।। महिषासुरमर्दिनी – स्तोत्रम् ।।

         

              कवी रामकृष्ण यांनी "भगवतीपद्यपुष्पांजली" नावाने लिहिलेले हे स्तोत्र आज महिषासुरमर्दिनी स्तोत्र या नावाने प्रचलित आहे. स्तोत्राचे 'श्रवणाभरण' किंवा 'दुसरी सवाई' हे वृत्तही नेहमी वापरल्या जाणार्‍या वृत्तांमधे सर्वात मोठे / दीर्घ  वृत्त आहे. याच्या प्रत्येक ओळीत 23 अक्षरे येतात. स्तोत्रात असलेल्या यमक, अनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे स्तोत्र अतीशय गेय झाले आहे.

                          रणांगणावर शत्रूला कर्दनकाळ वाटणारी ही रणरागिणी, शत्रूंना ठार मारून त्यांच्या कलेवरांवर थयथय नाचणारी  ही महिषासुरमर्दिनीरक्तबीज राक्षसाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू नये म्हणून रणांगणभर आपली जीभ पसरणारी महाकाली, युद्ध काळ नसतांना मात्र अतिशय मोहक असते.  ती कायमच शिवाच्या प्रचंड मोठ्या कुटुंबाची काळजी घेत असते. युद्धामधे विश्राम घेणार्‍या सैनिकांच्या शिबिरात छेडल्या जाणार्‍या एखाद्या तंतुवाद्याच्या सुरामधेही ती रममाण होते. तर कधी युद्धभूमीच्याच कडेला उगवलेल्या झाडावरील अर्धवट उमललेलं फूल, तांबुस कोवळ्या पानासहित तिच्या कानावर अलगद ठेवते.



(वृत्त - दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण ,
 अक्षरे-23, गण- न ज ज ज ज ज ज ल ग , यति- 7,6,6,4.)

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते।
गिरिवरविन्ध्य-शिरोधि-निवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते
भगवति हे शितिकण्ठ-कुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।1

अगं अगं पार्वति! मोदित-मेदिनि विश्व प्रफुल्लित तू करिसी
तुजपुढती नत नंदिहि, वंदिति वीर महा तुजला जननी
गिरिशिखरावर विंध्यगिरीवर राहसि विष्णुप्रिये रमणी
परमपिता शिव शंभुचि तू गृहस्वामिनि तत्पर गे असशी ।।1.1

तव परिवार विशाल असे अति कार्य तुझेहि विशाल अती
भगवति तू वधिला महिषासुर मत्त जणू महिषाधिपती
छबि अति मोहक गे तव पार्वति सुंदर केश मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती ।।1.2


सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते।।
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।2

करिसि कृपा नित देवगणांवरि राक्षस मारिसि घोर अती
वधुनिच दुर्मुख भीषण राक्षस हर्षभरा अति हो मनसी
त्रिभुवन पोषण तूचि करी नित सांबसदाशिव तोषविसी
सकलचि पाप हरोनि जगातिल सुस्वर या गजरी रमसी ।।2.1

अति अति क्रोधित दैत्यकुळावरी; दूर मनीचि घमेंड करी
मुनिवर गर्वहि दूर करी झणि सागर पुत्रि अगे जननी
छबि अति मोहक गे तव पार्वति केश तुझेचि मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती ।।2.2


अयि जगदम्ब मदम्ब कदम्बवनप्रियवासिनि हासरते
शिखरिशिरोमणितुङ्गहिमालय-शृंगनिजालय-मध्यगते
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।3

तुज जगदंब कदंब वनाप्रति प्रेम असे अति पार्वति गे
करुनि मनोरथपूर्ति जनांचि प्रसन्न मनी असशी नित गे
सदन तुझे अति उंच हिमालय उंच कड्यांवर उंच अती
मधुर स्वभाव तुझा जननी; परि मारियले मधु कैटभही ।।3.1

करि तुकडे तुकडे महिषासुर दैत्य विराटचि मारुनि गे
मधुर मधाहुनि हास्य तुझे; तुज रासक्रिडा बहु आवडते
छबि अति मोहक गे तव पार्वति केशकलाप मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती ।।3.2


अयि निजहुँकृतिमात्रनिराकृतधूम्रविलोचनधूम्रशते
समर-विशोषित-रोषितशोषित-बीजसमुद्भव-बीजलते
शिव शिव शुम्भ-निशुम्भमहाहवतर्पितभूतपिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।4

अगं गिरिजे तव गर्जन ऐकुनि धूम्रविलोचन मृत्युमुखी
`समरविशोषिणि' सार्थ विशेषण `रक्तबिजा' गिळसी सहजी
नरकपुरीपथ दाविसि सत्वर शुंभ-निशुंभ रिपूंसि झणी
फिरशि रणी रणरागिणि -तेजस भूत-पिशाचगणांमधुनी ।।4.1

छबि अति मोहक गे तव पार्वति केश सुरेख मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती ।।4.2


अयि शतखण्डविखण्डितरुण्ड-वितुण्डित शुण्ड गजाधिपते
निजभुजदण्डनिपातितचण्ड-विपाटितमुण्डभटाधिपते
रिपुगजगण्ड-विदारणचण्डपराक्रमशौण्डमृगाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।5

तुडवित छिन्न विछिन्न कलेवर घालि धुमाकुळ जोचि रणी
गणपति तो तव पुत्र असे जननी करण्यास सहाय्य तुसी
उचलुनि आपटिला रणि दानव चंड असे अति क्रूरकृती
थयथय नाचलि मुंड उरावरी संगर जिंकुनि तू जननी ।।5.1

अति बलवान गजावरि घे मृगराजचि झेप रणी सहजी
असशि तयाचिच स्वामिनि मंगल वाहन हा तव होई रणी
छबि अति मोहक गे तव पार्वति रेशिम केस मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती ।।5.2

धनुरनुषङ्ग-रणक्षणसङ्ग-परिस्फुरदङ्ग-नटत्कटके
कनकपिशङ्गपृषत्कनिषङ्गरसत्भटशृङ्गहताबटुके
हतचतुरङ्गबलक्षितिरङ्ग-घटद्बहुरङ्ग-रसद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।6

तळपत राहसि स्फूर्तिप्रदायिनि हाति धनुष्य सुसज्ज अती
स्फुरण मिळे तव रूप सुदर्शन पाहुनि वीरवरांस मनी
शर सजले पर लावुनि पिंगट घेउनि दानव जे लढती
रणचि दणाणुन जाय असे अति घोर ध्वनी खल ते करिती ।।6.1

असुर वधोनिच ते सहजी चतुरंग दलासि फजीत करी
पसरति रक्त सडे धरणीवर; क्रंदन दानव ते करिती
छबि अति मोहक गे तव पार्वति कुंतल दाट मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।6.2


अयि रणदुर्मद-शत्रुवधाद्धुर-दुर्धरनिर्भर-शक्तिभृते
चतुरविचारधुरीणमहाशय-दूतकृत-प्रमथाधिपते
दुरित-दुरीह-दुराशय-दुर्मति-दानव-दूतदुरन्तगते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।7

खुमखुमि भारिच दैत्यकुळा समरांगणि दाविन शौर्य अशी
चतुर परी शिव धाडिसि दूत म्हणोनि तया असुरां जवळी
परि अविवेकिच राक्षस मानित ना पथ सौख्यद हाचि मुळी
म्हणुनिच दुर्गति प्राप्त तयांसिच दुष्ट खलांशिच तू लढुनी ।।7.1

छबि अति मोहक गे तव पार्वति हे तव केश मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।7.2


अयि शरणागत- वैरिवधूजन-वीरवराभयदायिकरे
त्रिभुवनमस्तक-शूल-विरोधि-शिरोधिकृतामलशूलकरे
दुमिदुमितामर-दुन्दुभिनाद-मुहुर्मुखरीकृत-दिङ्गनिकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।8

तुज चरणी नत वैरि स्त्रियागण आश्रय मागती वीर किती
अभयचि देत त्रिशूळ तयां झळके तव हा तिनही भुवनी
अमल करी धरि दैत्य शिरासि, जसे धरले फळ तूच करी
डुमडुम दुंदुभि वाजवि देव निरंतर ज्या घुमतीच दिशी ।।8.1

छबि अति मोहक गे तव पार्वति केशकलाप मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।8.2


सुरललनाततथेयित - थेयित-थाभिनयोत्तर-नृत्यरते
कृतकुकुथा-कुकुथोदिडदाडिक - –तालकुतुहल गानरते
धुधुकुटधूकुटधिन्धिमितध्वनि –- धीरमृदङ्ग - निनादरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।9

तुज पुढती सुरसुंदरि या तकथै तकथै करि नर्तनची
दिड दिड दा कुकुथा कुकुथा अशि वाद्य अनेक ध्वनी करती
धुधुकुट-धूकुट धिंधिम बोल सुरेलचि गुंजति दाहिदिशी
रमलिस नर्तनि गायनि वादनि मुग्ध स्वरांनिच चिंब सखी ।।9.1

छबि अति मोहक गे तव पार्वति सुंदर केश मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।9.2

जयजय-जाप्य-जये जयशब्द –परस्तुतितत्पर-विश्वनुते
झणझण-झिञ्झिम झिङ्कृतनुपूर-शिञ्जितमोहितभूतपते
नटितनटार्ध -नटीनटनायक - –नाटन- नाटित - नाट्यरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।10

जग नतमस्तक या चरणी तव भक्त करी जयघोष स्तुती
झिणि झिणि वाजत हे तव नूपुर मोहित त्यावरि भूतपती
कुणि नटले पुरते, कुणि अर्ध नटेचि, नटी नट नायकही
विसरुनि भान करी स्तुति नर्तन, त्याचि सवे करि नृत्य तुही ।।10.1

छबि अति मोहक गे तव पार्वति सुंदर केश मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।10.2


अयि सुमनः सुमन: सुमनः सुमनः सुमनोरमकान्तियुते
श्रितरजनीरजनीरजनीरजनीरजनीकरवत्रभृते
सुनयनविभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमराभिहते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।11

विमलमती जणु देवगणांसम कल्पतरू-सुमनासम तू
सुजनजनांसम निर्मळ कोमल नित्य असे अति पावन तू
शरदऋतूतिल रात्र जणू सुखदायिनि शीतल शांतिच तू
वदन तुझे अति सुंदर सोज्वळ भासतसे शशि पूर्णचि तू ।।11.1

कमलचि नील तसे तव नेत्र तयावरि भृंग फिरे फसुनी
मधुकर त्रासित हे मुखमंडल चंचल शोभतसे तुजसी
छबि अति मोहक गे तव पार्वति सुंदर केश मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।11.2


महितमहाहववल्लभ-तल्लक-वल्लिक-रल्लित-भल्लिरते
विरचितवल्लि-कपालिक-पल्लिक –झिल्लिक-भिल्लिक वर्गवृते
श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारुण-–तल्लज—पल्लव-सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।12

लढतिच सैनिक संगर भीषण घेति विराम कधी शिबिरी
मधुरचि छेडिति तार कुणी स्वरसुंदर त्यातचि तू रमशी
वनि शिवसेवक पर्णकुटीत वसे तिथं तूचि निवास करी
किरकिर रातकिडे करती जवळी अदिवासि स्त्रिया फिरती ।।12.1

सुमन सुगंधित किंचित तांबुस पर्णविभूषित कर्णभुषा
तुजसि दिसेचि मनोहर सुंदर मोहक रूप खुले सुषमा
तुझि कुरळी कुरळी मन मोहवि श्यामल लोभस केशभुषा
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तूच उमा ।।12.2


अयि सुदतीजन-लालस-मानस-मोहन-मन्मथराजसुते
अविरलगण्डगलन्मदमेदुरमत्तमतङ्गगजराजगते
त्रिभुवनभूषण-भूत-कलानिधिरूप-पयोनिधिराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13

चमकति दात सुरेख अशा रमणी मनि उत्सुक त्यां भुलवी
मदन जया शिव भस्म करे; वर देउनि मानिसि पुत्र तयी 
मद स्रवतो शिरि त्या गजराजसमा गजगामिनि चाल तुझी
त्रिभुवन भूषण चंद्र समा जलधीतुन येशि धरेवरती ।।13.1

छबि अति मोहक गे तव पार्वति केश मनास तुझे भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।13.2


कमलदलामल- –कोमलकान्ति - –कलाकलितामल –- भाललते
सकल-विलास-कलानिलय-क्रमकेलिचलत्-कलहंस कुले
अलिकुल-सङ्कुल-कुन्तलमण्डल-मौलिमिलिन्द-बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।14

मउमउ कांति तुझी मखमालि सरोजदलासम उज्ज्वलशी
अमल असे तव भाल विशाल तयावर चंद्रकला सजली
अति मनमोहक चाल तुझी जणु हंसचि ऐटित हा विहरी
बकुलफुलांवरि गुंजति भृंग तशा उडतीच बटा तवचि ।।14.1

छबि अति मोहक गे तव पार्वति केश तुझे भुलवी मजसी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।14.2


करमुरलीरव –वर्जित-कूजित-लज्जित-कोकिल-मञ्जुमते
मिलितमिलिन्द-मनोहर-गुञ्जित-रञ्जितशैल-निकुञ्जगते
निजगणभूत-महाशबरीगण-रङ्गणसम्भृत-केलिरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।15

मधु मधु बासरि ऐकुनि गे तव कोकिलतान विरेचि नभी
कुहु कुहु बोलति होउनि लज्जित येउनि बोल तुझ्या जवळी
तरळति व्याकुळ भाव मुखी तव भक्त सुखी करण्यास्तवची
तव मुख ते अति व्याकुळ मोहक सुंदर भासतसे जननी ।।15.1

अति अति ऊंच गिरीवर पर्णकुटी तुजला प्रिय फार सखी
भ्रमर जिथे करि गुंजन वेलि फुलांवरि श्राव्य असे बहुची
तुजभवती करि नृत्य सख्या वनवासि, तयांसह नृत्य करी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।15.2


कटितटपीत-दुकूल-विचित्र-मयूखतिरस्कृत - चण्डरुचे
जितकनकाचल -मौलिमदोर्जित -गर्जितकुञ्जर-कुम्भकुचे
प्रणतसुराऽसुर- मौलिमणि-स्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।16

कटिस असे तव वस्त्रचि रंगित पाहुनि सूर्य खजील मनी
कनकचि भासतसे वनराज सुवर्णगिरीहुनि श्रेष्ठ अती
गजशिरि घे वनराजचि झेप अशी कि, करी गज तो चि चि ची
गजशिर भव्य तसे तव वक्ष असे जन-पालक हे जननी ।।16.1

मुकुटहि ठेविति पायि तुझ्या सुरश्रेष्ठहि दैत्य-कुळे सगळी
उजळवि रत्नप्रभा मुकुटांचि, हि र्‍यासम शुभ्र नखे पदिची
छबि अति मोहक गे तव पार्वति केशकलाप मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।16.2


विजित-सहस्रकरैक -सहस्रकरैक -सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक-संगरतारक-संगरतारक-सुनूनुते
सुरथ- समाधि - समान –समाधि-समान-समाधि - सुजाप्यरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।17

हरि मिळवी यश सूर्य सहस्रचि जिंकुनियाचि सहस्र करे
अखिलचि देवगणांसि उपकृत तारक मारुनि स्कंद करे
अथक करी स्तुति स्कंद, मुकुंद, अजिंक्य सुवीर सदा तव गे
 सुरथ करी तव नाम जपासिच वैश्य-समाधि करी स्तवने॥17.1

छबि अति मोहक गे तव पार्वति  सुंदर केस मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।17


पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलय स कथं न भवेत्
तवपदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।18

पदकमले तव आठविता नित मंगल जीवन देसि उमा
कमलनिवासिनि द्वैत हरी कमलेक्षण भेटवि चित्ति मला
तव पदब्रह्मचि एक असे मज अन्य गती न मला कमला
जलधिच तूचि दयेचि तरी मग सांग करी न कसे कुशला॥18.1

छबि अति मोहक गे तव पार्वति केशकलाप मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।18.3


कनकलसत्कलसिंधुजलैरनुषिञ्जति ते गुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भ-नटीपरिरम्भ-सुखानुभवम्
तव चरणं शरणं करवाणि सुवाणि पथं मम देहि शिवम्
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।19

कलश सुवर्णचि त्यात असे जल शिंपित जे तुज आठविती
अनुभवती नित स्वर्गसुखासिच ते सुरसुंदरि भोगितिची
तुजसि सरस्वति मंगल वंदन दे मज मंगल वाणि तुझी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।19


तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं कलयन्ननुकूलयते
किमु पुरुहूत-पुरिन्दुमुखी-सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते
मम तु मतं शिवमानधने भवतीकृपया किमु न क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।20

तुकवित मानचि सम्मतिदर्शक चंद्र म्हणे तुज चंद्र दुजा
नजर झुके ललनांचिहि स्वर्गि तुझे नवरूपचि न्याहळिता
शिव समजे तुज गौरव त्यासि; कृपा तव काय करी न जगी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।20


अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननीति यथाऽसि मयाऽसि तथाऽनुमताऽसि रमे
यदुचितमत्र–भवत्पुरूगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।21

जवळ करी दयनीय जनांसि तशीच कृपा असु दे मजसी
जननि जशी जगताचिच तूचि तशी मज पुत्र स्विकार करी
मजवरि राहि कृपा; जवळी तुझिया नित ठेव मला जननी
उचित करी मम तू कमले शरणागत मी तुजसी तुजसी ।।21.1

छबि अति मोहक गे तव पार्वति सुंदर केस मना भुलवी
जय जय हे महिषासुरमर्दिनि नित्य यशस्विनि तू जगती।।21.2 

असा हा श्री रामकृष्ण विरचित भगवतीपाद्यपुष्पांजली म्हणजेच महिषासुरमर्दिनी स्तोत्राचा मराठी भावानुवाद अरुंधतीने पूर्ण केला.
----------------------------------




10 comments:

  1. Brilliant! He perfect metre madhe basvayla kiti vel lagla asel! Khup chhan.

    ReplyDelete
  2. मी खूप दिवसांपासून या स्तोत्राच्या शोधात होते, इथं मूळ स्तोत्र तर मिळालंच, शिवाय त्याचा अनुवादही मिळाला...फार सुंदर झालाय अनुवाद! नक्की अवघड गेलं असेल..धन्यवाद..

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. काव्य अनुवाद करावा तर तुम्हीच असे म्हणावे लागेल इतके
    तुम्ही छान अनुवाद केले आहेत , म्हणजे ह्याचे कौतुक करायला शब्दच अपुरे पडतील
    असे काम आपण केले आहे. - धन्यवाद

    ReplyDelete
  5. Hari Oum,
    I am Chitra Raje. We met at the book publication ceremony by Lotus Publication. I read this translation of Mahishasurmardini stotra. Its really amazing. According to Marathi Vrutta Yati & Alankar translation is quite a big job But you did it so well and perfect. I achieved real happiness.Thank You very much. Daily I am reading one article after other. Thank u once again

    ReplyDelete
  6. फारच सुंदर कल्पना आणि रचना.

    ReplyDelete
  7. हे तर माझ्या आवडीचं स्तोत्र.
    भावार्थ माहित नव्हता आपल्यामुळे कळला.
    अभिनंदन! धन्यवाद!

    ReplyDelete


  8. Skip to content
    Using Gmail with screen readers

    5 of 1,632
    [अनुवाद पारिजात] New message received.
    Inbox
    x

    Blogger Contact Form
    Wed, Sep 18, 7:55 PM (9 days ago)
    महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे आदि शंकराचार्यांनी रचलेले आहे, आपण कवी रामकृष्ण यांनी रचले आहे असं लिहिले आहे. या बाबतीत खुलासा करावा. Regards, बालासाहेब अवचट | bala

    Arundhati Dixit
    2:51 PM (3 minutes ago)
    to बालासाहेब

    नमस्कार.
    हे स्तोत्र श्री आद्य शंकराचायर्य यांचे नाही. हे स्तोत्र निर्णयसागर प्रेस मुंबई ह्यांच्या बृहत् स्तोत्र रत्नाकर च्या दुसर्‍या भागात आहे.
    ते भगवतीपद्यपुष्पांजली ह्या नावाने आहे. त्याचे रचयिता श्री रामकृष्ण कवी आहेत. प्रचलित स्तोत्रापूर्वी वेगळे सहा श्लोक आहेत.
    हरिगुरुपदपद्मं शुद्धपद्मेऽनुरागाद्विगतपरमभागे सन्निधायादरेण । तदनुचरि करोमि प्रीतये भक्तिभाजां भगवति पदपद्मे पद्यपुष्पांजलिं ते ।। 3
    ह्या तिसर्‍या श्लोकात स्तोत्राचे नाव आहे. स्तोत्र 30 श्लोकांचे आहे. 29 व 30 व्या श्लोकात कवीने स्वतःची नाममुद्रा ठेवली आहे.
    रमयति किल कर्षंस्तेषु चित्तं नराणामवरजवरयस्मात् रामकृष्णः कवीनाम् ---- । असे म्हटले आहे. 30 व्या श्लोकात हा रामकृष्ण कोण हे सांगतांना
    श्रीपतेः सुनूना कारितो यः अधुना विश्वमातुः पदे पद्यपुष्पांजलिः । ।30
    असा स्पष्ट उल्लेख आहे.

    ReplyDelete
  9. Is it not Kanakmanjiri Vritta ? Please give the matra of Sarvatabharan vrutta. Thanks .

    ReplyDelete