शिवनामावल्यष्टकम्


( वृत्त - वसंततिलका , अक्षरे- 14, गण- त भ ज ज ग ग, यति - पाद )

हे चन्द्रचूडमदनान्तक शूलपाणे
स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शम्भो।
भूतेश भीत-भयसूदन मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष॥1

हे चंद्रचूड तुज भूषण इंदुलेखा
माथ्यावरी विलसते किति वर्णु शोभा
जो काम विश्वविजयी जगतास जिंके
त्यालाच राख करि तू मदनान्तका रे ॥1.1
(इंदु - चंद्र, लेखा रेघ; इंदुलेखा - चंद्रकोर ; चूडा - बांधलेल्या जटा)

जो दुर्जनांस भिववी सुजनास रक्षी
ऐसा त्रिशूळ धरिसी शिव शूलपाणी
आधारस्तंभ दृढ एकचि तू जगासी
खंबीर स्थाणुवर विश्व विसावलेची ।। 1.2

सम्राट तू अनभिषिक्त हिमालयाचा
वंदे गिरीश गिरिजापति पार्वतीशा
देवात देव अति श्रेष्ठ तुम्ही महेशा
कल्याण सौख्यप्रद शंभु ससत्त्व आशा ।। 1.3
(ससत्त्व - सत्त्वेन सह - जीवन शक्तिने युक्त, उर्जैने भरलेले, ससत्त्व आशा -निकोप आशा)

जे जे दिसे जगति ते तव आश्रयासी
सांभाळिसी अखिल भूतगणांस तूची
भूते पिशाचगण प्रेत कितीक योनी
भूतेश त्यांस तव आश्रय पुण्यदायी ।। 1.4

पाहून दुःख भयकंपित जे जहाले
प्रेमे तयांस अपुले म्हणता शिवा हे
हे सार्थ भीत-भय-सूदन  नाव लाभे
हे दीनबंधु तुजला म्हणुनीच प्रेमे ।। 1.5

माझ्या प्रभो जगत हे अति कष्टदायी
हे दुःख पार करण्या मज शक्ति नाही
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 1.6
(गहन - अतिशय खोल, सघन, सांद्र, अभेद्य, अप्रवेश्य, अलंघ्य, दुर्गम, कठोर, कठीण, कष्टदायक, घोर अप्रवेश्य जंगल ) (माझ्या प्रभो हे मामनाथं चे भाषांतर आहे )
                        
हे पार्वतीहृदयवल्लभ चन्द्रमौले
भूताधिप प्रमथनाथ गिरीशचाप ।
हे वामदेव भव रुद्र पिनाकपाणे
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 2

प्राणाहुनी प्रिय असे शिव पार्वतीसी
हे पार्वतीहृदयवल्लभ प्रेमराशी
शोभे जटात तुझिया नव-इंदु भारी
अत्यंत सुंदर असा नित चंद्रमौली ।। 2.1

आहेस तू अधिपती सकला गणांचा
अस्तित्त्व ज्यास असते प्रभु तू तयांचा
वा भूत-खेत सकलांसचि तूच स्वामी
भूताधिप प्रमथनाथ असेच तूची ।। 2.2

तू मेरु पर्वतरुपी धरिले धनुष्य
निर्दाळण्या त्रिपुर तो गिरीशचाप  
विद्युल्लतेसम प्रकाशित कांतिमान
अत्यंत सुंदर छबी तव वामदेव ।। 2.3
( वाम - सुंदर ; देव- प्रकाशमान, दिव्य ; वाम- विपरीत म्हणून वामदेव म्हणजे विपरीत वर्तन करणारा. गिरीशचाप - पर्वताचे धनुष्य करणारा )(गिरीशचाप - शिवमहिम्न श्लोक 18)

वाटे भयावह परी हित साधते जी
हे वामदेव विपरीत कृती तुझी ही
हे विश्व येचि उदया तुजपासुनी रे
संबोधती भव तुला म्हणुनी शिवा रे ।। 2.4

तू रुद्र सांप्रत रणी रडवी रिपूंसी
हाती पिनाक धनु भव्य पिनाकपाणी
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 2.5
 
 हे नीलकण्ठ वृषभध्वज पञ्चवक्त्र
लोकेश शेषवलय प्रमथेश शर्व।
हे धूर्जटे पशुपते गिरिजापते मां
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 3

तू प्राशिले विष महा जग तारण्या बा
कंठीच रोधुन धरी नित नीलकंठा
नंदीच वाहन तुझे वृषभध्वजा रे
हाती तुझ्या वृषभ चिह्नयुता ध्वजा रे ।। 3.1

ही पाच सुंदर मुखे तव पंचवक्त्रा
पंचानना करिति विस्मित या जगाला
स्वामी महान असशी जगतास सा र्‍या
लोकेश  तू करितसे प्रतिपाळ त्यांचा ।। 3.2

हा कंकणासमचि शेष विशाल घेई-
वेढून शेषवलया कर हा तुझाची
आहे गणाधिपति तू प्रमथेश नामी
सारे तुला शरण हे गण शृंगि-भृंगी ।। 3.3

निःपात घोर करि शर्व विनाशकारी
हा पातला प्रलय काळ कृती तुझी ही
माथी जटा सघन बांधुन धूर्जटे ही
वाहे धुरा नित शिरी शिव तू जगाची ।। 3.4
(धूर्जटी - धुर् म्हणजे धुरा, (बैलाच्या मानेवरील जोखड/जू) धुरेप्रमाणे मस्तकावर जटाभार शोभत आहे; त्रैलोक्याची धुरा म्हणजे चिंता वहाणारा; धुर् म्हणजे गंगा म्हणून जटेत गंगा विराजमान असलेला  )

ह्या जाह्नवीस दिधला बहुमान ऐसा
होई पवित्र करि पावन ह्या धरेला
सांभाळसी पशुपते अति प्रेमभावे
ही जीवसृष्टि अपुल्याच मुलाप्रमाणे ।। 3.5

नंदीस हे पशुपते नित रक्षसी रे
हे पार्वतीरमण हे गिरिजापते रे
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 3.6
 
हे विश्वनाथ शिव शङ्कर देवदेव
गङ्गाधर प्रमथनायक नन्दिकेश।
बाणेश्वरान्धकरिपो हर लोकनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 4

हे विश्व लेकरु तुझे शिव विश्वनाथ
त्याचाच तू गमतसे लडिवाळ नाथ
कल्याण तू करितसे नित शंकरा हे
मांगल्यमूर्ति शिव मंगल मंगलाचे ।। 4.1

देवांस वंद्य तव मूर्तिच देवदेव
ते सेविती शिव तुझे चरणारविंद
गंगेस धारण करी शिरि तू समर्था
गंगाधरा तिज दिले शिरि स्थान तू बा ।। 4.2

स्वामीच तू प्रमथनायक रे गणांचा
नंदी अनन्य शरणागत नंदिकेशा
बाणासुरास वधिले वधि अंधकासी
बाणेश्वरा तुज म्हणे जग अंधकारी।। 4.3

तू दैन्य दुःख हरसी हर ह्या जगाचे
तू लोकनाथ करि रक्षण ह्या जगाचे
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 4.4
 
वाराणसीपुरपते मणिकर्णिकेश
वीरेश दक्षमखकाल विभो गणेश ।
सर्वज्ञ सर्वहृदयैकनिवासनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 5

वाराणसी तुज रुचे करण्या निवास
 वाराणसीपुरपते शिव विश्वनाथ
स्वामी समर्थचि तुम्ही मणिकर्णिकेचे
आहे प्रसिद्ध म्हणुनी  मणिकर्णिकेश ।। 5.1

वीरेश तू अति महान सुवीर योद्धा
तूची विभू सकल व्यापुन राहतो बा
ना पूर्ण तू करविला कधि दक्षयज्ञ
होताचि क्रोधित मनी मखकाल श्रेष्ठ ।। 5.2

आहेस तू अधिपती सकला गणांचा
लाभे म्हणून तुज नाम गणेश देवा
सर्वज्ञ तू सकल ज्ञान तुला जगाचे
तू ज्ञानरूप शिव हे तुज ज्ञात सारे ।। 5.3

तू राहसी नित हृदी सकला जनांच्या
ह्या प्राणिमात्र हृदयी तव वास साचा
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 5.3
 
श्रीमन्महेश्वर कृपामय हे दयालो
हे व्योमकेश शितिकण्ठ गणाधिनाथ ।
भस्माङ्गराग नृकपाल-कपालमाल
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 6

ऐश्वर्य वानु तव काय महेश्वरा हे
श्रीमान तू जगत हे तव मालकीचे
श्रीमंत देव सगळे तुझिया कृपेने
देवांस देवपण हे तुझियामुळे रे ।। 6.1

राहे अगाधचि कृपा तव रे दयाळा
कारुण्यमूर्ति करुणाकर विश्वनाथा
आकाश हे  अति अफाट तुझेचि केस
वाटे जटा पसरल्या तव व्योमकेश ।। 6.2

तू प्राशिले गरलही जग उद्धराया
त्यानेच कंठ तव हा अति नील झाला
झाला प्रसिद्ध शितिकंठ म्हणून तूची
ऐसाचि अद्भुत पराक्रम तूच जाणी ।। 6.3

स्वामी समर्थ असशी शिव तू गणांचा
आहेच सार्थ तव नाम गणाधिनाथा
शंभो चितेमधिल भस्म उटी प्रमाणे
भस्मांगराग तनुसी तुज भूषवीते ।। 6.4
( भस्मांगराग - भस्म हाच ज्याचा अंगराग आहे तो. अंगराग - उटी )

कंठी रुळेच तुझिया नरमुंडमाळा
वा मेखलाच  नृकपाल-कलापमाला
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 6.5
( कलापः -  मोत्याचा हार, घोस, घुंगरु असलेली मेखला. शिवाच्या कंठी आणि कटीस मेखलेसम नरमुंडमाळा घातल्या आहेत. )
कैलासशैल-विनिवास वृषाकपे हे
मृत्युञ्जय त्रिनयन त्रिजगन्निवास ।
नारायणप्रिय मदापह शक्तिनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।।7
( वृषाकपि - वृष- भक्त जनांवर इष्ट फलांचा वर्षाव करणारा. आकपि - दुष्टांचा थरकाप करून सोडणारा. वृष - धर्म अकपि - स्थिर ठेवणारा , वृषाकपि - धर्माचा आधारस्तंभ, वृष - इंद्रादि देव म्हणून वृषाकपि म्हणजे इंद्रादि देवांच्या मनात ज्याच्याबद्दल दरारा आहे असा. वृष - श्रेष्ठ.  )
कैलास हा तव महाल सुरम्य भव्य
तेथे उमेसह करी शिव तू  निवास
भक्तांवरी बरसवी सुख तू कृपाळा
हे कापती खल तुझ्या बघुनीच क्रोधा ।। 7.1

तू निर्मितो सुर-हृदी बहु तो दरारा
ते कार्य सर्व करती तव धाक ऐसा
तू धर्म-रक्षक महा दृढ धर्म ठेवी
लाभे वृषाकपि अशी पदवी म्हणोनी ।। 7. 2

वाटे तुला न भय काळचि मृत्युचा तू
मृत्युंजया अमर मृत्युस जिंकुनी तू
जो पुण्यनाम जपतो शिव शंभु ऐसे
त्या मृत्युचे भय नसे तुजलाचि कैसे ।। 7. 3

अग्नी शशीच सविता तव नेत्र तीन
त्रैलोक्य हे निरखिण्या अति दक्ष नित्य
तू विष्णुचे हृदय विष्णु तुझ्या हृदी रे
नारायणप्रिय सखा शिव शंभु तू रे ।। 7. 4

तू गर्व दूर करिसीच मदापहा हे
गर्विष्ठ त्याचि मदना दिधला धडा रे
ही आदिशक्ति तव अंकित तूच स्वामी
हे शक्तिनाथचि पराक्रम थोर दावी ।। 7.5

संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर  ।। 7. 6

 
विश्वेश विश्वभवनाशक विश्वरूप
विश्वात्मक त्रिभुवनैकगुणाधिकेश ।
हे विश्वनाथ करुणामय दीनबन्धो
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ।। 8

स्वामी समर्थ असशी तिनही जगाचा
विश्वेश रक्षण करी तिनही जगाचा
संसार दुःख विलया शिव तूच नेशी
विश्वेश विश्वभवनाशक विश्वस्वामी ।। 8.1

आत्मा सदैव  असशी शिव तू जगाचा
व्यापून राहसि जगा शिव विश्वरूपा
आहे गुणी त्रिभुवनी तुजहून कोण?
तू श्रेष्ठ हे त्रिभुवनैकगुणाधिकेश ।। 8.2

हे विश्वनाथ करुणाघन दीनबंधू
लागो तुझाच मजला  नित एक छंदू
संसाररूप घनदाट अरण्य घोर
त्यातून वाचव मला जगदीश थोर ।। 8.3
 
गौरीविलासभुवनाय महेश्वराय
पञ्चाननाय शरणागतरक्षकाय ।
शर्वाय सर्वजगतामधिपाय तस्मै
संसारदुःखदहनाय नमः शिवाय ।। 9

जेथेच खेळ करिते गिरिजाच माया
ते स्थान तूच असशी शिव विश्वरूपा
गौरी विलास करिते तव आश्रयाने
गौरीविलासभुवना गिरिजापते हे ।। 9.1

देवात देव अति श्रेष्ठ तुम्हीच शंभो
देवांस वंद्य नित शंभु महेश्वरा हो
पंचानना तुज नमो नित पंचवक्त्रा
संहारका तव पदी नमितोच शर्वा ।।9.2

येता तुला शरण त्यासचि रक्षिणे हे
रे ब्रीद थोर शरणागत-रक्षका हे
सत्ता तुझीच जगतावर सर्व चाले
त्रैलोक्यनाथ हुकुमावर विश्व डोले ।। 9.3

स्वामी समर्थ शिव तू  सकला जगाचा
आधार एक  तुमचाच अरुंधतीला
संसारदुःख वणवा मजलाच जाळी
त्यातून वाचव मला शिवचन्द्रमौळी ।। 9.4
-----------------------------------------------------------------------
 (भाद्रपद चतुर्दशी / अनंत चतुर्दशी ;  5 सप्टेंबर 2017)



No comments:

Post a Comment