।। आनंद लहरी ।।


                                             श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे  स्तोत्र आहे. त्यात केलेले पार्वतीचे वर्णन इतके सुंदर केले आहे की  ते वाचतांना मनात आनंदाच्या लहरीच उत्पन्न होतात. वीस श्लोकांचे हे स्तोत्र पार्वतीवरील सुंदर काव्यच आहे. पहिल्यांदा हे स्तोत्र वाचले आणि त्याचा अर्थ जाणून घेतला तेंव्हा त्याला मुक्तछंद कविता रूपात करायचा मोह आवरला नाही. तो भावानुवादही ब्लॉगवर ठेवला आहे. स्तोत्र समवृत्तात भाषांतरीत करतांनाही एक वेगळाच आनंद मिळतो. भावानुवाद करतांना त्याच्यात इतकी रंगून गेले की कित्येक वेळेला भावानुवाद फार लांबला तर नाही असेही वाटले. आपण सर्व रसिक वाचक आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.


Image result for free download Images of goddess parvati

( वृत्त - शिखरिणी,  अक्षरे- 17, गण- य म न स भ ल ग ; यति - 6,11 )

भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिर्न वदनैः
प्रजानामीशानस्त्रिपुरमथन पञ्चभिरपि।
षड्भिः सेनानीर्दशशतमुखैरप्यहिपति-
स्तदान्येषां केषां कथय कथमस्मिन्नवसरः।।1

 विधात्यासी माते असुन वदने चार बरवी
जमेना त्यालाही समुचित कराया तव स्तुती
त्रिखंडाचा स्वामी सबळ त्रिपुरारी पशुपती
परी तोची पंचानन करु शकेना तव स्तुती।।1.1

मुखे या स्कंदासी असुनहि सहा अद्भुत अती
सुरांचा सेनानी तव गुण म्हणे ना समजती
गुणांसी वर्णाया शत शत जिभा शेष वदनी
परी बोले तोही मज जवळ सामर्थ्य कुठुनी।।1.2

जमेना जे काही अति अति भल्यांना श्रमुनही 
मुखाने एका ते तव गुण कसे वर्णु जननी।।1.3
 Image result for free download pictures of lord shiv and Parvati
घृतक्षीरद्राक्षामधुमधुरिमा कैरपि पदैर्
विशिष्यानाख्येयो भवति रसनामात्रविषयः।
तथा ते सौन्दर्यं परमशिवदृङ्मात्रविषय
कथंकारं ब्रूमः सकलनिगमागोचरगुणे।।2

जरी राहे गोडी दुध, मधचि द्राक्षात विविधा
कळे कैसी नेत्रा, विविधपण जाणेचि रसना
तसे सौंदर्याचे तव विविध पैलू अनुपमा
मला शब्दांमध्ये जमतिल कसे बद्ध करण्या।।2.1

समुद्री गंगेचे मिसळुनिच जाई जल जसे
उमे तैसी तू गे शिवमयच झालीस सुभगे
म्हणोनी शंभूसी तव गहनता पूर्ण उमगे
तुझ्या लावण्याचे मज कुठुन कोडे उलगडे ॥ 2.2  

तुझ्या सौंदर्याची बहु विविधता विस्मयकरी
तया वर्णायासी नचचि प्रतिभा वेद म्हणती
फिरे माघारे हे निगम तुजला पाहुन जिथे
तिथे चाले कैसी मम मतिच मर्यादित बरे।।2.3
 Image result for free download pictures of lord shiv and Parvati
मुखे ते ताम्बुलं नयनयुगले कज्जलकला
ललाटे काश्मीरं विलसति गले मौक्तिकलता
स्फुरत्काञ्ची शाटी पृथुकटितटे हाटकमयी
भजामस्त्वां गौरीं नगपतिकिशोरीमविरताम्।।3

सदा शांतीच्या या हरित मनपर्णावर उमे
अशांती रूपी या नखलसि शीरा देठ निगुते 
उमे जाळोनीया सकल अवघे मीपण सुखे
चुना मोतीयाचा धवल हळु लावी तव करे ।। 3.1 

मनाचा बुद्धिचा करुनी अडकित्ता कतरसी
मनीषांची सार्‍या अवघड सुपारी कुरकुरी
सुबुद्धीची घाली रुचकर बरी वेलचि वरी
विवेकाचा लावी लव अरुण तो काथ वरती ।। 3.2

सुगंधी कस्तूरी विविध तव अंगीकृत कला
विड्यामध्ये घाली हृदय जणु का केशर अहा
महा वैराग्याची परिमलयुता जायपतरी
महा संकल्पाचे सबळ वर हे जायफळही॥ 3.3


तयी भावार्थाचा अति रुचिर कर्पूर सजवी
दयाबुद्धीरूपी सुमधुर खडीसाखर गुणी
विडा बांधूनी हा त्रयदशगुणी सात्विक अती
क्षमारूपी त्याच्यावर जणु लवंगा ठसविसी ॥ 3.4

असा घोळे जोची त्रयदशगुणी तांबुल मुखी
तुझ्या भक्तांना तो अनुपम सुखे दे मिळवुनी
तुझ्या भुंग्याऐशा कमलनयनी काजळभरी
कशी रेखा काळी गडद कमनीयाच सुखवी।।3.5

खुले कांचीचा गे तनुवर तुझ्या शालु गहिरा
सुवर्णाचे बुट्टे अति भरजरी काठ पदरा
खर्‍या रेशीमाचा झळकत असे पोत गहिरा
वरी सोन्याचा हा तुज कमरपट्टा सजविला।।3.6 

ललाटी कस्तूरी तिलक सजवी केशरयुता
टपोर्‍या मोत्यांचा रुळत तव कंठीच गजरा
अपर्णे गौरी गे गिरिवरसुकन्ये शिवसखे
तुला भक्तीभावे सतत स्मरतो मीच गिरिजे।।3.7

 Image result for free download pictures of lord shiv and Parvati
विराजन्मन्दारद्रुमकुसुमहारस्तनतटी
नदद्वीणानादश्रवणविलसत्कुण्डलगुणा।
नताङ्गी मातङ्गीरुचिरगतिभङ्गी भगवती
सती शम्भोरम्भोरुहचुटुलचक्षुर्विजयते ॥4

सुखे मंदाराची नव-कुसुम-माला सुबकशी
तुझ्या गो र्‍या खांद्यांवरुन तव वक्षी उतरली
स्वरांनी वीणेच्या सहज हलता मान तव गे
तुझ्या कानी मोती, कनक, मणिचे कुंडल हले ॥ 4.1

ठसे चित्ती मूर्ती सविनय उभी नम्र तव ही
दिपूनी जाती हे नयन तव ऐश्वर्य बघुनी
तुझी डौलाची ही गजसम अशी चाल बघता
मनी संतोषाच्या हळु उमटती पाऊलखुणा ॥4.2

टपो र्‍या नेत्रांचे दळ उघडिता भासत मनी
जणू सौंदर्याचे प्रतिक कमले ही उमलली
शिवाची अर्धांगी अनुपमचि ऐश्वर्यवति गे
जयोस्तु हे माते सतत विजयश्री तुज वरे ॥ 4.3
 Image result for free download pictures of lord shiv and Parvati
नवीनार्कभ्राजन्मणिकनकभूषापरिकरैर्
वृताङ्गी सारङ्गीरुचिरनयनाङ्गीकृतशिवा।
तडित्पीता पीताम्बरललितमञ्जीरसुभगा
ममापर्णा पूर्णा निरवधिसुखैरस्तु सुमुखी ॥5

( वृताङ्गी -  परिधान केलेली, सारङ्गी - ठिपकेदार हरिण ;    )

तुझ्या सौंदर्यासी खुलविति अलंकार सगळे
अलंकारांसी वा तव तनुच का भूषण उमे
अलंकारांनी या कनक, मणि, पाचू युत तुझ्या
असे वाटे प्राचीवर उगवला रक्त सविता॥ 5.1

विशाला नेत्रांनी बहु निरखिता चंचलपणे
तुझे काळे काळे नयन हरिणीच्या सम गमे
शिवाच्या प्राप्तीसी दमन करुनी इंद्रिय मना
तपश्चर्या मोठी करुन वरलेसी शिवधना ॥ 5.2

कशी वीजे जैसी तव चमकते गौर तनु ही
तुझ्या विद्युत्कांती तनुस पिवळे वस्त्र खुलवी
सरोजाजैसे हे पदकमल आरक्त तव हे
किती शोभा देती चरणकमळा नूपुर तुझे ॥5.3

सुखाचा चित्ती जो उसळत असे सागर तुझ्या
तरंगामध्ये त्या सुमुख निथळे हे तव उमा
अपर्णा आनंदे सतत परिपूर्णाच असशी
तुझी राहो माते मजवर कृपादृष्टि नित ही ॥ 5.4

हिमाद्रेः सम्भूता सुललितकरैः पल्लवयुता
सुपुष्पा मुक्ताभिर्भ्रमरकलिना चालकभरैः।
कृतस्थाणुस्थाना कुचफलनता सूक्तिसरसा
रुजां हन्त्री गन्त्री विलसति चिदानन्दलतिका ॥6
( रुजा -  पीडा, ताप, रोग )
अपर्णा वेली तू हिमगिरिवरी हया उगवली
नवी पाने जैसे कर जणु तुझे कोमल अती
तुझ्या मोती-माला अगणित फुले शुभ्र फुलली
बटा काळ्या काळ्या भुरभुरत, भुंगे वरि वरी ॥ 6.1

जशी आधाराला धरुन चढते वेल वरती
अपर्णा तैशी तू अविचल शिवासी बिलगली
अद्वैता द्वैताचे जगति असती दोन पथ जे
सुधायुक्ता तेची स्तनयुगल आई तव असे ॥ 6.2

फळांच्या भाराने तरुवर जसा की झुकतसे
स्तनाभारे तैसी तव तनुलता ही लवतसे
तुझ्या या स्तन्याचे सुजन करता प्राशन जगी
 भवाच्या रोगाचा क्षणभर न संसर्ग शिणवी॥6.3

जणू चाले बोले विचरत असे जी दशदिशा
मनोहारी तूची सळसळति चैतन्य प्रतिमा
सदा आनंदाने जणु फुलुन आली तनुलता
अशी तू कल्याणी अनुपम चिदानंद लतिका ॥ 6.4


सपर्णामाकीर्णां कतिपयगुणैः सादरमिह
श्रयन्त्यन्ये वल्लीं मम तु मतिरेवं विलसति।
अपर्णैका सेव्या जगति सकलैर्यत्परिवृतः
पुराणोऽपि स्थाणुः फलति किल कैवल्यपदवीम् ॥7

( आकीर्ण - परिपूर्ण , खचाखच भरलेला.  स्थाणु -  झाडाचे जुने खोड अथवा अतीशय प्राचीन, पुरातन)

सुपर्णांनी आच्छादित हरित वेली बहु किती
करे लोका आकर्षित परि अपर्णा मज हवी
असे सर्वांहूनी अति अतिच प्राचीन शिवही
म्हणोनी होई तो परिचित जगी स्थाणु म्हणुनी॥7.1

अपर्णा घेता त्या सहजचि परी वेढुन पुरे
समर्थाला देई अतुल बल, सामर्थ्य अवघे
मिळेना साधेही फळ सहजतेनेचि कुठले
तिथे देई स्थाणू सुखकरचि कैवल्य-पद ते॥7.2

जिच्या योगे लाभे अतुल बल शंभूस असले
कशी ना देई ती सकल मनुजा मोक्षफळ ते॥7.3



विधात्री धर्माणां त्वमसि सकलाम्नाय जननी
त्वमर्थानां मूलं धनद- नमनीयाङ्घ्रिकमले।
त्वमादिः कामानां जननि कृतकन्दर्पविजये
सतां भर्क्तेबीजं त्वमसि परमब्रह्ममहिषी॥8

अधिष्ठात्री तूची जगि सकल धर्मांस असशी
असे वेदांचीही अमल जननी तूच जगती
तुझ्यायोगे माते विभव सगळे हे अवतरे
महा ऐश्वर्याचे जननि नित तू कारण असे॥8.1

कुबेराचा माथा तव अमल पायी झुकतसे
तुझ्या सन्मानाचा जननि महिमा उज्ज्वल असे
असे इच्छांचे तू जगतजननी बीज जगती
जगी संकल्पांचे बळकटचि तू मूळ असशी॥8.2

जगज्जेता ऐसी मिरवि बहु शेखीच जगती
अहंकारी ऐसा मदनचि पराभूत करिसी
सदा संतांच्या जी दृढतर असे भक्ति हृदयी
असे त्याचे तूची जगतजननी बीज सहजी।।8.3

असे मुक्तीचेही अति सुखद तू बीजचि उमे
असे साम्राज्ञी तू अखिल जगताचीच सुभगे
असे ब्रह्मांडाचा अति सबळ जो नायक खरा
अशा शंभूची तू अमल ललना नित्य वरदा ॥8.4


प्रभूता भक्तिस्ते यदपि न ममालोलमनसस्
त्वया तु श्रीमत्या सदयमवलोक्योऽहमधुना
पयोदः पानीयं दिशति मधुरं चातकमुखे
भृशं शङ्के कैर्वा विधिभिरनुनीता मम मतिः॥9
  
मुठीमध्ये ना ये पवन जवं तो चंचलगती
जशी वारा, वाळू बसत नच ती गाठ कधिही
तसे माझे आहे हृदय मम हे चंचल अति
धरेना भक्तीची दृढतरचि ते कास कधिही॥9.1

परी माते तूची सदय हृदया कोमल अती
मला वात्सल्याने निरखत रहावेच जननी
अपेक्षा ना चित्ती जलधर धरे ती लवभरी
सरी आनंदाच्या बहु बरसवी चातकमुखी॥9.2

तुझ्या पायी माझे चपल मन लागेल कधि का?
कशी व्हावी माते मम मति पदी लीन तुझिया
तुझ्या भक्तीमध्ये विरघळुन जाईन कधि मी
असे या शंकेने विचलितचि अस्वस्थ हृदयी ॥ 9.3



कृपापाङ्गालोकं वितर तरसा साधुचरिते
न ते युक्तोपेक्षा मयि शरणदीक्षामुपगते।
न चेदिष्टं दद्यादनुपदमहो कल्पलतिका
विशेषः सामान्यैः कथमितरवल्लीपरिकरैः॥10

गुणी, पुण्यात्मा तू, सुखकर तुझे वर्तन सदा
कृपादृष्टी ठेवी मजवर असो आशिष तुझा
तुझ्या सेवेचे हे व्रत मम असे एकचि भले
उपेक्षा माझी गे जननि करणे, ना उचित हे॥10.1

असे तू भक्तांची सुखकर अशी कल्पलतिका
हवे ते ते देसी शरण तुज येता कुणि पहा
तुझी ख्याती सांगे शरण तुज येता नर कुणी
तुझ्या भक्तांच्या तू सकलविध इच्छा पुरविसी॥10.2

जरी झाले नाही तुजकडुन गे वर्तन असे
उरे ना काही तो फरक इतरा वा तुजमधे॥10.3


महान्तं विश्वासं तव चरणपङ्केरुहयुगे
निधायान्यनैवाश्रितमिह मया दैवतमुमे।
तथापि त्वच्चेतो यदि मयि न जायेत सदयं
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्॥11

तुझ्या या पायांचा धरुन हृदि विश्वास जननी
तुझ्या पायी आलो तुजविण जगी ना मज कुणी
कुण्या देवाचाही कधि न धरला आश्रय उमे
तुझ्यापायी आहे मम अढळ श्रद्धाच गिरिजे॥11.1

तुला ना आली गे मजवर दया ती लवभरी
कुठे जाऊ माते तव सुत निराधार जगती
असे तूची लंबोदर-जननि ठावे तुजसी हे
न मातेवाचोनी नच जगत बाळास कुठले ॥11.2


अयः स्पर्शे लग्नं सपदि लभते हेमपदवीं
यथा रथ्यापाथः शुचि भवति गङ्गौघमिलितम्।
तथा तत्तत्पापैरतिमलिनमन्तर्मम यदि
त्वयि प्रेम्णा सक्तं कथमिव न जायेत विमलम् ॥12

जसे लोहालाही परिस बनवी कांचनमयी
पथीच्या ओहोळा पुनित करते भागिरथि ही
तसे दुष्कृत्यांनी मलिन जरि झाले मम मन
तुझ्या ओढीने ते फिरुन नच का होई विमल॥12


त्वदन्यस्मादिच्छाविषयफललाभे न नियमस्
त्वमर्थानामिच्छाधिकमपि समर्था वितरणे।
इति प्राहुः प्राञ्चः कमलभवनाद्यास्त्वयिमनस्
त्वदासक्तं नक्तंदिवमुचितमीशानि कुरु तत्॥13

जगी देवांची ही बहु कितिक भारूडभरती
तयांच्या दातृत्वा नियम कुठला एक न कधी
अपेक्षाही जे ना पुरविति मनीचीच कुठली
तरी ते देती का अधिक फळ भक्तास कधिही॥13.1

हरि, ब्रह्मा, शंभू जननि तव गातीच महिमा
स्वभक्ता देसी तू अपरिमित सुखे मोक्ष फळ वा
विसंबूनी त्यांच्या सुमधुर अशा सत्यवचनी
अपेक्षा ठेवी मी तुजकडुन त्या मोक्षपदिची॥13.2

तुझ्या पायी झाले हृदय मम तल्लीन सुभगे
तुझ्या ओढीने मी तळमळत रात्रंदिन उमे
तुला वाटे जे का उचित मजसाठीच जननी
करी ते तू माते तुजवरति विश्वास धरि मी॥13.3



 स्फुरन्नानारत्नस्फटिकमयभित्तिप्रतिफलत्
त्वदाकारं चञ्चच्छशधरविलासौधशीखरम्।
मुकुन्दब्रह्मेन्द्रप्रभृतिपरिवारं विजयते
तवागारं रम्यं त्रिभुवनमहाराजगृहिणि॥14

असे तू साम्राज्ञी अखिल जगताच्याच प्रभुची
तुझ्या प्रासादासी बघुन मम हो कुंठित मती
तयाच्या भिंती ह्या धवल स्फटिकांच्या झळकती
वरी रत्नांची ही कमलदल नक्षी उजळली॥14.1

पहावे जेथे मी जननि प्रतिबिंबे तव किती
दिसोनी येती गे सकल मणि- रत्नात मजसी
दिपूनी जाती हे  नयन तव ऐश्वर्य बघुनी
कला चंद्राची ही सतत तव प्रासादशिखरी ॥14.2

दिसे देवादिंची लगबग तुझ्या भव्य भुवनी
हरी ब्रह्मा इंद्रासम तव कुटुंबीय भवती
तुझ्या प्रासादाचे विभवचि अलौकीक जगती
 दिमाखाने त्याच्या त्रिभुवन अचंबीत जननी।॥14.3



निवासः कैलासे विधिशतमखाद्याः स्तुतिकराः
कुटुम्बं त्रैलोक्यं कृतकरपुटः सिद्धिनिकरः ।
महेशः प्राणेशस्तदवनिधराधीशतनये
न ते सौभाग्यस्य क्वचिदपि मनागस्ति तुलना॥15

असे तू देवात्मा हिमगिरिवराचीच तनया
रहासी कैलासी नचचि तव भाग्यास तुलना
मिळे जे इंद्राचे पदचि शत यज्ञांस करुनी
अशा देवेंद्रासी जननिसम तू वंद्य असशी॥15.1

उमे अत्यानंदे विधि, धनपती, इंद्र, सुर हे
स्तुती गाती माते अथक वदती पुण्यस्तवने
पु र्‍या त्रैलोक्याच्या बघुनि परिवारास तुझिया
कुटुंबाचा आहे कितिक तव विस्तार न कळे ॥15.2

धनी त्रैलोक्याचा अखिल जगि साम्राज्य जयिचे
असे तोची माते पति तव महादेव शिव गे
उभ्या सिद्धी सार्‍या तुजपुढति जोडून कर ही
तुझ्या ह्या भाग्याची जगति तुलना शक्य न कधी॥15.3



वृषो वृद्धो यानं विषमशनमाशा निवसनं
श्मशानं क्रीडाभूर्भुजगनिवहो भूषणविधिः।
समग्रा सामग्री जगति विदितैव स्मररिपोर्
यदेतस्यैश्वर्यं तव जननि सौभाग्यमहिमा॥16

बसाया म्हातारा वृषभ मिळते वाहन शिवा
विषाचे सेवी तो जळजळित ते भोजन सदा
दिशा दाही हेची वसनचि शिवाचे दिसतसे
स्मशानाचे क्रीडांगण करुन खेळे बहु सुखे।।16.1

विषारी नागांचे तनुवर अलंकार बरवे
अवस्था ऐसी ही शिव! शिव! शिवाची नच कळे
अनंगाचा शत्रू म्हणुन जग ज्या ओळखत हे
तयाची सामग्री इतुकिच जगा माहित असे॥ 16.2

परी `त्रैलोक्याचा अधिपति' मिळे त्यास पदवी

असे माते ही गे सकल महती उज्ज्वल तुझी॥16.3




अशेषब्रह्माण्डप्रलयविधिनैसर्गिकमतिः
श्मशानेष्वासीनः कृतभसितलेपः पशुपतिः।
दधौ कण्ठे हालाहलमखिलभूगोलकृपया
भवत्याः सङ्गत्याः फलमिति च कल्याणि कलये॥17

म्हणे ब्रह्मांडाला वितळवुन उध्वस्त करतो
अशी चाले बुद्धी शिव! शिव! शिवाची सहज हो
तनूसी फासूनी सकलचि चिताभस्म अवघे
स्मशानी बैसावे उपजत तयाच्या हृदि असे॥17.1

परी त्याने कंठी गरल धरिले रोधुन असे
इजा ना होताही सकल जग गेले तरुन हे
तुझी शक्ती माते शिव-हृदि कृपा ही उपजवी
तुझ्या सान्निध्याचे फळ जणु असे हेच जननी॥17.2


त्वदीयं सौन्दर्यं निरतिशयमालोक्य परया
भियैवासीद्गङ्गा जलमयतनुः शैलतनया।
तदेतस्यास्ताम्यद्वदनकमलं वीक्ष्य कृपया
प्रतिष्ठामातेने निजशिरसि वासेन गिरिशः॥18

तुझे पाहू जाता अनुपमचि सौंदर्य गिरिजे
भये पाणी पाणी भगिरथसुता होय बहु गे
तिच्या पाहूनीया मलुल वदनासी गिरिश हा
प्रतिष्ठा देई त्या शिरि धरुन गंगेसचि पुन्हा ॥18



विशालश्रीखण्डद्रवमृगमदाकीर्णघुसृण-
प्रसूनव्यामिश्रं भगवति तवाभ्यङ्गसलिलम्।
समादाय स्रष्टा चलितपदपांसून्निजकरैः
समाधत्ते सृष्टिं विबुधपुरपङ्केरुहदृशाम्॥19

सुगंधी गाभ्याचा सुविकसित तो चंदन तरु
उगाळोनी केले परिमलयुता गंध रुचिरु
सुगंधी कस्तूरी, तयि मिसळले केशर किती
अशी शोभे माते तनुवर तुझ्या गंधित उटी॥19.1

अगे माते जाशी तनुवर अशी लावुन उटी
सुगंधी पायाने करित धरणी पावन अती
मिळे पाण्यामध्ये परिमल-उटी स्नानसमयी
तयाच्या आमोदे सकल जल होई पुनितची॥19.2

स्वहस्ते ब्रह्मा तो हळुच उचले धूळ पदिची
तुझ्या स्पर्शाने जी अति पुनित झालीच सहजी
तुझ्या स्नानाचे ते पुनित जलही घेउन करी
सहाय्याने त्यांच्या अभिनव उभारे सुरपुरी ॥19.3



वसन्ते सानन्दे कुसुमितलताभिः परिवृते
स्फुरन्नानापद्मे सरसि कलहंसालिसुभगे।
सखीभिः खेलन्तीं मलयपवनान्दोलितजले
स्मरेद्यस्त्वां तस्य ज्वरजनितपीडाऽपसरति॥20


वसंताच्या स्पर्शे सुखसुखद आह्लादक अती
तरू वेली सार्‍या कुसुम-कलिकांनी बहरती
सरोजा पद्मांनी कुमुद कलिकांनी बहु सजे
तळ्यांचे तेजस्वी स्फटिकसम ते नीर गहिरे॥20.1

थवे हंसाचेही कलकल करोनी विचरती
उडे दाटी त्यांची कुमुदवनिच्या निर्मल जळी
सुगंधी वाराही मलयगिरिचा शीतल अती
तरंगांची नक्षी जळि उमटवी सुंदर किती॥20.2

जळाच्या हिंदोळ्यावर करसि क्रीडाच सुभगे
सख्यांसंगे सा र्‍या बघुन हृदि आनंद बरसे
तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करता गे प्रतिदिनी
उभ्या संसाराचे सकल वितळे दुःख सहजी॥20.3
------------------------------------------------------------------------
(मन्मथनाम संवत्सर पौष मास षट्तिला एकादशी 4 फेब्रुवारी 2016 
निवृत्तीनाथ समाधिदिन )

1 comment:

  1. अलौकिक अनुवाद. खुप सुंदर.

    ReplyDelete