मनीषापञ्चकम्


स्तोत्राविषयी थोडेसे -
                            
           शंकराचार्य काशी क्षेत्री निवास करीत असतांना, शूद्रांना पदोपदी दिली जाणारी हीन वागणूक पाहून ते नक्कीच व्यथित झाले असणार. तेंव्हाच्या  तथाकथित धर्ममार्तंडांना समजावून सांगण्यासाठीच आचार्यांनी हे स्तोत्र लिहिले आहे. 
                                  चुकीचं वागणार्‍या एखाद्या लहान मुलाला तू चुकीचं वागतो आहेस असं सांगून चालत नाही. ‘तू असंच वागलं पाहिजेसम्हणून सांगीतलं तर तो त्याच्या विरुद्ध वागण्याचीच जास्त शक्यता असते. मग त्याला एका वेड्या मुलाची गोष्ट सांगायला लागते. एक मुलगा, वेड्यासारखं वागल्यानी त्याला कसा त्रास झाला असं सांगावं लागतं. लहान मुलांच्या बाबतीत जे खरं आहे तेच मोठ्या माणसांच्या बाबतीत ही तितकच खरं आहे. मोठेपणी माणसांचा अहंकार तर अजून मोठ्याप्रमाणात दुखावला जातो.
                             म्हणूनच ह्या स्तोत्रातील शूद्रांनादूर हो सांगणारे सत्याचार्यही शंकराचार्य नसून तेंव्हाच्या ढुढ्ढाचार्यांचे प्रतिक आहेत. ज्याप्रमाणेमना सज्जनाम्हणतांना रामदासांना कोणीही सज्जन अभिप्रेत नसून मूर्खपणानी वागणारा सामान्य माणूसच अभिप्रेत आहे त्याच प्रमाणे सत्याचार्य म्हणजे स्वतः शंकराचार्य नसून समाजातील `मला सर्व काही समजतं आणि मीच सत्य आणि शहाणा आहेअसं समजणारे अती शहाणे लोक  म्हणजे आपणच आहोत. शंकराचार्यरूपी शंकरानी मात्र प्रत्यक्ष केलेला हा उपदेश हा आपल्या सदसत् विवेक बुद्धीला केलेले आवाहनच आहे. ही कल्याणकारी सदसत् विवेकबुद्धी  म्हणजेच शिव, शंकरच नव्हे का?

         औषधे चिन्तयेत्  विष्णुं भोजने  जनार्दनं  शयने पद्मनाभं  विवाहेच प्रजापतिं- -अशी  विष्णूची सोळा नावं सांगणारं एक स्तोत्र आहे. ही सर्व नावे म्हणजे भगवंताची गुणविशेषणे आहेत. त्यात भगवंताच्या कुठल्या रूपाची कधी आठवण करावी हे सांगितले आहे.
 त्यात शेवटच्या श्लोकात `गमने वामनं चैव ' असा उल्लेख आहे. बाहेर समाजात असतांना वामनाची आठवण करावी. म्हणजे तुम्ही तुमचं मोठेपण झाकून सामान्यातल्या सामान्य माणसाप्रमाणे वागणूक ठेवावी. जगद्गुरुंचं वैशिष्ट्य हेच आहे की परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या किंबहुना ब्रह्मरूप झालेल्या ह्या महात्म्याने आपलं मोठेपण कुठेही व्यक्त केलं नाही उलट समाजाचे सारेच दोष स्वतःवर इतक्या खुबीने आरोपीत केले आहेत की वाचणार्याला वाटावं शंकराचार्यच एखाद्या दलित जोडप्याला दूर हो म्हणाले. ते दलित पतिपत्नी शंकर पार्वती होते . खरोखरच्या शंकरपार्वतीनेच त्यांचे डोळे चांगले उघडले.- - इत्यादि इत्यादि.

                                     समस्त उच्च वर्णियांना शंकराचार्यांनी ह्या स्तोत्रातून एक प्रश्न विचारला आहे. बाबा रे तू उच्च आणि बाकी जातीहीन हे भेद तू कशाच्या आधारे ठरवतोस? तुझं शरीर ज्या घटकांपासून तयार झालं आहे त्याच घटकांपासून किडा मुंगीचही शरीर तयार झालं आहे. जे चैतन्य किडामुंगीत, अणुरेणुत आहे तेच तुझ्यामधेही आहे.मग नक्की भेद कुठे आहे?
                           
                           श्री संत एकनाथ महाराजांनीही ह्याच तत्त्वाचा पुरस्कार करणारा मोठा सुंदर अभंग लिहिला आहे. ते म्हणतात - 

नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला । पाणिये प्रक्षाळुनी सोवळा केला
देवापरिस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनि ठेले
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयेचि देव नाही केला ।।

                           त्याचप्रमाणे एक चांगला गुरू कसा ओळखावा हे आचार्यांनी ह्या स्तोत्रात सांगितलं आहे. एका योग्य गुरूची लक्षणं त्यात विदीत केलेली आहेत. हा नश्वर देह म्हणजे मी नसून सर्व विश्वात भरलेलं चैतन्य म्हणजेच मी आहे ही जाणीव ज्याला झाली आहे तो नव्हे तर जो नि:संशयपणे ब्रह्मरूप चैतन्यरूपाने उरला आहे तोच सद्गुरू होऊ शकतो असं आचार्यांनी वारंवार सांगितलं आहे. त्याचबरोबर  ही लक्षणं सांगतांना त्यांनी  हेही सांगितलं आहे की ह्या सर्व लक्षणांनी युक्त असलेला पुरुष तो अंत्यज असो वा ब्राह्मण असो तोच माझा गुरू व्हावा. असा गुरू मिळाल्यावर जो निष्ठेनी त्याची सेवा करतो त्यालाच ब्रह्मपद प्राप्त होतं.


-------------------


    मनीषापञ्चकम् 


सत्याचार्यस्य गमने कदाचिन्मुक्तिदायकम्।
काशीक्षेत्रं प्रति सह गौर्या मार्गे तु शंकरम्।।1
अन्त्यवेषधरं दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत्।
शंकरः सोऽपि चाण्डालस्तं पुनः प्राह शंकरम्।।2
अन्नमयादन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात्।
द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छगच्छेति।।3

(वृत्त - शार्दूल विक्रीडित, अक्षरे 19, गण - , यति -12,7)

काशी क्षेत्रचि मुक्तिदायक असे तेथेच गंगातटी
सत्याचार्यसचैल स्नान करुनी आले पथी सत्वरी।
त्यावेळी शिव पार्वती प्रकटले चांडाल वेषात ची
त्यांसी पाहूनदूर हो लवकरी’  आचार्य ते बोलती।।
बोलेशंकर’ ‘शंकरासहसुनी- ``आचार्य सांगा तुम्ही-
सारे अन्नमयीच देह बनले या पंचभूतातुनी।
व्यापूनी उरते चराचर जगा चैतन्य हे एकची
कोणा पासुन कोण दूर करु मी? सांगा मला हो तुम्ही''।।1/2/3




किं गङ्गाम्बुनि बिम्बितेऽम्बरमणौ चाण्डालवाटीपयः
पूरे चान्तरमस्ति काञ्चनघटीमृत्कुम्भयोर्वाम्बरे।
प्रत्यग्वस्तुनि निस्तरङ्गसहजानन्दावबोधाम्बुधौ
विप्रोऽयं श्वपचोऽयमित्यपि महान् कोयं विभेदभ्रमः।।4

अम्बरमणी  सूर्य,चंद्र । वाटी  घर,अंगण,पाणी  साठविण्याचे लाकडी भांडे किंवा बांध

होती बिंबित दीप जे गगनिचे या शुद्ध गंगाजळी
तेची या दलिता घरातिल जला नाकारती का कधी
राहे कांचनकुंभ पूर्ण भरुनी आकाश निर्लेपची
मातीचा घट व्यापिता म्हणते याला कसे स्पर्शु मी।।4.1

तैसे राहतसे भरून सहजी चैतन्य विश्वाप्रती
आहे जे सुख, ज्ञान-सागर, महा बोधामृते पूर्णची
आहे ब्राह्मण, जातिहीन दुसरा, ना  भेद आत्म्याप्रती
कैसा रे मग भेद हा तव मनी जो भ्रामवी बुद्धिसी।।4.2



जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुज्जृम्भते
या ब्रह्मादिपिपीलिकान्ततनुषु प्रोता जगत्साक्षिणी।
सैवाहं  दृश्यवस्त्विति दृढप्रज्ञापि यस्यास्ति चे-
च्चाण्डालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम।।5

संविद्- चिच्छक्ती, ब्रह्म, चैतन्य । मनीषा  इच्छा, कामना,प्रज्ञा, विचार, । प्रोत  सर्वत्र पसरलेला

ज्यासी जागृति, स्वप्न वा शयन या, तिन्ही अवस्थांमधे
ये चैतन्यचि प्रत्यया चहुकडे, ‘माती -घटा सारखे
मातीसी नच कोंब हे फुटति की , माठा घटांचे कधी
कुंभारा मनि कल्पना उपजवी, आकार सृष्टी नवी।।5.1

आहे शुद्ध सुवर्ण एक तरिही बाह्याकृती दागिना
नेसे वस्त्र, दिसे तयास कपडा, कापूस तो तत्वता
भूताभास असेचि खेळ अवघा, या कल्पनेचा भला
होता अस्तचि कल्पना; दिसुन ये, चित्तत्व व्यापे जगा।।5.2


जे चैतन्य प्रजापतीतचि असे, मुंगीत तेची वसे
साक्षीभाव धरून राहत असे ,चैतन्य ते मी असे
जैसे हे व्यवहार चालति जगी, सूर्यप्रकाशामधे
राहे सूर्य अलिप्त त्या कृतिमधे जाणीव त्यासी नसे।।5.3

होते जाणिव; भोगतो नच खरे; मी एक साक्षी असे
नाही नश्वर देह मी मुळिच हा ; मी ब्रह्म चैतन्य हे
ऐसी बुद्धि स्थिरावली जयिचि तो, कैवल्य रत्नाकरू
तोची उच्चकुलीन वा दलित वा, माझा असो सद्गुरू।।5.4
(गीता- अध्याय 9, श्लोक-5 ज्ञानेश्वरी अर्थ)



ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलं चिन्मात्र विस्तारितं
सर्वं चैतदविद्यया त्रिगुणयाऽशेषं मया कल्पितम्।
इत्थं यस्य दृढा मतिः सुखतरे नित्ये परे निर्मले
चाण्डालोऽस्तु स तु द्विजोऽस्तु गुरुरित्येषा मनीषा मम।।6

आहे एकचि ब्रह्म मी; जगचि हे, विस्तार चित् शक्तिचा
अज्ञाने मज  घेरलेच पुरते होते; कळाले मला
सत्वादि त्रिगुणायुताच असतो अज्ञान  व्यामोह  हा
अज्ञाने जग कल्पिले सकळ हे, त्या चित्स्वरूपीच म्या।।6.1

चित् शक्ती अविनाशि, नित्य, अमला, सिंधू सुखाचा असे
 हे ज्यासी कळलेच निश्चितपणे बुद्धी ज्याची चळे
ऐसी बुद्धि स्थिरावली जयिचि तो, कैवल्य रत्नाकरू
तोची उच्चकुलीन वा दलित वा, माझा असो सद्गुरू।।6.2




शश्वन्नश्वरमेव विश्वमखिलं निश्चित्य वाचा गुरोर्
नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निर्व्याजशान्तात्मना।
भूतं भावि दुष्कृतं प्रदहता संविन्मये पावके
प्रारब्धाय समर्पितं स्ववपुरित्येषा मनीषा मम।।7

विमृश -चिंतन करणे । निरंतर  नित्य,शाश्वत,चिरस्थायी. 

निष्ठा ठेवि प्रगाढ जो गुरुचिया बोलांवरी पूर्णता
आहे नश्वर विश्व हेचि सगळे हा बोध झाला मना
निष्ठेने परब्रह एक भजतो आहे चिरस्थायि जे
नि:संदेह, प्रसन्न, निष्कपट जो, शांती जयाला वरे ।।7.1

सारे संचित, कर्म ,कर्मफलही ज्ञानाग्निते जाळुनी
प्रारब्धासिच देह अर्पित करी; राहे अनासक्तची
संकल्पा मनि स्थान ना तिळभरी; कैवल्य रत्नाकरू
तोची उच्चकुलीन वा दलित वा, माझा असो सद्गुरू।।7.2




या तिर्यङ्नरदेवताभिरहमित्यन्तः स्फुटा गृह्यते
यद्भासा हृदयाक्षदेहविषया भान्ति स्वतोऽचेतनाः।
तां भास्यैः पिहितार्कमण्डलनिभां स्फूर्तिं सदा भावयन्
योगी निवृतमानसो हि गुरुरित्येषा मनीषा मम।।8

होता प्राप्तचि चेतना; नर असो ,प्राणी असो देव वा
शब्द,स्पर्शचि, इंद्रिये, विषय वा, हे भास होती मना
जैसा सूर्य नभी, तरी दिसतो, मेघांमुळे चक्षुला
तैसे हे जग भासमान असुनी झाकोळवी चेतना।।8.1

स्फूर्तीरूप सदैव शुद्ध असते चैतन्य विश्वात या
राहे व्यापुनि विश्व हेचि सगळे हेची कळाले जया
योगी, शांत चि भोगतो सुख मनी, झाला अनासक्त हा
तो माझा गुरुराज थोरचि असे, सांगेच प्रज्ञा मला।।8.2




यत्सौख्याम्बुधिलेशलेशत इमे शक्रादयो निर्वृता
यच्चित्ते नितरां प्रशान्तकलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः।
यस्मिन्नित्यसुखाम्बुधौ गलितधीर्ब्रह्मैव ब्रह्मविद्
यः कश्चित्स सुरेन्द्रवन्दितपदो नूनं मनीषा मम।।9

कलनम्  बोध होणे, जाणणे, धारण करणे

काठोकाठ असेचि पूर्ण भरला जो सौख्य सिंधू सदा
घेता त्यातुन थेंब थेंब तयिचा तो इंद्रही तोषला
ह्या चैतन्य महोदधीतुन सुधा घेती महात्मे सदा
होती तन्मय शांतचित्त अवघे नि:संग ते पूर्णता।।9.1

चिद्रूपात विलीन बुद्धि नच तो, चिद्रूप जो जाहला
जो नि:संशय ब्रह्मरूप उरला, व्यापून विश्वास या
साक्षात् इंद्रही वंदितो चरण ही, अत्यादरे वाकुनी
तो माझा गुरुराज थोर चि असो, आहे मनीषा मनी।।9.2


ऐसे सुंदर स्तोत्र हे परि गमे दुर्बोध भाषेमुळे
तेची स्तोत्र अरुंधती करितसे सोप्या मराठीमधे।
स्तोत्रासी करण्या सुबोध दिधले दृष्टांत जे वाचले
अप्पांच्या अनुवादरूप अतुला ज्ञानेश्वरी ग्रंथिचे।।
-------------------


पुत्रदा एकादशी, श्रावण शुद्ध 11, 9 ऑगस्ट 2011




No comments:

Post a Comment