।। अनात्मश्रीविगर्हणम् ।।


      नरजन्माचे सार्थक होण्यासाठी नक्की कशाची आवश्यकता आहे ?  साधारणपणे ज्या माणसाकडे - विद्या, धन, सम्पत्ती, उत्तम पती अथवा पत्नी, मुले बाळे  असतात. त्यांना  समाजात सन्मानाने वागविले जाते. त्याचे सर्व चांगले चालले आहे असे समजले जाते. तो एक प्रतिष्ठित नागरीक म्हणून सर्वांच्या मनात मानाचे स्थान मिळवून असतो.
                                           आचार्य अशा सुप्रतिष्ठित माणसासंबधी बोलतांना त्याला आणि पर्यायाने आपल्याला एक प्रश्न विचारतात. उच्चविद्या, धन, मान, सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळालं म्हणजेच सर्व मिळालं काय?  त्याने काय साधणार आहे? नरजन्माचे सार्थक करायचे असेल तर एवढेच सांगा की आत्मसाक्षात्कार झाला का नाही. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार झाला नाही तो पर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी फिजूल आहेत. व्यर्थ आहेत.
                                     कोणी असा मात्र अर्थ घेऊ नये की विद्या, धन, मान, संपत्ती ह्या गोष्टी कोणी  मिळवूच नये. संसारात राहतांना ह्या सर्व गोष्टी मिळविणे भागच आहे. पण ह्या सर्व गोष्टी मिळाल्या नंतरही जोपर्यंत   शरीरस्थ आत्मा आणि त्या सर्वव्यापी परमात्म्याचं नातं प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत त्यांच मिलन होत नाही किंवा जोपर्यंत त्या सर्वव्यापी परमात्म्यामधे तुम्ही विलीन होत नाही तो पर्यंत सर्व मिळूनही हाती काहीच लागलं नाही असं म्हणावं  लागेल. जो पर्यंत माणूस आपल्या कर्तृत्वाचं कर्तेपद सोडत नाही तोपर्यंत त्याला खरतर कुठलच समाधान लाभत नाही.


(शालिनी - अक्षरे -11, गण - म त त ग ग, यति - 4,7)


लब्धा विद्या राजमान्या तत: किं
प्राप्ता संपत्प्राभवाढ्या तत: किम् ।
भुक्ता नारी सुन्दराङ्गी तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभूत्  ।।1

लाभूनीही उच्च विद्या न अर्थ  
संपत्तीची रास पायीच व्यर्थ।
सेवूनीही अप्सरा हो अनर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ ।। 1


केयुराद्यैर्भूषितो वा तत: किं
कौशैयाद्यैरावृतो वा तत: किम्।
तृप्तो मृष्टान्नादिना वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।2

उंची वस्त्रे भूषणे सर्व व्यर्थ
 मिष्टान्नांचा नित्य आस्वाद व्यर्थ।
ऐश्वर्याचा सर्व हव्यास व्यर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ॥2


दृष्टा नाना चारु देशास्तत: किं
पुष्टाचेष्टा बन्धुवर्गास्तत: किम्।
नष्टं दारिद्य्रादि दु:खं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।3

नाना देशी जाय देशाटनार्थ
 पाहूनी ये  देश सौंदर्यपूर्ण ।
नातेवाकांस देई सुवर्ण
त्यांचे केले लाडही सर्व सर्व ।।3.1

मोडीमध्ये काढिले दुःख सर्व
 केली लक्ष्मी लाभण्या पूर्ण शर्थ ।
 आहे सारा हा खटाटोप व्यर्थ
 आत्मज्ञानावीण काही न अर्थ॥3.2


स्नातं तीर्थं जह्नुजादौ तत: किं
दानं दत्तं द्व्याष्टसंख्यं तत: किम् ।
जप्ता मन्त्रा: कोटिशो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृ तोऽभुत्।।4

तीर्थक्षेत्री साधिले स्नान -पर्व  
नाना दाने वाटता का समर्थ।
मंत्रांचे वा पाठ केले सहस्र
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ ॥4


गोत्रं सम्यग्भूषितं वा तत: किं
गात्रं भस्माच्छादितो वा तत: किम्।
रुद्राक्षादि: संधृतो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।5

केले गोत्रासीच साजेल कर्म
 केले गात्रा भस्मलेपादि धर्म।
 कंठीची ही माळ रुद्राक्ष व्यर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ॥5


अन्नैर्विप्रास्तर्पिता वा तत: किं
यज्ञैर्देवास्तोषिता वा तत: किम् ।
कीर्त्या व्याप्ता: सर्वलोकास्तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।6

केले सार्‍या ब्राह्मणांनाहि तृप्त
 यज्ञामध्ये देव आशीष प्राप्त ।
विश्वामध्ये होय कीर्ती समस्त
 आत्मज्ञानावीण त्यासी न अर्थ॥6


काय: क्लिष्टश्चोपवासैस्तत: किं
लब्धा: पुत्रा: स्वीयपत्न्यास्तत: किम् ।
प्राणायाम: साधितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।7

अन्नत्यागे जाळिला मेद पूर्ण
 कायेसी त्या कष्टवूनी सुखार्थ।
लाभे पत्नीपासुनी गोड पुत्र
 त्यानेही ना जीवना येचि  अर्थ॥7.1

प्राणायामा साधणे जाय व्यर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ॥ 7.2


युद्धे शत्रुर्निजितो वा तत: किं
भूयो मित्रै: पूरितो वा तत: किम्।
योगै: प्राप्ता: सिद्धयो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।8

युद्धामध्ये जिंकला शत्रुवर्ग
 सारे झाले वा जरी मित्रवर्य।
योगाने वा लाभल्या सिद्धि सर्व
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ ॥8


अब्धि: पद्भ्यां लङ्घितो वा तत: कि
वायु: कुम्भे स्थापितो वा तत: किम् ।
मेरु: पाणावुद्धृतो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।9

पायी ओलांडून जाता समुद्र
 अभ्यासाने जाणुनी कुंभकास
हाती मेरू घेउनीही समग्र
 आत्मज्ञानावीण सारेचि व्यर्थ ॥9


क्ष्वेल: पीतो दुग्धवद्वा तत: किं
                   वह्निर्जग्धो लाजवद्वा तत: किम् ।   
प्राप्तश्चार: पक्षिवत्खे तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।10

दुग्धाजैसे प्राशिले कालकूट
 लाह्या जैसे घे निखारे मुखात ।
पक्ष्याजैसी घे भरारी नभात
 आत्मज्ञानावीण सारेचि व्यर्थ ॥10


बद्धा: सम्यक्पावकाद्यास्तत: किं
साक्षाद्विद्धा लोहवर्यास्तत: किम्।
लब्धो निक्षेपोऽञ्जनाद्यैस्तत: कि
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।11

केली सारी पंचभूते मुठीत
 नेत्री घाले अंजने दिव्य दिव्य ।
जाणूनीही गुप्त सौवर्णरास
 लोहाचेही वा करोनी सुवर्ण ॥11.1


ऋद्धी सिद्धी प्राप्त होऊन व्यर्थ
राहूनीही दोन बोटेचि स्वर्ग ।
ना हो  कोणी हे करोनी कृतार्थ
आत्मज्ञानावीण सारेचि व्यर्थ ॥11.2



भूपेन्द्रत्वं प्राप्तमुर्व्या तत: किं
देवेद्रत्वं संभृतं वा तत: किम् ।
मुण्डिन्द्रत्वं चोपलब्धं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।12

भूलोकीचे राज्य लाभून व्यर्थ
 इंद्राच्याही प्राप्त राज्या न अर्थ ।
सन्याश्यांचा मुख्य होणेहि व्यर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ॥ 12


मन्त्रै: सर्व: स्तम्भितो वा तत: कि
बाणैर्लक्ष्यो भेदितो वा तत: किम् ।
कालज्ञानं चापि लब्धं तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।13

लोका केले मुग्ध मन्त्रप्रभावे
 बाणाने वा भेदिले लक्ष्य वेगे ।
काळाचेही होउनी ज्ञान सारे
 ज्ञानाचे तो वाहतो नित्य भारे॥13.1

जाणूनीही भूत वा वर्तमान
 होई जे जे वा भविष्यात सर्व ।
नाही नाही त्यास काहीच अर्थ
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ॥ 13.2


कामातङ्क: खण्डितो वा तत: किं
कोपावेश: कुण्ठितो वा तत: किम्।
लोभाश्लेषो वर्जितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।14

शत्रू जिंकी कामरूपी अजिंक्य
 थारा नाही चित्ति लोभा क्षणैक ।
क्रोधासी वा जिंकुनीही समस्त
 चित्ती नाही स्वार्थ तो नाममात्र
आत्मज्ञानावीण हे सर्व व्यर्थ॥ 14



मोहध्वान्त: पेषितो वा तत: किं
जातो भूमौ निर्मदो वा तत: किम्।
मात्सर्यार्तिर्मीलिता वा ततः किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।15

केले मोहाच्या तमासीच चूर्ण
स्पर्शे त्यासी ना जरी गर्व थोर।
मात्सर्याचा ना जरी लेशमात्र
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ ॥ 15



धातुर्लोक: साधितो वा तत: किं
विष्णोर्लोको वीक्षीतो वा तत: किम्।
शंभोर्लोक: शासितो वा तत: किं
येन स्वात्मा नैव साक्षात्कृतोऽभुत्।।16

मोठ्या कष्टे साधुनी ब्रह्मलोक
 वैकुंठाच्या जाउनी दर्शनार्थ ।
कैलासीचे राज्य भोगून सर्व
 आत्मज्ञानावीण आयुष्य व्यर्थ ॥16

यस्येदं हृदयेसम्यगनात्मश्रीविगर्हणम्।
सदोदेति स एवात्मसाक्षात्कारस्य भाजनम्।।17

आत्मज्ञानाविना सारे । ज्ञान, शौर्यच सिद्धी  हे
चारित्र्य, विद्या, ऐश्वर्य, । मान-सन्मान थोर हे।।17.1

तुच्छ आहेच हे ज्यासी । यथार्थ कळले खरे
आत्मबोधचि होण्यासी । पात्र तो एकची असे।।17.2

अन्ये तु मायिकजगद्भ्रान्तिव्यामोहमोहिता:।
तेषां जायते क्वाऽपि स्वात्मसाक्षात्कृतिर्भुवि।।18

मायामोहात गुंतूनी । जे जे जातात त्यांस ही
अनुभूतीच आत्म्याची । कल्पांतीही न ये कधी ॥ 18

 - - - - - - - - - - - - - - - - -

 माघ शु. द्वादशी / 19 फेब्रु. 2016

3 comments:

  1. आत्म ज्ञानावीण सारेची व्यर्थ .... फारच छान !

    ReplyDelete
  2. हे स्तोत्र प्रथम अनुवादित केलं तेंव्हा वारंवार जाणवलं म्हणजे `ततः किम्' हे दोनच शब्द आहेत पण त्यांच्या समानार्थी मराठीत काहीच सुचत नाहीए. स्तोत्र सुंदर असल्याने हातातूनही सोडवत नव्हते.किमान त्याचा जमेल तसा अर्थ तरी वाचकांपुढे ठेवावा म्हणजे त्यांच्याकडूनच काही सूचना येतील असे वाटले. त्याप्रमाणे सूचना आली आणि मला फार आनंद झाला. थोडा वेगळा विचार करायला लागले आणि जमेल असं वाटलं. आपल्याला हा नवीन अनुवाद आवडला त्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete