देव्यपराधक्षमापणस्तोत्र - प्रस्तावना



                                 श्री जगद्गुरू शंकराचार्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली. गाणपत्यांसाठी गणेश स्तोत्रे लिहिली. शाक्तांसाठी देवी स्तोत्रे, शैवांसाठी शिवस्तोत्रे तर वैष्णवांसाठी विष्णुस्तोत्रे लिहिलीगहन अशा वेदांताचा अर्थ सहज उलगडून दाखवणारीही अनेक स्तोत्रे लिहिली.  `ब्रह्मसूत्र भाष्य' सारखा अनमोल ठेवाही त्यांचाच आहे. अध्यात्माच्या वेगवेगळ्या पातळीवर असणार्या समाजातील विविध स्तरावरील लोकांसाठी ही विविध विभागणी आहे. हरि, हर, गणपती, देवी हे भेद स्वतः आचार्य जरी मानत नसले तरी समाजातील लोकांचा बुद्धिभेद करता त्यांनी आपापल्या आराध्य दैवताला अनन्य भावाने शरण जावे ह्यासाठी लिहिलेली ही स्तोत्रे आहेत. समाजाच सूक्ष्म निरीक्षण करून ही स्तोत्रे लिहिली आहेत. `देव्यापराधक्षमापणस्तोत्र ' हे  त्यापैकीच एक फार सुंदर स्तोत्र आहे.
                 ह्या स्तोत्रात सर्व बाजूंनी आगतिक झालेल्या माणसाचे वर्णन करतांना आचार्य म्हणतात,-  ‘खरच गं आई! मी खरोखरीच वाईट आहे. आजपर्यंत मी काहीही चांगलं केलं नाही. एकदाच मिळणार्या सोन्यासारख्या आयुष्याचं मी मातेरं केलं.आळस, कंटाळा, दुर्गुण तर माझ्या पाचवीलाच पुजले आहेत. आता सुधारावं इतका वेळही उरला नाही. आयुष्य संपायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. एवढं वाईट वागल्यानंतर मी जगाकडून माझ्याशी चांगलं वागण्याची अपेक्षा तरी कशी करू?' अशावेळी प्रत्येकाला एकाच व्यक्तीची आठवण येते. ती म्हणजे आई! आईच्या कुशीत डोकं खुपसून हमसून हमसून रडावं सगळं सगळं मन मोकळं करावं आणि तिने आपल्या केसात मायेनी हात फिरवून आपल्याला जवळ घ्यावं असंच वाटतं . हे स्तोत्र वाचतांना प्रत्येकाला वाटते जणु काही आपलेच मनोगत लिहिले आहे. आपले अपराध आपल्याला स्वस्थता लाभू देत नाही. जगाला विदित नसलेले अपराध विवेकाच्या टोचणीमुळे मनाला विद्ध करतात.
               अतिशय कोमल मनाच्या संतांना आपल्या आजुबाजुच्या समाजाला पाहिल्यावरबुडते हे जग पाहवेना डोळा' अशीच उलघाल होते मग ते तुकाराम असोत ज्ञानदेव असोत अथवा जगद्गुरु  शंकराचार्य असोत. मुंगीचही मनोगत जाणुन घेऊ शकणार्या जगद्गुरुंनी आईच्या मायेने लिहिलेले हे स्तोत्र! समाजातील बहुसंख्य लोकांच्या मनात चाललेल्या अनेक आवर्तनांचं रेखाटन आचार्यांनी यात सुंदर रेखाटले आहे. ह्या समाजातील बहुसंख्यांनाब्रह्म सत्यं जगत्  मिथ्या' हे उच्च कोटीचे तत्वज्ञान  पचण्यासारखं नाही . ज्या अर्भकाला भाताची  पेज जेमतेम पचते त्याला पंचपक्वान्न देऊन कसे चालेल? अशा समाजाला दूर लोटता आचार्यांनी पश्चात्तापाच्या  अश्रुंनी धुवून स्वच्छ केले. आईच्या मायेने जवळ घेतले आणि तू किती जरी वाईट वागला असलास तरीहीकुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता भवति' म्हणून दिलासा दिला. आजही ही ओळ प्रत्येकाच्या ओठावर असते याचं खरं कारण ती माणसाच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्यावर अगदी पंच्यऐंशींव्या वर्षीही त्याला सुधारण्याची संधी देते. मागचं आयुष्य गंगेला मिळालं आता तरी पश्चात्तापदग्ध अंतकरणानी  जी कधि वाईट असूच शकत नाही अशा त्या आई भवानीला शरण जा. तिचं स्मरण करं योग्य गोष्टींचा अंगिकार कर ती तुला दूर लोटणार नाही. ती आई भवानी कोणी वेगळी नाही.प्रत्येकाच्या हृदयातील विवेक हेच तिचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच तिला  `जगदंब ' सार्या जगाची आई म्हणून संबोधलं गेलं आहे. ह्या स्तोत्राच्या मिशाने त्या समाजपुरुषाच्या विवेकरूपी अंगारावरील राख आचार्यांनी झटकून टाकली आहे. ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि। ' या उक्तिचं महात्म्य पटवून दिले . अनन्य भावाने नामस्मरण कर. तुझं जीवन सुसह्य होईल, सुखाचं होईल.असा मार्ग दाखविला. आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या समाजाला दिलासा दिला
                      हे करतांना त्यांनी समाजाचे सर्व दोष स्वतःवर आरोपित केले. अगदि खर्याखुर्या आई सारखे. आई लोकांना सांगतांना सांगते. ‘आज आम्ही काय केलं माहित आहे का? आज आम्ही पडलो. आज आम्ही रडलो.' बाळ खुद्कन हसतं त्याला आठवतं मी पडलो होतो. मी रडलो होतो. आचार्य म्हणतात. मी पंच्याऐंशी वर्षाचा झालो देवपूजा सोडून दिली. मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि  परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया। मला मंत्र स्तोत्र पूजा काही काही येतं नाही. मनातून आपल्यालाही  आपलंच हे चित्रण मनोमन पटतं. त्याचवेळी एक सुंदरसा मार्गही गालिचा उलगडत जावा तसा आपल्यासमोर उलगडत जातो. आई झालेल्या आचार्यांचं बोट धरून आपण तो स्विकारतो. ब्रह्मपदी राज्य करणार्या या महात्म्याने स्वतःचं मोठेपण इतकं खुबीने बाजुला ठेवलं आहे की ह्या सारस्वताची ओळ न् ओळ वाचून प्रत्येकाला वाटावं हा कोणीतरी माझ्यासारखाच अगदि माझ्या जवळचा आहे.
बाळाला ताप येईल म्हणून काळजीने आई सांगते बाळ उन्हात जाऊ नको हं! बाळ उन्हात धावतो. त्याच्या पाठी आईही त्याला सावलीत आणायला धावते. बाळ म्हणतो- ‘बघ तू मला उन्हात जाऊ नको म्हणालीस ना आणि आता तूच उन्हात धावत आहेस.' तशीच चूक आपणही आचार्यांच्या बाबतीत कधि कधि करतो. आपण म्हणतो- ‘आचार्य तर आपणहून म्हणत आहेत की ते पंच्याऐंशी वर्षाचे आहेत. त्यांनी देवपूजाही सोडून दिली आहे'. खरेतर असे सगळ्यांना वाटायला  लावणे  हाच ह्या महात्म्याचे मोठेपण सिद्ध करणारा खरा निकष आहे.
----------------



                                



No comments:

Post a Comment