आनंद लहरी

 

               श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेले देवी पार्वतीचे हे स्तोत्र म्हणजे एक अप्रतिम काव्य आहे. मूळ संस्कृत मधे असलेले हे काव्य अर्थ समजून म्हटले तर मनात आनंदाच्या लहरी निर्माण होतात. असे हे आनंद लहरी काव्य मराठी कवितेच्या रूपात आपल्यापुढे ठेवत आहे. यथावकाश वृत्तबद्ध स्तोत्र मूळ संस्कृत स्तोत्रासहही ठेवीन. आज हरतालिकेच्या पूजेनिमित्त माझी ही वेडीवाकडी काव्य-पूजा माता पार्वतीला अर्पण!

तुझ्या वर्णना ब्रह्मा निष्प्रभ चार मुखांचा प्रजापती

त्रिपुरारी तो पंचाननही करू शकेना स्तुती तुझी

सहा मुखांचा सुर सेनानी स्कंदही स्तब्ध तुझ्यापुढती

शत जिह्वांचा शेषही येई शरण तुझ्या चरणावरती

तुझ्या गुणांच्या प्रभावळीने ।भल्या भल्यांची अशी स्थिती

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।1

दूध तूप मध द्राक्षे यांची गोडी असते विविध अति

फरक दोन्ही मधला सांगु शकते रसना एकच ती

एक महेश्वर तुला जाणितो मति कुंठित होई वेदांची

वर्णन करण्या तुझ्या रुपाचे आई असे मी अल्पमति

मिळते गंगा सागरी तैसी विलीन शिवातचि तू झाली

शोधित वेडे फिरतो आम्ही तुझेच कोडे लावण्यमयी

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।2

काजळरेखा नेत्री रेखीव मुखात तांबुल रसवंती

आणि ललाटी गंध रेखिले सुगंधी केशर सुवासिनी

मोगरीसम हे मोती टपोरे बिलगुनी बसले तव कंठी

कांचीची ही रेशमी साडी भरजरी शोभे तुझ्या कटी

तुझा ध्यास नित चित्ती माझ्या हिमकन्या तू रूपवती

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।3

मंदारपुष्पमालांची दाटी गं झाली तुझीया वक्षस्थली

नादमधुर झंकार वीणेचा ऐकुन कुंडल तव डुलती

शंकरभामिनी गजगामिनी तू मृगनयनी तू शुभामयी

कमरेमध्ये किंचित झुकली डौलदार अति छबी तुझी

दक्षराज कन्या सती साध्वी भगवती तू कृपामयी

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।4

बाल रवी सम तेजस्वी अति रत्नभूषणे तव जननी

सुवर्ण वर्णावरी शोभती कनकभूषणे सुंदरशी

त्रिनेत्री अंगीकृता सुनेत्रा तु शक्ति शिवाची सारंगी

पीत वस्त्र हे तुझे पार्वती सौदामिनी जणु पांघरली

तालात पावले पडतां या पायी पैजण रुणझुणती

माझीच अपर्णा पूर्णा माते कृपादृष्टी सुख मजला देई

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति।।5

हिमालयाच्या गिरी कंदरी फुलेच अपर्णा वल्लरी ही

शिव शंभू या वृक्षावरती चिद्रूप लता ही विसावली

करपल्लव ही कोमल पाने मौक्तिकमाला फुले अहा

केस काळे भ्रमरची भासे उरोज फलात सूक्तिसुधा

द्वैत अद्वैत फळ भाराने ही झुके सच्चिदानंद लतिका

स्तन्य प्राशुनी दैन्य निमाले दुःखाचा लवलेश ही ना

योगिजनांना घेऊनी जाई मुक्तिपथावर सुदर्शना

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना।।6

उभ्याच वेली किती सुपर्णा गुणकारी प्रिय त्या सर्वांना

मूर्तिमंत वैराग्य असे जी तीच अपर्णा हवी मला

ब्रह्म सत्य या आधारावर ही फुलली मायावेल उमा

नित्य स्थिर कैवल्यमूर्ती जो स्थाणु शिव हा आधार तुझा

तुझीच सेवा आहे हितकर कैवल्याप्रत नेई मला

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमा

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना।।7

पाण्याचे पातळपण तू ची असशी अग्नीची दाहकता

मंत्रातील तू मंत्रशक्ति गे असशी अर्थाची सार्थकता

क्रियाशक्ति तू कार्यामधली तू परंपरांची अखंडता

सकल सिद्धांतांची जननी कुबेर सेवी तव चरणा

आदि संकल्पाची जननी मोक्ष मुक्तिचे तू बीज उमा

त्या परम ब्रह्माची अर्धांगिनी तू मदनालाही धाक तुझा

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमा।।8

वारा वाळु ही गाठ बसेना तसे मन हे तुझ्या चरणी

स्थीर राहिना चंचल अति हे गवसेल कसे माझ्या हाती

चोच उघडो वा ना उघडो पोर चातकाचे लहानगे

जलधर सोडी धारा त्याच्या प्रेमाने अति चोचीमध्ये

काही कळेना मजला माते उपाय काय चंचल चित्ता

सदय हृदय तू आई नको पाठ फिरवू मी बाळ तुझा

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमा।।9

धावून ये तू सत्वर माते दे तुझ्या कृपेचे दान मला

तुलाच आलो शरण सदा मी अन्य कोणी माहीत मला

कल्पलता तू पुरविसी इच्छा छायेत तुझ्या येताच जरा

जरा वागशील विपरीत तर कीर्ती जाईल सोडून तुला

अन्य लता वा कल्पलता हा भेद ही काय उरेल कसा

म्हणुनी सांगतो अखेरचे मी सांभाळ जननी हा बाळ तुझा

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमा।।10

अनन्य भावे शरण तुला मी तुझ्या विना कोणीच मला

नको दूर लोटू गं मजला तुझ्या विना आधार मला

निरालंब लंबोदर माते तुझा लाडका पुत्र जसा

तसेच घे गं अंकी मज तू मानुनी मजला पुत्र तुझा

तुझ्या विना मी जाऊ कुठे गं जाणुन घे माझीच व्यथा

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु गं जयजयकार तुझाच उमा।।11

सुवर्णपद लाभतेच लोहा होता परीसाचा स्पर्श जरा

रस्त्यावरुनही वाहे पाणी ।होते गंगा मिळताच तिला

तसेच अतर्मन ही माझे अतिदूषित हे पापाचरणे

कसे होईल निर्मल माते प्रेम तुझे मजला मिळता

श्रद्धा तुजवरी आहे माझी तुझ्या चरणी मी आलो आता

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु गं जयजयकार तुझाच उमा।।12

कितीक असती देवीदेवता नियम त्यांच्या दातृत्वाला

ब्रह्मदेवही असे सांगतो देशी अज्ञांना तू मोक्षसुधा

ओंजळ माझी लहानशी परी अमर्याद ते देशी मजला

कशास जाऊ कुणाकडे मी तुझाच ध्यास मजला आता

उचित असे ते कर तू माझे आई आलो मी शरण तुला

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु गं जयजयकार तुझाच उमा।।13

स्फटिकांच्या भिंतीनी सजले मंदिर हे रमणीय तुझे

जडविली नाना रत्ने भारी त्यात दिसे तव रूप नवे

प्रासादाच्या शिखरांवरती दिसे चंद्रकला प्रथमेची

मुकुंद ब्रह्मा इंद्र देवगण परिवार शोभा वाढविती

त्रिभुवन सम्राटाची राणी अद्भूत सुंदर भवन तुझे

शब्दच नाही तुझ्या स्तुतीला नमन तुला हे मुकेपणे

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमे

एकमुखाने कसा करु गं मी जयजयकार तुझा माते।।14

शतयज्ञांच्या पुण्यप्रभावे विराजमान जो इंद्रपदी

देवेंद्रही तो अथक करी कैलासवासीनी तुझी स्तुती

सार्‍या सिद्धि हात जोडुनी उभ्या राहिल्या ह्या तुज पुढती

कुटुम्ब तुझे त्रैलोक्यचि सारे या त्रैलोक्याची तू जननी

नगाधिशाची कन्या पार्वति अर्धांगिनी तू या महेशाची

करु शकेना कधी कुणीही तुलना तव सौभाग्याची

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।15

नील अंबर वस्त्र शिवाचे अंगावरती सर्पभूषणे

वृद्ध नंदी हे वाहन शोभे कालकूट भोजनास लाभे

स्मशानभूमि मधे खेळतो सारिपाट  तो तुझ्यासवे

 माहित आहे सार्‍या जगति वैभव अद्भूत तव स्वामीचे

वैराग्य थोर त्याच्या चित्ती जे भूषण त्याचे भाग्य तुझे

तुझ्या स्तुतीसी शब्दही नाही मी कशी करु स्तुती तुझी

आई भवानी सांग मला तू कशी करु मी तुझी स्तुती ।।16

प्रलयचि व्हावा विश्वाचा ह्या विश्वेशाच्या ये सहज मनी

चिताभस्म लावूनी बसावे स्मशानात असे छंद मनी

हालाहल ते येता भूवरी सारे कंपित भयभीत मनी

कंठी धरुनी वीष सकळ ते पशुपती दे विश्वास जनी

हा प्रभाव सारा तुझ्यामुळे संगती तुझी कल्याणकरी

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।17

अद्वितीय लावण्य तुझे हे पाहुनि गंगा घाबरली

घाम सुटुनिया सर्वांगाला जलमय भागिरथी झाली

मलुल झाले वदन तिचे पाहुनी गंगाधर तिजला

माथ्यावरती स्थान देऊनी देई प्रतिष्ठा पुनश्च तिला

स्तुतिस तुझिया शब्द थिटे मी कशी करु गे तवार्चना

एकमुखाने कसा करु जयजयकार तुझाच उमा।।18

केशर कस्तुरी चंदन यांची उटी लावुनी तू स्नान करी

ते पाणी आणि रजकण तव पायीचे विधी एकत्र करी

जशी असावी कमळे सुंदर भूषण ज्याचे सरोवरी

तशी निर्मिली त्यातुन त्याने स्वर्गसृष्टी ही सौंदर्यवती

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।19

आल्हादक या वसंतात अति फुलल्या वेली नवरंगांनी

नाना कमळे तलाव बहरे उपवनी हंसाची गर्दी

मलयपर्वतावरील येई मंद पवन हा आनंदमयी

वायु स्पर्शे जलात निर्मळ तरंग उच्छृंखल उठती

अशा जलाशयी सख्यांसवे तू जलक्रीडा जेंव्हा करीशी

आठविता ते रूप तुझे संसारदुःख विलया जाई

एकमुखाने कशी करु गे आई भवानी तुझी स्तुति

कशी करु स्तुति तुझी मी कशी करु स्तुति तुझी।।20

 

-------------------

 

No comments:

Post a Comment