श्रीकृष्णाष्टकम्

Image result for lord vishnu free download picture
                श्री आद्य शंकराचार्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच सन्यास घेतला. त्यांचा हा  निर्णय आईला रुचला नव्हता. परंतु गोष्टच अशी घडली की आईला आपल्या एकुलत्या एक पुत्राला अनुमती देण्यावाचून पर्यायच राहिला नाही.
                  एके दिवशी पूर्णा नदीत स्नान करायला गेलेल्या बाळ शंकराचा पाय मगरीने पकडला. त्या बलाढ्य मगरीच्या तावडीतून शंकराला वाचविण्यासाठी पुढे यायला कोणीही धजेना. एकुलता एक पुत्र मरणाच्या दाढेत सापडलेला पाहून आई रडू लागली. त्यावेळी बाल शंकराने अतिशय आर्तपणे आईला सांगितले, `` आई तू मला सन्यास घेण्याची आज्ञा दे म्हणजेच मी या मगरमिठीतून सुटेन. तू स्मरण करशील तेंव्हा मी तुला भेटत राहीन.'' आईने परवानगी दिली. मगरीने पाय सोडला. आणि संसाराच्या मगरमिठीतून बाल शंकराची सुटका झाली. बाळ शंकर बाहेर आल्यावर आईने त्याला प्रेमाने पोटाशी घेतले. जेंव्हा शंकर सन्यास घेऊन जायला निघाले तेंव्हा त्यांच्या मातेने विचाररले, ``बाळ मी स्मरण करताच तू मला भेटशील हे ठीक आहे पण तू माझा एकुलता एक पुत्र आहेस तू सन्यास घेतल्यावर माझा अंत्यसंस्कार कोण करेल?'' आचार्य म्हणाले, `` आई तू चिंता करू नकोस मी स्वतः तुझा अंत्यसंस्कार करीन.''
                  त्याप्रमाणे आई आसन्नमरण असतांना मातेने त्यांची आठवण केल्याबरोबर आचार्य मातेसमोर येऊन उभे राहिले. मातेची अंतकाळची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे श्रीकृष्णाष्टक रचले. श्रीकृष्ण प्रसन्न झाले. आचार्यांना त्यांच्या मातेस दर्शन देऊन त्यांना कृतार्थ केले. शेवटच्या श्लोकात तसा उल्लेखही आढळतो.

श्रीकृष्णाष्टकम् 

(वृत्त - शिखरिणी, अक्षरे -17, गण - , यति – 6,7,पाद )

श्रियाश्लिष्टो विष्णुः स्थिरचरवपुर्वेदविषयो
धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः।
गदी शङ्खी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः ।।1

( शरण्य - –आश्रयस्थान,विश्रामस्थल,पालक, प्रतिपोषक, रक्षक  स्थिर  शाश्वत, नित्य, रुचि  प्रकाश,कान्ति,आभा,उज्ज्वलता )

सवे राही ज्याच्या कमलनयना नित्य कमला
उरे व्यापूनी जो अखिल जगतासीच नित या
असे काया ज्याची चल अचल हे विश्व सकला
दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण सुखदा ।।1.1

जया जाणायाला निगमचि असे एक सबला
कळे थोडा थोडा निगम-वचनातूनि लव हा
विवेकाचा साक्षी, अमल विमला न्यूनरहिता
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।।1.2

अगा नेत्रांसी ज्या कमल फुलले हीच उपमा
करी दुःखांचे जो हरण; सुख देई परम वा
खळांना दैत्यांना यमसदन दावी वधुनिया
दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण मधुरा।।1.3

गदा शंखा चक्रा करि धरुनि खड्गास लिलया
स्वभक्ता रक्षाया सतत कटिबद्धा सजग हा
रुळे कंठी मुग्धा वनसुमनमाला परिमला
दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो कृष्ण मजला।।1.4

अती तेजस्वी जो अचल अविनाशी नित नवा
तिन्हीलोकस्वामी तुजविण कुठे आश्रय दुजा
विसावा विश्वाचा सकल जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरतचि तो  कृष्ण हरि हा 1.5


(निगम वेद)

यतः सर्वं जातं वियदनिलमुख्यं जगदिदं
स्थितौ निःशेषं योऽवति निजसुखांशेन मधुहा
लये सर्वं स्वस्मिन् हरति कलया यस्तु विभुः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषय।।2

(वियत् आकाश,अंतरिक्ष,निरभ्र व्योम  अनिल वायु)

जगाच्या उत्पत्ती समयि जग हे विस्मयभरे
धरे आकाराला मिळवुनि तुझ्यातूनि सगळे
महा भूते नाना जल पवन आकाशचि निळे
असे हा विश्वाचा अगणित पसारा तुजमुळे।।2.1

स्थिती काळी त्याचे भरण करितो तूचि हरि रे
निजानंदाच्या या लवभरचि थेंबातुन पुरे
लयाच्या वेळेला जगत अवघे जे पसरले
स्वतःमध्ये सामावुन सहजि घेईच पुरते।।2.2

विसावा विश्वाचा  परम जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण मधुहा।।ध्रृ.


असूनायम्यादौ यमनियममुख्यैः सुकरणै-
र्निरुद्ध्येदं चित्तं हृदि विलयमानीय सकलम्
यमीड्यं पश्यन्ति प्रवरमतयो मायिनमसौ
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः।।3

(असु  प्राण  प्रवर  मुख्य, प्रधान, सर्वश्रेष्ठ, पूज्य, सर्वोत्तम, ज्येष्ठ  मायिन्  ब्रह्म)


जयाचा घेण्यासी अनुभव हृदी संत जन हे
प्रयासे पाळोनी यम नियम ते उत्तमपणे
करीती प्राणांचे नियमन अती योग्य रितिने
मना आणोनिया बसविति हृदी स्थीर बरवे ।।3.1

करोनी चिद्रूपी विलिन चपळा चित्त अवघे
हृदी ज्या चिद्रूपा अनुभवति ते निश्चितपणे
विसावा  विश्वाचा सकल जगजेठी हरिच जो
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि तो।।3.2


पृथिव्यां तिष्ठन् यो यमयति महीं वेद धरा
यमित्यादौ वेदो वदति जगतामीशममलम्।
नियन्तारं ध्येयं मुनिसुरनृणां मोक्षदमसौ
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः।।4

जरी राहे पृथ्वीवर भरुनि हाची चहुकडे
करी पृथ्वीचेही नियमन तयी राहुनि पुरे
जगाचा स्वामी जो परम विमला पावन असे
धरा ना जाणे हे वदति सगळे वेद बरवे।।4.1

जया प्राप्तीसाठी तळमळति हे संत अवघे
असे देवांचेही परमपद जे ध्येय मनिचे
मिळे मोक्षाचेही परम सुख ज्याच्या अनुग्रहे
जना सामान्यांना, अति विनित संतांसहि तसे ।।4.2

विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।।ध्रृ.


महेन्द्रादिर्देवो जयति दितिजान् यस्य बलतो
 कस्य स्वातत्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमृते।
कवित्वादेगर्वं परिहरति योऽसौविजयिनः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषय।। 5

जयाच्या सामर्थ्ये विजय मिळवी देवगण हे
असे ज्याच्या सारे जगत नित आधीन सगळे
नसे कोणालाही क्षणभरचि स्वातंत्र्य कृतिचे
कविंचा जेत्यांचा उतरवि अहंकार समुळे।।5.1

महेंद्राच्याही जो सहजि करितसे गर्वहरणा
जगाचा स्वामी जो अधिपति अनासक्त हृदया
विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।। 5.2


विना यस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखां
विना यस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति  जनता।
विना यस्य स्मृत्या कृमिशतजनिं याति विभुः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः।। 6

विना ध्याना ज्याच्या पशुच उरतो मानव जगी
विना ज्ञाना ज्याच्या मरणभय चित्ता कुरतडी
समर्थाचे ह्या ज्या स्मरण करवेना लव मनी
मिळे त्यासी कृमी-किटक शतदा जन्म जगती।। 6.1

विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण मधुरा।।6.2



नराशङ्कोट्टङ्कः शरणशरणो भ्रान्तिहरणो
घनश्यामो वामो व्रजशिशुवयस्योर्जुनसखः
स्वयंभूर्भूतानं जनक उचिताचारसुखदः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः।।7

( टङ्क - कुर्हाड,तलवार)

शठांना संहारी, सुजन नित रक्षी सजग जो
मनी संदेहाला वितळवि, विवेका उठवितो
जलाने संपृक्ता घन जणु हवासा जनमनी
मना मोही मेघासम घननिळा श्यामल हरी।। 7.1

हवासा वाटे जो  व्रजचिमुकल्यांना सुहृदची
सखा पार्थाचाही विजयपथ दावी विमल ही
असे विश्वाचा या जनक परि नाही जनक ज्या
अजन्मा आहे जो मरणचि अनंता कुठुनि त्या।। 7.2

सदाचारी ऐशा सुखवि सुजनांसी प्रभुचि हा
असे सन्मार्गी जो, कणखरचि आधार नित त्या
विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।। 7.3


यदा धर्मग्लानिर्भवति जगतां क्षोभकरणी
तदा लोकस्वामी प्रकटितवपुः सेतुधृगजः।
 सतां धाता स्वच्छो निगमगणगीतो व्रजपतिः
शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः।।8

सुधर्माचे जेंव्हा डळमळित सिंहासन पडे
समाजी सारेची नियम तुडवी पायदळि हे
अधर्माला लाभे जनमनि प्रतिष्ठा सहजि गे
म्हणेत्राही - त्राहीसकल जन ते आर्त हृदये।।8.1

अशावेळी पृथ्वीवर अवतरे जो जनहिता
सुधर्माची सत्ता बळकट करायास हरि हा
उभा राही पाठी अभयबळ देण्या सुमतिना
व्रजाचा राणा हा विमल पथदर्शी प्रभु पुन्हा।।8.2

नसे वेदांनाही विषय कथण्यासी हरिविणा
मुखी गाती त्याचे गुणविभव ते हर्षभरिता
विसावा विश्वाचा सकलजगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा।।8.3


(वृत्त  मालिनी, अक्षरे 15, गण   , यति-8,15)

इति हरिरखिलात्माराधितः शङ्करेण
श्रुतिविशदगुणोऽसौ मातृमोक्षार्थमाद्य।
यतिवरनिकटे श्रीयुक्त आविर्बभूव
स्वगुणवृत उदारः  शङ्खचक्राब्जहस्तः।।9

मिळवुनि निज माते द्यावया मोक्ष साचा
मधुर स्तुति करोनी श्रीधरा आळवीता
हरि प्रकट जहाला योगिश्रेष्ठासमोरी
धरुनि करि गदा ही  शंख चक्रासवेची।।9.1

सकल गुण युता जो वर्णिला वेदशास्त्री
हरि परम उदारू द्यावया मोक्ष मुक्ती
सकलचि अभिलाषा पूर्ण केली तयानी
बघुनि हरि समोरी धन्य ती माय झाली।।9.2


------------------------------------------------------


खर नाम संवत्सर,माघ कृ. नवमी (दासनवमी) /16फेब्रु.2012

 Image result for Shri Krishna free download picture


No comments:

Post a Comment