।। अन्नपूर्णास्तोत्रम् ।।


                          ।। न्नपूर्णास्तोत्रम् ।।

       काशीला गेल्यावर काशीविश्वेश्वराच्या दर्शनानंतर अन्नपूर्णेचं दर्शन घेतल्यावरच काशीची तीर्थयात्रा पूर्ण होते. अन्नपूर्णा ही विश्वेश्वराची अर्धांगिनी आाहे. विश्वाची अधिष्ठात्री आाहे. सकल विश्वाला ती अन्न पुरवते. म्हणूनच तिला अन्नपूर्णा म्हणतात.अशा ह्या जगन्मातेला श्री आाद्य शंकराचार्य भिक्षा मागत आाहेत ज्ञान आाणि वैराग्याची!

  श्री आाद्य शंकराचार्य रचित हे स्तोत्र वाचकांच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही.                              



(वृत्त  शार्दूलविक्रीडित अक्षरे- 19, गण- , यति- 12,7)


नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी

निधूर्ताखिलघोरपापनिकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।

प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।1


( वराभयकरी - वर  अभय करी - वर आणि अभय देणारीप्रालेयम् -  हिम,  प्रालेय + अचल = प्रालेयाचल -  हिमालयनिकर: - ढीग, समूह,संग्रह ) 

जाई वाटत हर्ष, प्रेम, अभया भक्तांस तू सर्वदा

त्यांचे पूर्ण करी मनोरथ सदा माते तुझी ही कृपा।

हे लावण्य तुझे मला गमतसे रत्नाकराच्या समा

नाही पार तया, विशाल इतुके हे  नित्यची नूतना।।1.1


पापांचे धुवुनीच पर्वत महा  भक्ता करी पावना

प्राणाहून असेचि तू प्रिय शिवा, माहेश्वरी  सर्वदा

झाला धन्य पिता तुझा हिमगिरी घालून जन्मा तुला

सारा वंशचि दिव्य हा तुजमुळे हे पार्वती शैलजा।।1.2


काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।1.3





नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी

मुक्ताहारविडम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी

काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।2


( विचित्र -  निरनिराळ्या रंगांचे  मुक्ताहार-  मोत्यांचे हार  विडम्बमान - शोभून दिसणे ; काश्मीर - केशर ; आगर - एक सुवासिक  पदार्थ )

मोत्यांचे  अति पाणिदार रुळती कंठी तुझ्या हार हे

हाती कंकण बाजुबंद, कटिसी ही मेखला शोभते

सोनेरी वसनात मूर्ति तव ही मोही मना माय गे

अंगी चंदन कस्तुरी उटि तुला ही केशराची रुचे।।2.1


पाचू माणिक पुष्कराजचि हिरे सिंहासना भूषवी

सोन्याची झळके प्रभावळ तया तैसीच आडंबरी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।।।2.2





योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरी

चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।

सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।3


होता तन्मय चित्त जे मिळतसे सारे समाधीसुखं

योगाचे सुख ते मिळे तुजमुळे माते अनायास गं

नाशी भीषण शत्रु तूच सहजी निर्धोक मार्गा करी

ठेवी तेवत सेवका हृदि सदा तू धर्मनिष्ठा भुवी।।3.1


तेजस्वी सवित्यासमान कधि वा चंद्रासमा शीतला

वाटे अग्नि शिखा कधी धधकती पाहून माते तुला

तीन्ही लोक असे सुरक्षित सदा माते कृपेने तुझ्या

भक्तांना करिसी प्रदान सगळे ऐश्वर्य तू गे महा।।3.2


भक्तांचे तपही फळे तुजमुळे सिद्धी मिळे साधका

आशीर्वाद तुझा सदा मिळतसे जो तोषवी सेवका

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।।।3.3





कैलासाचलकन्दरालयकरी गौरी ह्युमा शाङ्करी

कौमारी निगमार्थगोचरकरी ह्योंकारबीजाक्षरी।

मोक्षद्वारकपाटषाटनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।4


( उमा -   म्हणजे हे बाळे हे मुली , मा म्हणजे नको. उमा म्हणजे  हे मुली एवढी तपश्चर्या नको करूस  कौमारी - कुमार कार्तिकेयाची आई म्हणून कौमारी )


कैलासी गिरिकंदरी तप महा  केलेस जेंव्हा उमे

तेंव्हाबाळ, नको करू तप असेसारे मुनी बोलले

इच्छाशक्ति अजोड पाहुन तुझी स्वीकार शंभू करी

तेंव्हा तू गिरिजा तया अवसरी झाली उमा शांकरी।।4.1


अग्नीनंदन कार्तिकेय तुजला आई म्हणे आपुली

कौमारी म्हणती म्हणून तुजला सारे अती आदरी

चित्ती ज्ञानप्रदीप लावुन करी सोपाच वेदार्थ ही

सम्यक् ज्ञानचि व्हावया तव उमे ओंकार हा मंत्रची।।4.2


मोक्षाची सहजीच तू उघडसी माते कवाडे पुरी

हे निःसीम अगाध प्रेम तव गे वर्षेच भक्तांवरी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।4.3




दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी

लीलानाटकसूत्रलेखनकरी विज्ञानदीपाङ्कुरी।

श्रीविश्वेशमन:प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।5


( विभूति - ताकद,महिमा,दैवी शक्ती, देव देवता, )


जेथे अंशचि ईश्वरी वसतसे ऐश्या विभूती जगी

काही या दिसतीच दृश्य जगती अदृश्य याची किती

त्यांना तू नित मार्गदर्शन करी सामर्थ्य देसी तया

हा ब्रह्माण्ड-घडा तुझ्याच उदरी आहेच सामावला।।5.1


ह्या विश्वात घडेचि जे प्रतिदिनी लीला तुझी श्यामले

विश्वाची नित सूत्रधार असशी तू खेळवी विश्व हे

ज्ञानाचे नित चेतवीच हृदयी स्फुल्लिंग तू  आगळे

मोक्षाचा पथ स्पष्ट हा दिसतसे भक्तांस त्याच्या बळे।।5.2


विश्वेशासचि शांतवी कृति तुझी कल्याणकारी महा

त्याचे चित्त प्रसन्न नित्य करिसी मांगल्यदायी उमा

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।5.3





आदिक्षान्तसमस्तवर्णनिकरी शम्भुप्रिया शाङ्करी

काश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी।

स्वर्गद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।6


( शर्वरी -रात्र , अज्ञानी लोकांसाठी मोहाची झोप आणणारी किंवा झोपविणारी;  शर्व -सर्वसंहारक असा शंकर त्याची पत्नी शर्वरी )


धातू, प्रत्यय, अक्षरे असशी तू वर्णमालेतली

वाणीचे असशीच वैभव खरे तूची अधिष्ठान ही

अर्धांगी शिवशंभुची प्रिय अती प्राणेश्वरी शांकरी

विश्वाची जननी  त्रिनेत्र तव हे माते अलौकीकची।।6.1


स्वर्गाचे नित द्वार तू उघडसी भक्तांस तू शर्वरी

मोहाची दुलईच घालुन सुखे मूढांस तू झोपवी

तूची गे त्रिपुरेश्वरी सुरमणी काश्मीरची सुंदरी

कांती ही तव केशरासम असे तांबूस गौरांग ही।।6.2


काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।6.3





उर्वी सर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी

वेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी

साक्षान्मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।7


( उर्वी - विस्तृत जमीन, भूमि ; वेणि: किंवा वेणी - केसांची वेणी किंवा गंगा यमुना सरस्वती नद्यांचा संगम ; जय इंद्रियनिग्रह किंवा विजय )


भूमाता अति वंद्य थोर असशी संपन्न तू श्यामला

माते  नित्यचि अन्न हे पुरविसी तू जीवसृष्टीस या

गंगा थोर, सरस्वती यमुना ह्या निम्नगांनी तुझी

काळीभोरचि गुंफिली त्रिपदरी वेणी अती साजिरी।।7.1


मोक्षाचा पथ दाविसी मुनिजना कल्याण त्यांचे करी

 तूची संयम निग्रहास शिकवी साफल्य दे जीवनी  

 काशीची झळके ध्वजा तुजमुळेवाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।7.2






देवी सर्वविचित्ररत्नरुचिरा दाक्षायणी सुन्दरी

वामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।

भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।8


( सौभाग्य - पतिपत्नींमधील दृढ विश्वास,प्रेम,सामजस्य ; दशाशुभहरी - दश अशुभ हरी - दहाप्रकारच्या पापांचा नाश करणारी ; दश अशुभ - चोरी, हिंसा,परस्त्रीगमन ही तीन कायिक पापे, कठोर बोलणे, खोटे बोलणे, निंदाचहाडी करणे, असंबद्ध प्रलाप ही चार वाचिक पापे तर दुसऱयाचा अपहार करण्याचा विचार करणे, अनिष्ट चिंतन करणे, खोटा अभिनिवेश बाळगणे ही तीन मानसिक पापे मिळून दहा प्रकारची पापे होतात.)


रत्नांचे किति आगळे विविध हे अंगावरी दागिने

लावण्या खुलवी मनोहर तुझ्या हे दक्षपुत्री   शिवे

माते स्तन्य पिऊन अमृतसमा हे विश्व साकारले

सर्वांचे हित पाहसीच सुभगे शंभूस तू आवडे ।।8.1


भक्तांच्या नित कामना पुरविसी, त्यांनाच तू सोडवी-

सार्या कायिक, मानसीक अथवा वाचीक पापातुनी

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी ।।8.2





चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशी चन्द्रांशुबिम्बाधरी

चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।

मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।9


जैसे येति सहस्र भानु उदया वा चंद्र  कोट्यावधी

तेजस्वी चमकेचि अग्नि जणु वा तैसीच कांती तुझी

मानेसी कलवून किंचित जशी  येई नभी कोर ती

तैसी ही जिवणी प्रसन्न हसरी शांती भंगे तुझी।।9.1


कानी कुंडल हालताचि पसरे दिव्य प्रभा चारु गे

वाटे  तेज समग्र एकवटले भानू शशी अग्निचे

चंद्रार्कासचि ओतुनी मुशिमधे मूर्ती घडे का तुझी

तेजाची पुतळीच तू लखलखे  सर्वांग-तेजोमयी।।9.2


माला, पुस्तक, पाश, अंकुश धरी हातात तू वत्सले

माते तू उपकार थोर करिसी कीर्ती तुझी सांगते

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।9.3





क्षत्रत्राणकरी महाभयहरी माता कृपासागरी

सर्वानन्दकरी सदाशिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी।

दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलम्बन करी मातान्नपूर्णेश्वरी।।10


देवी तू नित क्षात्र तेज असशी या क्षत्रियांचे रणी

चित्तीचे भय घोर सर्व हरुनी, रक्षी तयां संगरी

माते पार नसे कृपेस तुझिया तू गे दयाळू अती

भक्तांना सुखवी अपार करुणा कल्याणकारी तुझी।।10.1


दक्षाचा पुरताच तू उतरवी नक्षाच यज्ञात गे

अर्पूनी तव दिव्य देह समिधा त्या यज्ञकुंडात गे

तेंव्हा दक्षप्रजापतिहि रडला ताठा तयाचा विरे

आहे पूर्णचि विश्व थोर अवघे हे मालकीचे तुझे।।10.2


ब्रह्मांडी नित ठायि ठायि भरले ऐश्वर्य तेची तुझे

भक्तांना करिसी निरामय सखे रोगा निवारून गे

काशीची झळके ध्वजा तुजमुळे, वाराणसी-स्वामिनी

भिक्षा दे मजला कृपा करुनिया  हे अन्नपूर्णेश्वरी।।10.3





अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे।

ज्ञानवैराग्यसिध्यर्थं भिक्षां देहि पार्वती।।11


अन्नभांडार हे राहे माते अक्षय हे तुझे

गुण भांडारही राहे माते अक्षर हे तुझे॥


अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे

पंचप्राण शिवाचे तू शिव-शक्तीच तू असे॥


झोळीत माझिया घाली भिक्षा एकचि मायगे

ज्ञान वैराग्य लाभाया मजला दृढ भक्ति दे॥




माता  पार्वती देवी पिता देवो महेश्वर:

बान्धव: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्।।12


माताच पार्वती देवी पिता माझा महेश्वर

शिवभक्त असे बंधू  घर हे  भुवनत्रय ।।12



-----------------------------------------------



श्रावण शुद्ध नवमी, 15 ऑगस्ट, 2013




No comments:

Post a Comment