावोदकस्थो यथा भानुरेकः ।  स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।8
(शराव ताटली,झाकण)
प्रकाशस्वरूपी सदा जे सतेज । असे शुद्ध चैतन्य ते एकमेव
परी अंतरंगे किती ही अनेक। तयामाजि भासे अनेका रुपात।।8.1
जसा सूर्य तो एक; बिंबे अनेक । चकाके अनेकाविधा पाणियात
चिरस्थायि तैसाचि मी ज्ञानरूप । असे एक आत्माचि दैदिप्यमान।।8.2


यथानेकचक्षुःप्रकाशो रविर्न । क्रमेण प्रकाशीकरोति प्रकाश्यम् ।
अनेका धियो यस्तथैकः प्रबोधः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।9

अनेकाचि  नेत्रा जसा एकवेळी । रवी देतसे तेज ते पाहण्यासी
जगा दाखवी सर्व एकाचिवेळी । क्रमाने क्रमाने न दावी जगासी।।9.1
तसा चालना देतसे एक जोची । अनेकांचि या बुद्धिला एकवेळी
चिरस्थायि तो एक आत्मा असे मी । असे ज्ञान प्रत्यक्ष मी चित्स्वरूपी।।9.2


विवस्वत्प्रभातं यथारूपमक्षं । प्रगृह्णाति नाभातमेवं विवस्वान्।
यदाभात आभासयत्यक्षमेकः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।10

रवीच्या प्रकाशे दिसे वस्तु नेत्री । रवी देतसे शक्ति ती पाहण्याची
जया स्पर्शितो सूर्य त्याच्या प्रभेनी । तयालाचि पाहू शके नेत्र दोन्ही ।।10.1
मिळे लोचना तेज सूर्यामुळेची । रवीला मिळे तेज ज्याच्या मधोनी
चिरस्थायि ते तेज आत्मा असे मी । असे ज्ञान प्रत्यक्ष मी चित्स्वरूपी।।10.2


यथा सूर्य एकोऽप्स्वनेकश्चलासु । स्थिरास्वप्यनन्यद्विभाव्यस्वरूपः
चलासु प्रभिन्नासु धीष्वेक एव । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।11

तरंगांमुळे बिंब ते कंप पावे । गमे स्थीर त्या निश्चलू वा जलाते
जला अंगि चांचल्य वा स्थैर्य राहे । प्रतीतीस येते रवीच्या चि अंगे ।।11.1
अनेकाविधा बुद्धिमाजी तसे हे । अनेक-स्वरूपीच चैतन्य भासे
निराकार कूटस्थ निर्लेप राहे । सदा ज्ञानरूपीच चैतन्य मी ते।।11.2


घनच्छन्नदृष्टिर्घनच्छन्नमर्कं । यथा निष्प्रभं मन्यते चातिमूढः
तथा बद्धवद्भाति यो मूढदृष्टेः । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।12

जसा मेघ आच्छादिता लोचनांना । म्हणे मूढ झाकोळला सूर्य गेला
असोनी तसा मुक्त जो एक आत्मा । अडाणी म्हणे बांधला हाची गेला ।।
चिरस्थायि जो नित्य आत्माच तो मी । असे ज्ञान प्रत्यक्ष मी चित्स्वरूपी।।12


समस्तेषु वस्तुष्वनुस्यूतमेकं । समस्तानि वस्तूनि यन्न स्पृशन्ति
वियद्वत्सदा शुद्धमच्छस्वरूपं । स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा ।।13

असे सर्व वस्तुंमधे तत्व जे ची। परीपूर्ण राहे भरोनी सदाही
परी स्पर्शते ना जया कोणतीही । जगातील ती एकही वस्तु साची।।13.1
घडाया तयाचेच  वा पूर्ण ज्ञान । जगामाजि ना एकही वस्तु ज्ञात
जसे शुद्ध आकाश तैसाचि शुद्ध । असे ज्ञानरूपीच मी आत्मतत्त्व।।13.2


उपाधौ यथा भेदता सन्मणीनां । तथा भेदता बुद्धिभेदेषु तेऽपि
यथा चन्द्रिकाणां जले चञ्चलत्वं । तथा चञ्चलत्वं तवापीह विष्णो।।14

 नटे पूर्ण वैविध्यतेने सदाही । अनेकत्व या लक्षणाने उपाधि
तशी अंतरंगे बहू ये दिसोनी । तयी बिंबतो ईश भासे नवाची ।।14.1
अनेकाविधा रत्नराशीत जेवी । नवे बिंब प्रत्येक रत्नी दिसेची
जळी नाचते चंद्रिका भास होई। जळाच्या असे तेचि चांचल्य अंगी ।।14.2
तसा भिन्न हा भासतो ईश लोकी । जरी तत्वता तोचि निर्लेप राही
अनंता प्रभो विश्वव्यापी असे तू । भरोनीच राहे पुरे विश्व विष्णु ।।14.3

-------------------------------------------------------

खरनाम संवत्सर, माघ पौर्णिमा, 7 फेब्रु. 2012





1 comment: