अर्धनारीश्वर स्तोत्र

अर्धनारीश्वर स्तोत्र

चाफ्यासम गौरीची कोमल गौरार्ध काया
कर्पूरगौर भूषवी उर्वरित अर्ध काया
केशभूषा उमेची जटा तांबारल्या शिवाच्या
नमस्कार माझा त्या पार्वती परमेश्वराला ।।1

कस्तूरि कुंकुम गंध उमा रेखिते ललाटी
शोभते मदनान्तकाच्या ते चिताभस्म भाळी
जाळी कृतांत हा मदना तरी कृतज्ञ गौरी
नमस्कार माझा त्या गिरीजा गिरीजेश्वरासी ।।2

रुणझुणती कंकणे नुपरे उमा चालतांना
शिवाच्या चरण कमळी वेढील्या सर्पमाळा
नटली उमा सुवर्णे सर्पभूषणे शिवाला
नमस्कार माझा त्या पार्वती परमेश्वराला ।।3

नीलदल कमलापरि जिचे आकर्ण नेत्र
उत्फुल्ल रक्तकमला सम विशाल त्रिनेत्र
समदृष्टी गिरिजा ही विषमदृष्टी त्रिनेत्री
नमस्कार माझा त्या गिरीजा गिरीजेश्वरासी ।।4

सुकोमल पुष्पमाला वक्षावरी पार्वतीच्या
छातीवरी शिवाच्या भयद नरमुंडमाला
स्वर्गीय वस्त्र उमेचे हा आकाश पांघरून
नमितो असा सदा मी पार्वती परमेश्वर।।5

सजल जलदापरी कृष्ण कुंतल उमेचे
ताम्र जटा शिवाच्या जशी वीज मेघात चमके
हा स्वामी तिन्ही जगाचा ही स्वामिनी ईश्वराची
नमस्कार माझा त्या गिरीजा गिरीजेश्वरासी ।।6

पदन्यासे पार्वतीच्या सृष्टी म्हणे जन्म घ्यावा
तांडवाने शंकराच्या प्रलयकाळ पातला
जी जगत्जननी शोभे जो पिता सार्‍या जगाचा
नमस्कार माझा त्या पार्वती-परमेश्वराला

रत्नजडित कुंडले झळाळती पार्वतीची
महासर्प फुत्कारिती भूषण हेची शिवासी
शिवमय उमा ती तो उमामंडित शूलपाणी
नमस्कार माझा त्या गिरीजा गिरीजेश्वरासी ।।8

पठण करी भक्तिने जो ह्या शिवाऽष्टकाचे
होई शतायुशी तो जगी त्या बहुमान लाभे
सकलसिद्धि हात जोडोनी तया वंदिताति
सौभाग्य अनंत काल सेविते नरपुंगवासी ।।9


---------------------------------------------------------------

1 comment: