हनुमत्पञ्चरत्नम्




                        संपूर्ण रामचरित्रात हनुमानाचा महिमा फार मोठा आहे. `` हनुमाना, तुझे आमच्यावर इतके अनंत उपकार आहेत की, तुझ्या एकेका उपकारासाठी मी माझे पंचप्राण जरी तुला अर्पण केले तरी फक्त पाचच उपकारांची परतफेड  होईल. बाकीच्या उपकारांचे ऋण माझ्या माथी तसेच राहील.'' असे प्रत्यक्ष प्रभुरामचंद्रांनी म्हटले आहे.

                    अढळ स्वामीभक्ती, प्रखर वैराग्य, अतुलनीय बुद्धिमत्ता, कमालीचे चापल्य, दृढ इंद्रिय निग्रह,  अशा अनेक गुणांचे उत्तुंग परिमाण असलेल्या हनुमानाचे श्रीमद् आद्य शंकराचार्याँनी केलेले हे सुरेख वर्णन! त्यातील एक एक श्लोक हा रत्नासारखा मूल्यवान आहे. अशी ही पंच रत्न माला आचार्यांनी पवनपुत्रास अर्पण केली आहे.
 (वृत्त- आर्या)

वीताखिलविषयेच्छं जातानन्दाश्रुपुलकमत्यच्छम्
सीतापतिदूताद्यं वातात्मजमद्यभावये हृद्यम्।।

शरद स्पर्श तो होता । सजल जलद त्यजती जसे गगना
रामसखा हृदि येता । विषय तसे त्यजतीच हनुमंता।।1.1

उमलून येति अवघे।  हृदि अष्टसात्विक भाव ते अनघा
श्री रामरंग रंगी । पवनसुत रंगला अवघा।।1.2

गहिवरला प्रेमे हा । वाहे अश्रुंची गाली सरिता
रोमांचित ही काया । वातात्मज धन्य हा झाला।।1.3

हृदयामध्ये माझ्या । स्मरतो मी श्रेष्ठ दूत रामाचा
निर्मळ अंतर्बाही । हा स्पर्शला मम हृदयाला।।1.4




तरुणारुणमुखकमलं करुणारस-पूर-पूरितापाङ्गम्।
संञ्जीवनमाशासे मञ्जुलमहिमानमञ्जनाभाग्यम्।।2

प्रसन्न मुख तव ऐसे। भासे तरुण अरुण उदया आला
नयनी पूरचि लोटे । अलोट वात्सल्य करुणेचा।।2.1

कृतांत अज्ञानाचा । जाळी तू ज्ञानशक्ति ने सदया
संजीवनीच भासे । मज संग तुझाचि पवनसुता।।2.2

तू भाग्य अंजनीचे । तिज पुत्र लाभला गुणसागर हा
महिमा गोड तुझा हा । पावन करो मम रसनेला।।2.3



शंबरवैरि शरातिगमंबुजदलविपुललोचनोदारम् ।
कंबुलगलमनिलदिष्टं बिम्बज्वलितोष्ठमेकमवलंबे ।।3

(शंबर- शंबर नावाचा एक असुर, शंबरवैरि-शंबरासुराला ठार मारणारा मदन, शंबरवैरि-शर-अति-ग - मदनाच्या बाणाच्या पलिकडे असलेला म्हणजे जितेंद्रिय. हे विशेषण शंकराला वापरतात. मारुती हा शंकराचाच अवतार मानतात.)

मदन झुके तुज पुढती । जो विश्वजयी ही बिरुदे मिरवी
निष्फळ बाण तयाचे। सारे सारेचि तुजपुढती।।3.1

वैराग्य थोर मोठे । वाटे अवतार शिवाचा प्रकटे
कमलदलासम शोभे । विशाल नयन तव सुंदर हे।।3.2

पवन वदे अभिमाने । मी धन्य जाहलो पुत्र प्राप्तिने
कुलभूषण हा उजळे। भाग्य सदा माय तातांचे।।3.3

औदार्य श्रेष्ठ विलसे। कमनीय कंठ शंखासम शोभे
बिंबाधर सुंदर तो । मम आश्रयस्थान पावन हे।।3.4



दूरीकृत-सीतार्तिः प्रकटीकृतरामवैभवस्फूर्तिः।
दारित-दशमुख-कीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः ।।4

दावून जानकीसी । श्री रामनाम मुद्रा सूचक ती
कुशल प्रभूचे कथिले। दिला दिलासा प्रभू येती ।।4.1

वाताहातचि केली । लंकेची तू बा पुरती पुरती
जाळूनि भस्म केली । जणु कीर्ति दशाननाची ती।।4.2

परिचय दिधला जगता। तू रामप्रभु गुण सामर्थ्याचा
दास जयाचा ऐसा । जन वदती स्वामि तो कैसा?।।4.3

गुणवैभव उज्ज्वल हे । तुज जवळी असुनी तुजला न कळे
श्री राम भेट होता। उजळुन गेलेचि तव गुण हे।।4.4

मजपुढती ऐसी ही । मूर्ती तव राहो ची नित्य नवी
पराक्रमाची अमिता । अविचलश्रद्धा दृढ भक्तिची।।4.5



वानरनिकराध्यक्षं दानवकुलकुमुदरविकरसदृशं ।
हीनजनावनदीक्षं पवनतपपाकपुञ्जमद्रक्षम्।।5

चंद्रकिरण स्पर्शाने । उमलति कमले जी सायंकाली
कोमेजुन ती जाती । सूर्यकिरण स्पर्शता त्यांसी।।5.1

तैसे दानव सारे । जे माजले चिमुटभर ज्ञानाने
पराक्रमाने तुझिया । निष्प्रभ ठरले तुजपुढति हे।।5.2

रक्षाया दीनांना । तू कटिबद्ध असे  मारुतराया
हा तप-सामर्थ्याचा । परिपाक असेचि पवनाच्या।।5.3

दिधले दर्शन मजला । मम नयनी रामदूत हा दिसला
मम जन्म धन्य झाला । सार्थक झालीच ही काया।।5.4



एतत्पवनसुतस्य स्तोत्रं य: पठति पञ्चरत्नाख्यम् ।
चिरमिहनिखिलान् भोगान् भुक्त्वा श्रीरामभक्तिभाग्भवति ।।6

अनन्य भावाने जो । स्तोत्र पठण करिल मारुतीचे हे
भोगी सुख इहलोकी । तो रामभक्ति-रस-सुख घेई।।6

------------------

शालिवाहन शक1935, विजयनाम सवत्सरे वैशाख कृ. प्रतिपदा नारदजयंती,
26 मे 2013


 






No comments:

Post a Comment