।। देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ।।

                     मन्त्र, तन्त्र, पूजेचे कुठलेही विधी न येणार्‍या सर्वसामान्य माणसाला नजरेसमोर ठेऊन श्री आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिले आहे. संसारसुखाच्यामागे धावणार्‍या माणसाला अचानक लक्षात येते की आपण तर सारं आयुष्य मृगजळामागे धावण्यातच व्यर्थ घालवलं.  भांबावून गेलेल्या ह्या माणसाला आचार्य आईच्या मायेने हात देतात. शिवपराधक्षमापणस्तोत्राप्रमाणे ह्याही स्तोत्रात  आचार्यांनी मनाने कोलमडून पडलेल्या, आश्रयासाठी आधार शोधणा र्‍या भक्ताचे सर्व दोष स्वतःवर आरोपित करण्याने हे स्तोत्र प्रत्येकालाच आपल्यासाठीच असावे असे वाटते.
          त्यातील चौथ्या श्लोकात आचार्य पंचाऐशी वर्षाच्या वृद्धाच्या मनाची तगमगही इतक्या समर्थपणे मांडतात की काहींना हे स्तोत्र आचार्यांनी स्वतःविषयीच लिहिले आहे असे वाटते. आचार्यांचे आयुष्य केवळ 32 वर्षे असल्याने हे त्यांचे स्तोत्र नाही असेही काहींचे म्हणणे आहे.
असो पण  हे स्तोत्र अतिशय सुंदर आहे. मूल चुकले तरी परत आईच्याच नावाने हाक मारते; आणि आपल्या चुकलेल्या मुलाला आईच पोटाशी घेते. 

(वृत्त - शिखरिणी, अक्षरे 17, गण - , यति - 6,11)

 मन्त्रं नो यन्त्रं तदपि जाने स्तुतिमहो 
 चाह्वानं ध्यानं तदपि जाने स्तुतिकथाः
 जाने मुद्रास्ते तदपिच जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ।।1

तुझ्या पूजेसाठी अवगत नसे मंत्र मजला
स्तुती वा यंत्राचा परिचयहि माते मजसि ना
तुझ्या पायी व्हावे समरस कसे  ध्यान करुनी
कळेना कैसे वा  उचित तव आवाहन मुळी।।1.1

कथा ना ठावे ती तव यश, गुणांची मजसि गे
तुझी मुद्रा, चिन्हे नच कळति माते मजसि गे
करू कैसे मी गे तव पदि विलापा कळे
तुझ्या मागे येता शमति परि दुःखे मज कळे।।1.2



विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता भवति।।2

तुझ्या पूजेचा गे विधि मजसि ना ज्ञात जननी
अती कंटाळा हा; धनहि जवळी ना लवभरी
असा गांजूनी मी तव सुखद पायांसि मुकलो
क्षमा पापांना ह्या जननि करि गे मीच चुकलो।। 2.1

जगाच्या उद्धारा जननि कटिबद्धाच असशी
जगाच्या कल्याणा अविरत तनूसी शिणविसी
जरी आला पोटी अधम सुत तो दुर्जन अती
जगी होणे नाही जननि कधिही निर्दय तरी ।।2.2



पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता भवति।।3

सुपुत्रांची माते तुजसि कमी याचि जगती
परी नाही माझ्यासम सुत कुणी चंचल अती
अगे माते जावे त्यजुनि मजला हे बरवे
 तुझी कीर्ती सांगे सुखद असशी प्रेममयि गे।।3.1

जरी आला पोटी अधम सुत तो दुर्जन अती
जगी होणे नाही जननि कधिही निर्दय तरी।।3.2



जगन्मातर्मातस्तव चरणसेवा रचिता
 वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।4

अगे माते! तू गे, सकल जगताचीच जननी
तरीही ना केली तव चरण सेवा कधिच मी
दिले नाही मी गे तुजसि धन द्रव्यादि कधिही
परी केली माया मजवरति निष्काम तरिही।।4.1

जरी आला पोटी अधम सुत तो दुर्जन अती
जगी होणे नाही जननि कधिही निर्दय तरी।।4.2


परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्।।5

पुरे पंचाऐंशी वय  ममचि झालेचि जननी
दिले सोडोनी मी व्रत नियम देवार्चनविधी
अशावेळी माते मजसि त्यजुनी जाशिल जरी
निराधारासी  या तुजविण  विसावा जगती।।5.1

स्वयंभू जो लंबोदर गणपती माय तयिची
कुठे जाऊ मी गे शरणचि कुणा सांग मजसी
जरी आला पोटी अधम सुत तो दुष्ट खल ची
जगी होणे नाही जननि कधिही निर्दय तरी।।5.2


श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को  रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।6

जरी निर्बुद्धाच्या तव स्तवन कानी लव पडे
तरी बोलू लागे मधुर वचने तो सहजि गे
दरिद्री रंकाला अतुल धन ऐश्वर्यचि मिळे
अपर्णे मंत्राची महति तव गे अद्भुत असे।।6.1

जरी अर्धेमुर्धे स्तवन फलदायीच इतुके
तुझ्या मंत्राचा गे सविधि जप तो काय फळ दे ।।6.2



चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भुतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानित्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ।।7

चिताभस्मा लावी तनुवरति ओढी दशदिशा
फराळासी आहे विष भयद हालाहल  जया
भुजंगांच्या माळा; रखरखित बांधी शिरि जटा
बसायासी नंदी; शिव धरि कपाला नित करा।।7.1

तरी त्याला पूजी सकल जन हे वंद्य म्हणुनी
दिली सन्मानाने पशुपतिस  विश्वेश पदवी
तुझा हाती घेई मृदुल कर त्याचे फलित हे
कृपा ज्यासी लाभे जननि तव तो सर्व मिळवे।।7.2


 मोक्षस्याकाङ्क्षा  भव विभववाञ्छाऽपि मे
 विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ।।8

सुखाची, मोक्षाची मम मनि अपेक्षा कुठली
कला-कौशल्याची, विपुल विभवाची लवभरी
तुझे चंद्राजैसे मुखकमल ते शांत बघुनी
पुन्हा प्राप्ती व्हावी सुख, धन हि इच्छा उरली।।8.1

विनंती माझी गे चरणि तव मातेच इतुकी
अपर्णे गौरी गे गिरिवरसुता हे भगवती
मृडानी रुद्राणी जपत तव नामे शिवमयी
घडो या जन्माचे तव चरणि गे सार्थक कधी।।8.2

 (वृत्त - वसन्ततिलका, अक्षरे -14,  गण - त भ ज ज ग ग, यति - पाद ) 

नाराधिताऽसि विधिना विविधोपचारैः
किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ।।9

हे श्यामले जननि गे कधि मी केली
पूजा यथाविधि तुझी सुमना धनानी
केले चिंतन मनी नच पाप ऐसे
वाणी धजेल कधी वदलोचि ऐसे।।9.1

झालो कृतघ्न जरि मी ममता तुझी गे
माझ्यावरी बरसते जननी तुझी गे
आहे तुझे उचित वर्तन हेचि माते
जन्मे कृतघ्न सुत, माय वैरिणी गे।।9.2


(वृत्त - इन्द्रवज्रा ; गण, त त ज ग ग ; यति - पाद )

आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं  
करोमि दुर्गे करुणार्णवेशिवे ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः  
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।10

येता विपत्ती चहुबाजुनीया 
धावा करी मी जननी तुझा गा ।
नाही लबाडी मम माय त्याते
आई !“ पुकारी छकुले भुकेले  ।।10



(वृत्त- वियोगिनी, अक्षरे- विषम चरण -10, सम चरण- 11,
गण- विषम चरण- , सम चरण-

जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरम्परावृतं
 हि माता समुपेक्षते सुतम् ।।11

असलो जरि पुत्र दुष्ट मी करुणेचा घन तू महानची
अपराध सहस्र मी करी मजसी स्नेह अलोट तू करी।।11.1

विलक्षण यात काहिही जननी  एकचि रीत ही जगी
अपराध करी अपत्य ते। परि त्या माय दूर लोटते।।11.2


(वृत्त - अनुष्टुभ् छंद, अक्षरे - प्रत्येक चरणात 8)

मत्समः पातकी नास्ति
पापघ्नी त्वत्समा ही
एवं ज्ञात्वा महादेवि 
यथायोग्यं तथा कुरु ।। 12

नाहीच पातकी कोणी
माझ्यासमचि एक मी ।
जाळाया घोर कर्मे ती 
नाही तव समा  कुणी ।। 12.1

जाणूनी हे महादेवी  
करावी योग्य ती कृती।। 12.2

---------------------------------------------------------

नंदन नाम संवत्सर, चैत्र कृ. एकादशी.( श्री वल्लभाचार्य जयंती ) /16 एप्रिल 2012



No comments:

Post a Comment