शिवभुजंगप्रयातस्तोत्रम्

Image result for free download images of lord shiva


        
            श्री जगद्गुरू आद्य शंकराचार्य लिखित हे शिव स्तोत्र हृदयाला स्पर्शून जाईल इतके करूण रसाने ओथंबले आहे. अनन्य भक्तीचा प्रत्यय देणारे आहे. शिवाला भुजंग आवडतात म्हणून आचार्यांनी हे स्तोत्र भुजंगप्रयात ह्या वृत्तात रचले आहे.

  शिवभुजंगप्रयातस्तोत्रम्

(वृत्त- भुजंगप्रयात, अक्षरे 12,  गण- , यति- 6,6)

यदा दारुणाभाषणा भीषणा मे भविष्यन्त्युपान्ते कृतान्तस्य दूताः 
तदा मन्मनस्त्वत्पदाम्भोरुहस्थं कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ।।1

यमाचे अती दुष्ट हे दूत जेंव्हा उभे ठाकती रे मला न्यावयाला
भयाने अती कापू लागेच काया। बघोनी अती रौद्र रूपास त्यांच्या।।1.1

अती कर्कशा शब्द ऐकूनि त्यांचा।सुटे धीर, कंठी अडे श्वास माझा
तुझ्या पादपद्मी मला सांग तेंव्हा कसे स्थीर ठेऊ मना चंचला या।।1.2

म्हणोनी महादेव ह्याची क्षणाला। करावे पदी स्थीर माझ्या मनाला
नमस्कार शंभो तुला पार्वतीशा। तुझी पावले राहु दे चित्ति माझ्या।।1.3

यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो लुठन्निश्वसन्निसृताव्यक्तवाणिः।
तदा जह्नुकन्याजलालङ्कृतं ते जटामण्डलं मन्मनोमंदिरं स्यात् ।।2

जराजर्जरा व्याधिने ग्रस्त काया खिळे देह हा मृत्युशय्येवरी या
कुशी पालटे जीव अस्वस्थ झाला। कधी लोळतो वेदनेनेच मोठ्या ।।2.1

अडे श्वास माझा फुटेनाचि वाचा। असे लागली रे मला धाप जेंव्हा
अशा अंतकाळी प्रभो नीळकंठा। करा आस माझी पुरी वैद्यनाथा।।2.2

करोनी अलंकार गंगातरंगा जलानेच शृंगारिले मस्तका या 
अशा सौख्यदायी स्वरूपा तुझ्या या मनोमंदिरी माझिया नित्य ठेवा।।2.3

यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे रुदन्त्यस्य हा कीदृशीयं दशेति।
तदा देवदेवेश गौरीश शंभो नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि।।3
अजस्र – अनवरत, अविरत

बसोनीच माझ्या उशा पायथ्याला। मुले मित्र गाळीत अश्रूंस जेंव्हा
करू लागती शोक पाहूनिया म्या। `अहो काय झालीच ह्याची अवस्था'।।3.1

महादेव शंभो गिरीजेश्वरा या मुखातून येवो तुझे नाम तेंव्हा।
वदो वाणि माझीनमस्ते शिवाय नको रे मुखी अन्य नामाशिवाय ।।3.2

यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मानयं श्वास एवेति वाचो वदेयुः 
तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं पुरारे भवन्तं स्फुटं भावयेयम् ।।4

``मला ओळखीले, मला ना जराही , असे श्वास चालू, आशा जराही,
अहो नेत्रिची ज्योत गेली विझोनी'' असे सांगती एकमेकास कानी।।4.1

अशी चालु संभाषणे त्याच वेळा विनंती असे एकची पायि देवा
गळा सर्पमाळा चिताभस्म भाळा। दिसो स्पष्ट हे रूप माझ्याच डोळा।।4.2

 यदापारमच्छायमस्थानमद्भिर्जनैर्वा विहीनं गमिष्यामि दूरम् 
तदा तं निरुन्धन् कृतान्तस्य मार्गं महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ।।5

(अपारं - ज्याला किनारा नाही , अच्छायं-छायाविरहित , अस्थानं- स्थान नाही )

यमाच्या सवे मीच जाईन जेंव्हा। अती दूर मार्गी नसे अंत ज्याला
नसे सावली मस्तकी  गारव्याला। विसाव्यास जागा जराही दिसेना।।5.1

दिसेना पथी एक ही व्यक्ति जेंव्हा। मला पाहुनी ना दया ये कुणाला
अशावेळी खंडोनि त्या दुःखमार्गा। महादेव सन्मार्ग द्यावा मला ह्या।।5.2
  
यदारौरवादि स्मरन्नेव भीत्या व्रजाम्येव मोहं पतिष्यामि घोरे
तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीन अर्धेन्दुमौले ।।6

असे नर्क जो यातनांचाच सार्या अशा रौरवाला मनी आठवीता
पराधीन, मोहांध, आधारहीना। मला रे भयाने सुचेनाच जेंव्हा।।6.1

अहो विश्वनाथा तुम्हावीण तेंव्हा। मला उद्धराया नसे शक्य कोणा
पराधीन मी दीन, हे दीन बंधो कृपासिंधु तू चंद्रमौळीच शंभो।।6.2

यदा श्वेतपत्रायतालङ्घ्यशक्तेः कृतान्ताद्भयं भक्तवात्सल्यभावात्
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं पश्यामि पातारमेतादृशं मे ।।7
(श्वेतपत्र - ढवळा नंदी,  पातारम् -त्राता )

जया लंघुनी पार ना जाय कोणी जया शक्तिचा अंत वा पार नाही
यमाने अशा घालिता दुष्ट घाला। गळ्याभोवती फास तो आवळीता।।7.1

तुम्ही श्वेत नंदी वरी बैसुनी या। मला वाचवा भक्तवात्सल्यरूपा
तुम्हावीण त्राता मला ना दिसेची अहो पार्वतीवल्लभा अन्य कोणी।।7.2


इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्रीत्यहोसंततं चिन्तया पीडितोऽस्मि 
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा नमस्ते गतीनां गते नीलकण्ठ ।।8

सदा मृत्युघंटा मनी वाजते ही मला जाळि चिंतास्वरूपी चिता ही
भयातून या मुक्त होण्यास देवा तुझे नाम हा एकची मार्ग आता।।8.1

तुझी एक प्राप्ती असे मोक्ष माझा। फळांमाजि रे श्रेष्ठ प्राप्ती तुझी बा
नमस्कार माझा तुला नीलकंठा। नमस्कार विश्वेश्वरालाच माझा ।।8.2


अमर्यादमेवाहमाबालवृद्धं हरन्तं कृतान्तं समीक्ष्यास्मि भीतः 
मृतौ तावकाङ्घ्र्यब्ज-दिव्य-प्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ।।9

कधी बाळ वा यौवनी वृद्धकाळी अमर्याद मी वागलो धुंदफुंद
मला आज ओढोनी नेता कृतांत। भयाने शहारेच मी अंग अंग।।9.1

असे आस आता तुझ्या पावलांची। भवानीपते चित्ति माझ्याच मोठी
सरोजासमा कोमला पावले ही। करो दूर भीती यमाची यमाची।।9.2

जराजन्मगर्भादिवासादिदुःखान्यसह्यानि जह्यां जगन्नाथ केन।
भवन्तं विना मे गतिर्नैव शंभो दयालो  जागर्ति किं वा दया ते।।10

नको रे नको जन्म, आजार, दुःखे। नको वृद्ध होणे, गर्भी रहाणे
नको दुःसहा दुःख ते भोगिणे रे। नको रे कृतांतास वा पाहणे ते।।10.1

दयाळा तुझ्यावीण नाही गती रे। मला एक तू, एक तो तूच आहे
मला पाहुनी का तुला ना दया ये द्रवे ना कसा दुःख पाहूनि माझे।।10.2

शिवायेति शब्दो नमःपूर्व एष स्मरन्मुक्तिकृन्मृत्युहा तत्त्ववाची
ममेशान मा गान्मनस्तो वचस्तः सदा मह्यमेतत्प्रदानं प्रयच्छ ।।11

नमःशब्द बोले तया पूर्वि वाचा। अपोआप उच्चारतेचीशिवाय
मनी आठवीताचि तो एक मंत्र। नसे मृत्युबाधा मिळे मुक्ति थोर।।11.1

परब्रह्मवाची असे तेचि नाम। असे मूळ जे सर्वव्यापी अनंत
असे तत्त्ववाचीच ते नाम एक। असे बीज तो मंत्रची शुद्ध एक।।11.2

घडो विस्मृती ना मनाला जिभेला। तुझ्या बीजमंत्रास उच्चारिता या
सदा हेचि द्यावे मला दान देवा। नको अंतरु तू मला देवराया।।11.3
  
त्वमप्यम्ब मां पश्य शीतांशुमौलिप्रिये भेषजं त्वं भवव्याधिशान्तौ 
बृहत्क्लेशभाजं पदांभोजपोते भवाब्धौ निमग्नं नयस्वाद्य पारम् ।।12

अगे पार्वतीमाय माझी भवानी। प्रिया, स्वामिनी चंद्रमौली-िशवाची
तुझी दृष्टि माझ्यावरी राहु द्यावी असे प्रेमभावेच ओथंबली जी ।।12.1

भवाचीच व्याधी अती क्लेशकारी। तया शांतवी औषधी एक तूची
बुडालो बुडालो भवाच्या समुद्री। बहु कष्ट होतीच ये प्राण कंठी।।12.2

तुझी पावले कोमला पद्म जैसी असे पार नेण्यास नौका मला ही
किती खाइ गोते किनारा नेत्री। मला ने भवातून तारून आई ।।12.3

अनेन स्तवेनादरादम्बिकेशं परांभक्तिमातन्वता ये नमन्ति 
मृतौ निर्भयास्ते ह्यनन्तं लभन्ते ह्रदंभोजमध्ये समासीनमीशम् ।।13

सदा भक्तिभावे अती नम्र वाचे म्हणे स्तोत्र जो हे उमाशंकराचे
तया मानसी ईश तो नित्य राहे सतावे त्या मृत्युचिंता मनाते।।13


अकण्ठे कलङ्कादनङ्गे भुजङ्गादपाणौ कपालादभाले नलाक्षात् 
अमौलौ शशाङ्कादहं देवमन्यं  मन्ये  मन्ये  मन्ये  मन्ये ।।14

नसे जाहला काजळी कंठ ज्याचा। भुजंगावली भूषवीते काया
भिक्षार्थ हाती कपाला धरी वा। नसे ज्याचिया वाम अंकीच जाया।।14.1

जटांना अलंकार ना चंद्रम्याचा। ललाटी नसे स्थान धूमध्वजाला
असा देव कोणी मला मान्य नाही। मला मान्य नाही मला मान्य नाही।।14.2
(धूमध्वज – धूर हा ज्याचा ध्वज आहे असा अग्नी )

किरीटे निशीशो ललाटे हुताशो भुजे भोगिराजो गले कालिमा च।
तनौ कामिनी यस्य तुल्यं देवं जाने जाने जाने जाने।।15

शशी धूम्रकेशी, ललाटीच अग्नी। भुजंगांनि वेढीयले रे भुजांसी
गळा नीलवर्णी,उमा अर्धदेही। अशासारिखा देव नाहीच नाही।।15
  
अयं दानकालस्त्वहंदानपात्रं भवानेव दाता त्वदन्यं  याचे।
भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं कृपाशीलशम्भो कृतार्थोस्मि यस्मात्16

असे दान देण्यास रे पर्वणी ही। तुझ्या सारिखा एक दाताच तूची
असे हीन रे दीन भिक्षू तुझा मी तुझ्यावीण अन्यास भिक्षा मागी।।16.1

असामान्य दाता कृपाशील तूची तुझी नित्य भक्तीच झोळीत घाली
तुझ्या पादपद्मी मना स्थीर ठेवी तयाने समाधान लाभेल चित्ती।।16.2

शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवादन्यथा दैवतं नाभिजाने 
महादेव शम्भो गिरीश त्रिशूलिन् त्वयीदं समस्तं विभातीति यस्मात्17

तुला जाणितो, अन्य कोणास नाही। तुझ्याठायि सामावले विश्व पाही
तुझ्याहून आता नसे वेगळा मी। स्वरूपी तुझ्या रे मिळालो शिवा मी।।17.1

उभा जन्म झाला अती धन्य माझा। शिवाचाच मी अंश ब्रह्मस्वरूपा
शिवोऽहं! शिवोऽहंशिवोऽहं शिवाच्याच रूपात सामावलो हा।।17.2

भुजङ्गप्रियाकल्प शम्भो मयैवं। भुजङ्गप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम्।
नर स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या। सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति।।18

भुजंगावली आवडे ज्या शिवाला। भुजंगप्रिया-नागिणी भूषवी ज्या
भुजंगप्रयाती करोनी स्तुतीला। शिवालाच त्या तोषवीतोच मी हा ।।18.1

म्हणे स्तोत्र हे भक्तिभावे सदा रे। तया आयु आरोग्य ऐश्वर्य लाभे
गुणी पुत्र लाभे अती सौख्य लाभे। शिवाच्याच लोकी तया स्थान लाभे।।18.2

-----------------------------------------

15 जून 20011, ज्येष्ठपौर्णिमा- वटपौर्णिमा





1 comment:

  1. खूप सुंदर! अप्रतिम अनुवाद!!

    ReplyDelete