।। श्री जगन्नाथाष्टकम् ।।


Image result for free download pictures of  lord jagannathImage result for free download pictures of  lord jagannathImage result for free download pictures of  lord jagannath

(वृत्त - शिखरिणी, अक्षरे-17,गण -य म न स भ ल ग, यति 6,11)

कदाचित्कालिन्दी-तटविपिन-सङ्गीतकवरो
मुदा गोपीनारीवदनकमलास्वादमधुपः।
रमा-शंभु-ब्रह्माऽमरपति-गणेशार्जितपदो
जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे।।1

( संगीतकवर: संगीतात रममाण झालेला,गाण्याचा छंद लागलेला )

कधी कालिंदीच्या तटि विहरतो श्याम हरि हा
सुरांमध्ये जाई हरवुनि कधी गीत म्हणता
तरंगे कालिंदी मधुर-सुर-स्वप्नात हरिच्या
हरी-नादब्रह्मा अनुसरति गोपी प्रमुदिता।।1.1

सुरांच्या हिंदोळ्यावर झुलति गोपी भुलुनिया
उरे ना गोपींसी घर समय हे भान मनि वा
घडे अद्वैताचे अनुपमचि ते दर्शन जगा
सुरांनी होई हा परिसर अती धुंद अवघा।।1.2

अशा जीवे भावे हरिमयचि होता गवळणी
मुखांना शोभा ये कुमुदवनिची लोभस कशी
हरीच्या नेत्रांचे मधुकर रसास्वाद करण्या
कधी येती जाती फिरति मुखपद्मांवरिच त्या।।1.3

विधाता वा गंगाधर गणपती इंद्र कमला
तुझ्या पायी येती शरण भगवंता सुरवरा
पुरी स्थानाचा तू अधिपति जगन्नाथ असशी
दिसो माझ्या नेत्री सतत तव मूर्ती सुखमयी।।1.4


Image result for free download pictures of lord Krishna
भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे
दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते।
सदा श्रीमद्वृन्दावनवसतिलीलापरिचयो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।2
( दुकूल- विणलेले रेशमी वस्त्र )

धरी प्रेमे वेणू सुरमधुर ती सव्यचि करी

सुवर्णा रत्नांचा किरिट बहु आकर्षक शिरी
किरीटी मोराचे खुलुन दिसते पीस तुजसी
जरीकाठाचे हे झुळझुळित पीतांबर कटी।।2.1

कटाक्षासी टाकी हळुच तिरक्या लोभस अती
सख्यांना पाही तू हळुच हसुनी खोडकरची
तुझ्या या लीलांनी जणु अवतरे स्वर्ग भुवनी
महद्भाग्याने ही झळकतचि वृंदावनपुरी।।2.2

व्रजाच्या लीला हा परिचय तुझा कौतुकमयी
उभा राहे नेत्री स्मरण तव होताचि हृदयी
तुझ्या या लीलांचा पट उलगडो दृष्टिपुढती
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।2.3

Image result for free download pictures of lord Krishna

महाम्भोधेस्तीरे कनकरुचिरे नीलशिखरे
वसन्प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना।
सुभद्रामध्यस्थः सकलसुरसेवाऽवसरदो
जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे।।3

असे नीलाद्रिच्या कुशित तव प्रासाद रमणा
समुद्राच्या तीरी तळपत असे स्वर्णमय हा
तयांचे तेजस्वी कळसचि निळे हे झळकती
निळ्या लाटांची ही अभिनव असे नक्षि पुढती।।3.1

तुझ्यासंगे आहे हलधर प्रभावी तुजसमा
सुभद्रा लाडाची बहिणहि मधे संगति तुझ्या
इथे देवांना तू तव चरण सेवा घडविली
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।3.2

Image result for free download pictures of  lord jagannath

कृपापारावारः सजल-जलद-श्रेणि-रुचिरो
रमा-वाणी-सोम-स्फुरदमल-पद्मोद्भवमुखैः।
सुरेन्द्रैराराध्यः श्रुति-गण-शिखा-गीतचरितो
जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे।।4

( श्रेणिरेखा,श्रुंखला, पंक्ती,ओळ,दल,संचय,समुह। रुचिर- उज्ज्वल,चमकदार,प्रकाशमान,सुंदर,मनोहर,ललित,स्वच्छंद । रमा- लक्ष्मी। वाणी – - सरस्वती । सोम - चंद्र।)

निळ्या आकाशी या सजल जलदांचे दल जसे
फिरे स्वच्छंदाने भुरळ हृदया घालित असे
मना मोही तैसा; बरसवि सुखाच्या नित सरी
दयावीरासी या हृदयि अनुकंपा अमित ही।।4.1

असो वाग्देवी वा कमलवदना कोमल रमा
असो ब्रह्मा पद्मोद्भवचि अथवा चंद्र नभिचा
                   असो वा देवांचा अधिपतिच देवेंद्र चि महा                     तुझ्या सेवेसी हे  सकल असती तत्पर पहा।।4.2

जसे ताकामध्ये नवनित असे श्रेष्ठ अवघे
तसे वेदांमध्ये उपनिषद हे श्रेष्ठ गणते
सुखे तेही गाती नित गुण तुझे अद्भुत अती
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।4.3



रथारूढो गच्छन्पथि मिलित-भूदेवपटलैः
स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः।
दयासिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया
जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे।।5

( भूदेवः - ब्राह्मण। पटल समुच्चय,राशी। )

रथाची पाहोनी तव जय पताकाचि दुरुनी
पथी पाहोनीया अवचित रथारूढ तुजसी
दुतर्फा मार्गाच्या थबकति द्विजांचे गण किती
तुझे जागोजागी स्तवन करिती हे ऋषिमुनी।।5.1

तुझ्या कल्याणाची करिति मनि इच्छा सकलही
तयांच्या प्रेमाने तव गहिवरे चित्त सहजी
द्विजांचे सार्‍या त्या नित कुशल कल्याण करिसी
करे दीनार्तांसी स्मित तव चि आश्वासित मनी।।5.2

गमे प्रत्येकाला जणु गवसला प्राण मजसी
मिळाला जन्माचा मजसिच सखा सर्व म्हणती
रमा रम्या नित्या करित तुजसी सोबत अशी
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।5.3


Image result for free download pictures of lord Krishna

परब्रह्मापीड: कुवलयदलोत्फुल्ल-नयनो
निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि।
रसानन्दो राधासरसवपुरालिङ्गनसुखो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।6

( आपीड- मुकुट ; परब्रह्मापीडः - सर्वश्रेष्ठ असे परब्रह्म हाच ज्याचा मुकुट आहे असा श्रीकृष्ण ;  रसानन्द: रसो वै सः - तो आत्मा परमात्मा म्हणजे परब्रह्म रसस्वरूप आहे. ; सरस भक्तिने अनन्य प्रेमाने परिपूर्ण ; अनन्त  अनन्ताच्या कुळात जन्मलेला कालियासर्प )

असे कैवल्याचा मुकुटमणि तू कृष्णसखया
सुखावे चित्तासी तव नयन नीलोत्पलसमा
करी वास्तव्यासी अनुपम अशा नीलशिखरी
 शिरी कालीयाच्या तव उमटले दिव्य पद ही।।6.1

असे आनंदाचा निरतिशय आनंद हरि हा
सुखाचे आहे ते परमसुख तू अक्षयचि वा
तुझ्या प्रेमाने जी विसरलि जगासी सकल या
तुझ्या राधेला त्या हृदयि धरिले प्रेमभरिता।।6.2

तुझ्या या रूपाचे मजसि घडु दे दर्शन हरी
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।6.3

Image result for free download pictures of lord KrishnaImage result for free download pictures of lord Krishna


वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकता भोगविभवे
याचेऽहं रम्यां निखिलजनकाम्यां वरवधूम्।
सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो
जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे।।7

अपेक्षा ना चित्ती मज कनक राज्यादि कसली
नको ऐश्वर्याचे विविध कुठले भोग मजसी
नको कांता रम्या सकल जन जे इच्छिति मनी
दिसो माझ्या नेत्री सुखद तव मूर्ती शिवमयी।।7.1

गणांचा स्वामी हा प्रथमपति गाई तव स्तुती
जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी।।7.2


हर त्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते
हर त्वं पापानां विततिमपरां यादवपते।
अहो दीनानाथं निहितमचलं पातुमनिशं
जगन्नाथ: स्वामी नयनपथगामी भवतु मे।।8

( असार नीरस,व्यर्थ,क्षणभंगुर । )

जसा नाचे पाण्यावर बुडबुडा तो क्षणभरी
तशा या संसारा धरुनि बसलो व्यर्थ परि मी
करा या दुःखाचे निरसन तुम्ही हो यदुपती
करावे पापांचे कमलनयना क्षालन तुम्ही।।8.1

अहो दीनोद्धारा! स्मरुनि तव लौकीक जगती
तुम्हा पायी राहे दगड बनुनी निश्चल अती
तुझ्या प्राप्तीची रे मम हृदयिची आस पुरवी
जगन्नाथस्वामी मम नयनि राहो तव छबी।।8.2

-----------------------------------------------------------

Image result for free download pictures of  lord jagannathImage result for free download pictures of  lord jagannathImage result for free download pictures of  lord jagannath


(नंदन नाम संवत्सर, कार्तिक पौर्णिमा, 28 नोव्हेंबर 2012)





1 comment: