गोष्ट ध्रुवाची आपल्या सगळ्यांची !


                 एक होता राजा . त्याच नाव होतं  उत्तानपाद. उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या.  एकीचं नाव होतं?  - -- - काय बर?  --  ``सुलुची '' आपल्या बोबड्या बोलात  माझ्या नातवाने सांगीतलं. ``शाब्बास!  - - सुरुची!'' - मी! ``आणि दुसरीचं नाव होतऽऽऽऽऽ!'' ``सुनीती.'' त्याने परत माझं वाक्य पूर्ण केलं. तेवढ्यात माझी मैत्रीण निर्मला दारात उभी राहिली. ``अरेवा! आपलीच गोष्ट सांगत आहेस होय! ''  आत येता येताच ती म्हणाली. ``म्हणजे मी नाही समजले? '' न समजून माझा प्रश्न. नावाप्रमाणेच निर्मळ असलेली निर्मला म्हणाली, `` म्हणजे ही तर आपल्या सर्वांचीच गोष्ट आहे.''  `` ती कशी काय?'' न राहवून मी म्हणाले. निर्मला सांगू लागली - -
          
       तीच ध्रुव बाळाची गोष्ट पण मोठ्यांसाठी - -     
            एक होता राजा. त्या राजाचं नाव होतं उत्तानपाद! जो सिहासनावर बसतो तो एकमेव राजा समजला जातो. प्रत्यक्षात राजाचा अर्थ तेवढ्यापुरताच मर्यादित  नाही. राजाचा अर्थ विस्तृत आहे. राजा हा शब्द अधिकार दर्शविणारा आहे. कुठलाही अधिकार हाती असला किंवा कुठल्याही अदिकारपदावर  माणूस बसला की त्याचा `उत्तान - --पाद ' राजा होतो. मी लोकांसाठी, जनतेसाठी बरंच काही करू शकतो हे विचार पालटून मी काहीही करू शकतो. मीच इथला सर्वेसर्वा आहे  मला कोण अडवणार ह्या मजलेपर्यंत विचारांची हिम्मत वाढते. पाय जमिनीवरून सुटतात. आणि माणूस हवेत तरंगायला लागतो. विवेकाची संगत सुटते. 
                आपल्या धर्मात पत्नीला फार महत्व आहे. ती सहचरी असते. प्रत्येक कामात तुमच्या सोबत असते. आजन्म पतीसोबत असते. पत्नीला कामिनी म्हणतात. कामिनी म्हणजे जी नेहमी पतिजवळ कसली ना कसली तरी कामना करते ती.  अशा ह्या उत्तानपाद राजालाही त्याच्यावर अधिकार गाजविणार्‍या बुद्धीरूपी दोन राण्याही असतात.  अर्थात दोन राण्या असल्या की त्यांच एकमेकींमधे बिनसलं म्हणुनच समजा. आपापल्या गुणावगुणांमुळे एक राणी आवडती तर दुसरी नावडती ठरणार हेही ओघाने आलेच! मनाला गोड वाटेल, मनाला ज्यात रुची वाटेल, असे स्वैर वागायचे प्रलोभन देणारी सुरुची तर न्याय्य मार्गावरून चालण्यासाठी त्याला सतत दटावणारी त्याची सदसद्विवेकबुद्धी म्हणजेच सुनीती. नीती म्हणजे जी नेते ती आणि सुनीती म्हणजे जी सन्मार्गावर नेते ती. माणसाचं मन सतत ह्याच द्वंद्वामध्ये दोलायमान असतं. सुरुची का सुनीती? माणसाच्या ह्या दोलायमान अवस्थेत सर्व इंद्रिये एका बाजूस तर  माणसाची सदसद्विवेकबुद्धी दुसर्‍या बाजूस अशी रस्सीखेच चालू असते.
इंद्रिये म्हणतात. आपल्या रुचीनुसार वागायचच नसेल तर जगण्यात काय गंम्मत? खा, प्या, आराम करा, मौज करा, मजा करा हेच तर जीवन! स्वरुची हीच सुरुची वाटते. तीच चांगली वाटते.   अर्थात सुरुची ही प्रत्येकाचीच आवडती राणी असणार हे सांगायलाच नको. बघता बघता तो ह्या सुरुचीचा कधी गुलाम होतो ते त्यालाच कळत नाही. 


                 एका बासरीवाल्याची गोष्ट होती. तो गावातल्या उंदरांना बासरीच्या सुरावर भुलवून नदीवर नेऊन बुडवून टाकतो. गावकरी त्याच्या कामाचं मोल देत नाहीत. मग बासरीवाला गावातल्या सर्व मुलांना बासरीच्या सुरात भुलवून नदीकडे घेऊन जायला लागतो. त्याप्रमाणे सुरुची किंवा स्वरुची माणसाला भुलवते. इंद्रियांना जे जे आवडतं. ते ते त्यांना लाभलं की ती संतोष पावतातात.  तेच त्यांना गोड वाटतं. माणसं सुरुचीच्या पाठीमागे पागल होऊन फिरत राहतात. पण हा मार्ग खोल गर्तेत नेणारा आहे हे त्यांना कळत असूनही. एखाद्या सभ्य दिसणार्‍या चोराने गोड बोलून तुमच्याशी मैत्री करावी  आणि आडवाट येताच त्याचा  खरा चेहरा कळावा अशी ही सुरुची सर्व इंद्रियांना नादी लावून माणसाचा घात करते. गळाला लावलेलं आमिष गिळेतोवरच माशाला ते छान वाटतं. पण त्या अमिषाच्या आत असलेला गळ त्याच्या घशात अडकताच प्राणांतिक वेदनेने तो तडफडु लागतो. फासेपारध्याच्या फाशात किंवा जाळ्यात  प्राणी किंवा पक्षी जाणूनबुजून जात नाही पण फासे पारध्याने प्राण्यांना चकविण्यासाठी सापळ्याला लावलेला प्रणी किंवा पसरलेले धान्य हे सहज मिळण्याजोगे, आयते , विनासायास उपलब्ध आहे असे प्राण्यास वाटते आणि तिथेच तो फसतो. सुरुचीचेही असेच आहे.  सुरुचीने माणूस काही काळासाठी सुखावतो. त्याला सर्व काही सहज, सोपे, उत्तम चालले आहे असे वाटते. सुरुचीमधुन उत्पन्न होणारा हा क्षणैक आनंद लवकरच संपतो.
                 माणसाची सदसद्विवेकबुदधी मात्र माणसाच्या मनाला सतत टोचणी लावत असते. त्याला पुढच्या आपत्तीची कल्पना देत असते.  आपल्या स्वरुचीचे, सुरुचीचे ऐकून काम करण्याने पुढे येणार्‍या आपत्तीची जाणीव करून देत असते. त्याला त्या अन्याय्य मार्गावर जाण्यापासून परावृत्त करत असते. स्वरुचीप्रमाणे वागणं म्हणजे सापाशी खेळ. वाघाशी मैत्री. कालकूटाचे प्राशन. असे निक्षून बजावत असते.
                           इंद्रियांच्या आहारी गेलेला उत्तानपाद सर्व कळत असूनही सरळ मार्ग सोडून  भलतीकडेच जातो.  आणि मग जे व्हायला नको तेच होत जातं. जे जे टाळायला बघावे तेच शोधत येऊन त्याला  चिकटते. विरक्त व्हावयास बघावे तो उपाधित पडावे अशी अवस्था होते. पातकांना चकवायला गुहेत दडावे म्हणावे तर गुहेच्या तोंडाशीच मोहाने त्याला गिळावे. अशी त्याची स्थिती होते.
सुनीती माणसाच्या गुण, कर्म आणि परिस्थितीवश त्याने स्विकारलेले योग्य काम- - ज्याला विहित कर्म म्हणता येईल ते विहित कर्म  योग्य प्रकारे कर असं बजावत असते. तोच त्याचा स्वधर्म. दुसर्‍याचा आचार जरी बरा वाटला तरी आपले काम आपल्यास बरे. दुसर्‍याचे घर राजवाड्यासारखे असले म्हणून का कोणी आपली झोपडी मोडतो? दुसर्‍याची नोकरी लाखभर रुपये देणारी आहे म्हणून कोणी आपली हजारांची नोकरी सोडतो का?  सुरुची पासून मिळणारं फळं हे कितीही उत्तम वाटलं तरी शेवटी माणसाचा घात करणारंच असतं. सुनीती पासून मिळणारं फळ एका अढळ, अक्षय अशा चांगल्या मार्गावर घेऊन जाणारं असतं.  तोच हा सुनीती पुत्र ध्रुव!

 हीच उत्तानपादाची दोन मुल! उत्तम आणि ध्रुव. एक दिवस उत्तानपाद राजा सुरुचीचा मुलगा उत्तम ह्याला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला होता. सुरुचीमुळे मिळणारं सुख माणसाला नेहमीच हवहवसं असतं. पण सुनीतीच्या पथावरील सदसद्विवेक कुठे स्वस्थ बसतो तोही धावत येतोच आणि तोही तू मला जवळ कर म्हणून सांगतो. द्विधा मनाचा माणूस अक्षय विवेकाला म्हणजेच ध्रुवाला जवळ करायला जातो, पण त्याच्या जुन्या सवयी, त्याची स्वरुची, - - - त्याची सुरुची त्याला थोडीच स्वस्थ बसू देईल?  ध्रुवाचं मांडीवर बसणं सुरुचीला कसं खपेल? अहंकार, घमेंड ह्याची मूर्तिमंत पुतळी सुरुची ध्रुवाला म्हणते, - `` बच्चमजी तू राजाचा मुलगा असला म्हणून काय झालं? सिंहासनावर बसण्यासाठी माझ्या गर्भातूनच जन्म घ्यावा लागतो. अजून तुला तेवढी अक्कल आली नाही; म्हणूनच तुझी कुवत नसतांनाही तू सिंहासनावर बसायचे उंचउंच मनोरे बांधत आहेस. सिंहासनावर बसायचं असेल तर तुला भगवान पुरुषोत्तमाचीच आराधना करून माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल. (भागवत - आठवा अध्याय, 11,12, 13 श्लोक) नाश जवळ आला की सुरुचीला होणारी ही उपरती असावी. विवेकाच्या पथावरून जाणार्‍या ध्रुवाला अरे जा जा!  श्री पुरुषोत्तम, - - - म्हणजेच सर्व सद्गुणांची उपासना कर असे हिणवत का होईना जेंव्हा सुरुची सांगते तेंव्हाच गोष्ट कलाटणी घेते. 
                  उत्तानपादाच्या सर्व सुखसोयीयुक्त गुबगुबीत मांडीवरून सुरुचीने दूर ढकलल्याशिवाय माणूसही सुनीतीच्या मार्गाला लागत नाही.  काठीचा मार बसल्यावर साप जसे फुत्कार टाकायला लागतो तसा मनातल्या विवेकाला डिवचल्यावर तो जागृत व्हायला लागतो. ध्रुवबाळासारखा. सावत्र आईच्या कठोर वचनांनी विद्ध झालेला ध्रुवबाळ रागाने धुमसत होता. त्याचे ओठ रागाने थरथरत होते. श्वासाची गतीही वाढली. लांब लांब उच्छ्वास टाकत त्याने आपल्या पित्याकडे पाहिलं. उत्तानपादही चुपचाप बसला होता. उत्तानपादाला सोडून ध्रुव  तडक आपल्या आईकडे सुनीतीकडे आला. सुनीतीने ध्रुवाला आपल्या कुशीत घेतलं. ध्रुव हुंदके देऊन देऊन रडतच होता. जेंव्हा महालातल्या इतरांकडून तिला सुरुचीचं बोलण कळलं तेंव्हा तिला फार वाईट वाटलं. तिचाही धीर सुटायला लागला. खरं आहे. जेंव्हा माणूस सुरुचीच्या पूर्ण आहारी जातो तेंव्हा सुनीतीची गत काय होणार? पण त्याही परिस्थितीत सुनीती  आपला न्याय्य पथ सोडत नाही. ती ध्रुवाला सांगते,  `` बाळ, राजाला  मला राणीच काय पण दासी म्हणायचीही लाज वाटते. पण तुझी  सावत्र आई जे म्हणाली तेच खरे आहे. आता तुला भगवान पुरुषोत्तमाला शरण जाऊन ज्ञान मिळवणे हाच एक उपाय आहे. ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान हेच सर्व दुःखावरील उपाय आहे.  तू कोणाचं अमंगल चिंतू नकोस. जो दुसर्‍याला दुःख देण्याचा प्रयत्न करतो त्याला स्वतःलाच त्याचं फळं भोगायला लागतं.  सुरुचीकडून झालेली अवहेलना मनात एक छोटीशी ठिणगी पेटवते. ध्रुवबाळासारखी छोटीशी! --  पण त्याला आपल्या ध्येयासाठी उद्युक्त करणारी. सुनीतीच्या मार्गावर चालण्यासाठी तुफान बळ देणारी.                      अशावेळी उत्तानपादाचे राज्य सोडून ध्रुव निघतो. त्याचवेळेस ध्रुवाला नारदमुनी भेटतात. विवेकाला कृतीची जोड देणारे! साक्षात गुरू ! गुरू म्हटल्यावर ते परीक्षा बघणारच! ते ध्रुवाला वारंवार परत जायला सांगतात. तू अजून लहान बाळ आहेस असेही सांगून बघतात. मान अपमान सगळ्यांचेच होत असतात. पण असंतोषाचं मूळ हे मोह आहे असेही सांगून बघतात. जे दैवात असेल ते स्वीकारावे आणि त्यात संतुष्ट रहावे असेही सांगून बघतात.
            पण ह्या कशानेच ध्रुवाच्या मनाचे समाधान होत नाही. तो म्हणतो ``भगवान! सुखदुःखाने ज्यांचे मन चंचल होते त्यांच्यासाठी आपण हा चांगला उपाय सांगीतला. पण मी अज्ञानी  आहे. माझी दृष्टी तेथपयर्यंत पोचतच नाही. मी एक क्षत्रीय़ असल्याने कदाचित माझ्यात विनयाचा अभाव आहे पण आता मात्र मला अशा जागी आरूढ व्हायचे आहे जिथे माझे वडिलच काय पण आजे पणजे देखिल पोचू शकले नाहीत. आणि पुढेही कोणी पोचू शकणार नाही.'' 
          नारदांनी जणु ध्रुवाच्या  हृदयात रोवलेला संकल्पाचा खुंटा हलवून किती बळकट आहे ह्याचीच परीक्षा केली. त्याची अढळ ध्येयासक्ती पाहून नारद संतुष्ट झाले. त्यांनी त्याला ज्ञानमार्ग दाखवला. सुनीतीच्या मार्गावर अनेक संकटांचे काटेकुटे, प्रलोभनांचे चकवे, लोकांनी केलेल्या अवहेलनांचे पोळणारे ऊन, मोहाचे निसरडे मार्ग, त्याला त्याच्यावरून चालायला परावृत्त करत असतात. पण ध्येयाची ठिणगी त्याला कुठल्याच संकटाची, मोहाची तमा न बाळगता पुढे जायला शिकवते. - - त्याचे अढळ ध्येय साध्य होईपर्यंत तो तपश्चर्या करतच राहतो. संकटांचे काटे त्याला बोचत नाहीत. प्रलोभनांचे चकवे त्याला दिसत नाहीत. निसरड्या वाटांचे भय वाटत नाही. अवहेलनांचे ऊन त्याला पोळत नाही. त्याच्या मार्गातील त्याचे प्रतिस्पर्धीही हळुहळु सुटत जातात. खरतर त्याला कोणी प्रतिस्पर्धी नसतातच. कारण त्याची कोणाबरोबर स्पर्धा नसतेच. अर्जुनासारखं त्याला फक्त लक्ष्यच दिसत असतं. अशालाच दैवही अनुकूल असतं. कारण दैव म्हणजे तरी काय? माणसाने मागील जन्मात केलेलं सत्कृत्य , पुण्य हेच त्याचं दैव मानले जाते. आपल्या लक्ष्यापर्यंत पोचणं हीच देवाची भेट.'' 

``अरे वा निर्मला '' मी म्हणाले, `` ध्रुवाची गोष्ट तर मनाला फारच पटली; पण पुढे उत्तानपादाचं काय झाल? '' 
``सांगते ! '' निर्मला म्हणाली. ती सांगू लागली, -

                   ध्रुवाला ज्ञानमार्गाची उपासना सांगून नारदमुनी उत्तानपादाच्या राज्यात आले. जेंव्हा आपली स्वतःचीच बुद्धी काम करेनाशी होते तेंव्हा सद्विचारी, ज्ञानी, संतांना शरण जाणं केंव्हाही चांगलं. उत्तानपादानेही नारदमुनींचं स्वागत केलं. त्यांचं चांगलं आदरातिथ्य केलं.  उत्तानपादाची सुनीतीवरील श्रद्धा संपलीच होती. पण सुनीती मुळे मिळणारं श्रेष्ठ फळही आपल्याला सोडून जात आहे हे पाहिल्यावर त्याची चलबिचल होऊ लागली. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला. सुरुचीच्या मागे लागून व्हायचे तेवढे नुकसान झालेच होते. त्याचा म्लान झालेला चेहरा पाहून नारदांनी सूचकपणे विचारलं, `` राजा, सर्व कुशल मंगल तर आहे ना? तुझ्या  उतरलेल्या  चेहरयाकडे पाहून तुला कसली तरी चिंता आतल्या आत पोखरत आहे असे वाटते.'' उत्तानपादाने घडलेली सारी हकीकत सांगीतली. ध्रुवाबद्दल वाटणारी चिंताही सांगितली. नारद मुनी म्हणाले सुनीतीच्या मार्गावरून जाणारा ध्रुव अपयशी ठरणार नाही. तो ज्ञानमार्गाने जात आहे त्यामुळे मोहाच्या जंगलात त्याला चकवा लागणार नाही. स्वार्थ,माया, मोह असे हिंस्र पशू त्याला खाणार नाहीत. तो ज्ञान मिळवूनच परत येईल. 
                                   इकडे ध्रुवाने  घोर तपश्चर्या आरंभ केली. शेवटी शेवटी तर त्याने एका पायावर उभे राहून तप करायला सुरवात केली. एखाद्या हत्तीने नावेत चढण्यासाठी नावेत पाय टाकल्यावर नाव जशी एका बाजूला कलंडेल त्याप्रमाणे एका पायावर उभे राहून तप करणार्‍या  राजकुमार ध्रुवाच्या नुसत्या एका अंगठ्यानेच पृथ्वी कलली. (भागवत चतुर्थ स्कंध अष्टमोऽध्याय,श्लोक79 ) ``पृथ्वीचा कललेला आस गोष्टीतून दाखविण्याची काय नामी योजना आहे '' न राहवून मी म्हणाले.
                              तपश्चयार्या करून परत आलेल्या ज्ञानी ध्रुवाला राजानेही राज्यपद दिले. आणि  खूप वर्ष राज्य करून ध्रुव ध्रुवलोकाला गेला. अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून मरणानंतरही ज्यांची कीर्ति कायम राहिली अशा सर्वांचा हा ध्रुवलोक!
`` निर्मला मग  उत्तम आणि राणी सुरुचीचं कायं झालं? '' न राहवून मी विचारल. `` हो सांगते. '' निर्मला म्हणाली. ``यक्षांच्या बरोबर युद्ध करतांना उत्तम मरण पावला तर उत्तमच्या मृत्यूने दुःखी झालेल्या सुरुचीनेही मृत्यूचाच मार्ग स्वीकारला.'' सुनीती आणि ध्रुव यांना मानाचं स्थान मिळालं की सुरुची आणि उत्तम यांना हीच गती प्राप्त होणार.
 बोलता बोलता निर्मला थांबली. मी विचारांमधे गढून गेले.

                 आपल्या पूर्वजांनी अशा ह्या ध्रुवाची आकाशातल्या अढळ पदी राहणार्‍या ध्रुव तार्‍याशी घातलेली सांगड पाहून मी अवाक झाले होते. निसर्ग, त्याचे नियम, शास्त्र, तत्वज्ञान, मुलांसाठी वाटणारी गोष्ट, मोठ्यांना विचार करायला प्रवृत्त करणारे तेजस्वी विचार या सर्व गोष्टींची एकत्र सांगड घालणारा हा सुरेख गोफ निर्मलाने माझ्या हातात ठेवला होता.

``कमालीची विचार करायला लावणारी गोष्ट आहे.''  थोडसं भानावर येत मी निर्मलाला म्हटलं . निर्मला परत हसून म्हणाली ``मग अजून विचार कर . ध्रुवालाही दोन राण्या होत्या प्रजापतीची मुलगी भ्रमी आणि वायुपुत्री इला. भ्रमीला दोन मुलं होती कल्प आणि वत्सर. वायुपुत्री इलाला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलाचं नावं होतं उत्कल -- आणि  - -- -!   थांब थांब भ्रमी म्हणजे ध्रुव तार्‍या भोवती फिरणारी आकाशगंगा आणि  - -- पुढे आपणही थोडा विचार करा!

No comments:

Post a Comment